कामगार नवीन कायदे – कामगाराचे जीवन उद्धवस्त करण्याचे षडयंत्र

29

✒️लेखक:-प्रा.संदिप गायकवाड(मो:-९६३७३५७४००)

या पृथ्वीला सुंदर,स्वच्छ,निर्मल ठेवणारा कामगार हाच पृथ्वीचा मालक आहे.आपल्या श्रमाच्या बळावर पृथ्वीवरील जनतेचे पालन पोषण करतो म्हणून तो जगाचा खरा शिल्पकार आहे.साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणतात की,”हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून ती दलिताच्या(कामगाराच्या) तळहातावर तरलेली आहे.”पण आज या कामगाराचे जीवन मोठे कष्टमय यातनानी भरलेले आहे.हजारोवर्षापासून मानवाने स्वतःच्या बुध्दिचातुर्याने शारिरीक व मानसिक श्रम करून या जगाला आधुनिक काळपर्यंत आणलं आहे.स्वतः श्रम करून दुस-याला हिस्सा देणारा आज इतका दुबळा झाला आहे.भांडवलदारी /ब्राम्हणशाहीने या वर्गाचे जीवन उद्धवस्त करून टाकले आहे.

अतिरिरक्त मूल्यांच्या उन्मादात मालकांनी स्वतःचा स्वार्थ साधून कामगाराचे जीवन अंधकारमय केले आहे.अठराव्या शतकामध्ये जगात अभुतपूर्व अशी कामगार क्रांती झाली त्यामधून जगाने साम्यवादी विचारसरणीचा नवा आयाम स्वीकारला ,परंतु आजही कामगार वर्गाचे दुःख कमी झाले नाही.कारण की कामगार संघटना ह्या राजकिय पक्षाच्या बटीक झाल्या आहेत.कामगार संघटनेचे नेते स्वतःच्या स्वार्थात गुतंले असल्याने शोषणकारी राज्य व्यवस्था /भांडवलशाही उध्दवस्त करता आलेल्या नाही.हे विदारक वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.भारतीय समाजामध्ये अत्यंत खालचा दर्जाचा घटक म्हणजे कामगार/ शोषित वर्ग होय.औद्योगिक क्रांतीचा खरा नायक कामगार आहे.

पण कामगारांचे जीवन मालकांच्या हातात असल्याने योग्य श्रमाचा मोबदला त्यांना मिळत नाही.मालक वर्ग कामगाराच्या श्रमातून अतोनात नफा कमावितो पण त्या नफ्यातील कामगारांना योग्य वाटा मिळत नाही.त्यासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक कामगार कायदे करण्यात आले.ब्रिटीशाच्या काळात औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली.त्यांनी स्वतःचा स्वार्थासाठी नव नवे फँक्टरी कायदे बनविले श्रमिकांनी फक्त काम करायचा पण अधिकार देऊ नये कारण तसे झाले तर तो मालकाविरूध्द बंड करेल ही मानसिक विकृत होती.या मानसिक विकृतीवर नवा सापेक्ष विचार अठराव्या शतकामध्ये काँल मार्क्स यांनी मांडला जगातील मालक वर्ग कामगाराचे शोषण करतो म्हणून त्याची सत्ता समाप्त करून कामगार क्रांतीच्या माध्यमातून कामगाराची राज्यसत्ता निर्माण करण्यासाठी रशिया,जर्मनी, चीन,इग्लंड,अमेरिका या देशात या क्रांतीने मोठे बदल घडवून आणले.

मार्क्स,जॉन रीड,डॉ.ऐगंल्स,मँक्झीम गॉकी,हेगेल या कामगार विचारवंतानी जगाची घडी बदलवून टाकली .शोषण करणा-या दमनकारी राजसत्तेविरूध्द महाआंदोलन केलं त्यातून एक नवा सिध्दांत निर्माण झाला . मार्क्स कामगारांना आव्हान करताना म्हणतो की,”कामगारांनो संघटित व्हाआणि लढा पुकारा तुमचे काहीच नुकसान होणार नाही कारण तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही.”

कामगार क्रांतीच्या माध्यमातून भांडवलशाही उध्दवस्त करून मानवी स्वातंत्र्याची निर्मिती व्हावी ही ईच्छा होती.हा मार्क्सचा सिध्दांत अनेक देशामध्ये लागू होत असला तरी भारतातील समाजव्यवस्थेतील विषमतेमुळे कामगारांना एकत्र येऊ देत नाही,ती फक्त स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी कामगारांचा फायदा घेतो .डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगाराविषयी म्हणतात की,”जगातील मानवी समाजात क्रांती यशस्वी व्हायची तर ख-या लोकशाहीचा म्हणजे अर्थातच कामगारशाहीचा जगात प्रचार व्हावयास हवा आहे.मार्क्सने मांडलेला आर्थिक स्वातंत्र्य व समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ही अतिशय उपयुक्त घटना आहे पण रशियन क्रांतीचे सारेच कार्य योग्य असे नव्हे,रशिया सांगेल तोच धर्म, रशिया करेल ते कार्य अशी अंधःभक्ती किती दिवस चालणार!हे आपण तपासून पाहिले पाहिजे.”

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कामगारशाही म्हणजे स्वातंत्र्य व समता या दोन्ही गोष्टीची गरज दिसून आली होती.कामगार ऐक्याचा खरा मार्ग सांगताना बाबासाहेब म्हणतात की,”वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुस-याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आज येणार ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग आहे.तसेच ब्राम्हणशाही ही एक कामगारातील फुटीचे जर मूलभूत कारण असेल तर ती कामगारामधून काढून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न केला पाहिजे हा साथीचा रोग केवळ दुर्लक्ष केल्यामूळे जाणार नाही किंवा त्याबद्दल मौन राहिल्याने जाणार नाही.त्याचा पाठपुरावा केला पाहिजे व त्याची मुळे खोदून काढली पाहिजेत .तरच कामगाराच्या ऐक्याचा मार्ग मोकळा होईल.

आज भारतात जे कामगार संघटन आहे ते एक दुर्गधीयुक्त सांडपाण्याचे डबके बनले आहे. कारण कामगाराचे नेतृत्व एकतर पथभ्रष्ट किंवा राजकिय पक्षाच्या दावनीला बांधले आहे.यामुळे कामगार वर्गाचे शोषण सरकारला करता येते . कोरोना विषाणूच्या महामारीत देशात लाँकडाऊन सुरू आहे.आजपर्यंत ४.० लॉकडाऊन लावण्यात आले असून सरकारकडे कोणतीही नियोजन नसल्याने स्वतःच्या गर्वात राहिल्याने श्रमिक व कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात बेहाल व नुकसान झाले .पहिल्या लॉकडाऊन मध्ये कामगारानी धीर धरला पण सरकारच्या अपु-या सोयीमुळे त्यांनी आपल्या गावकडचा मार्ग पकडला .या प्रवासात करोडो श्रमिकांना जो त्रास झाला त्यासाठी शब्दकोशात शब्दच नाहीत.स्वातंत्र्य़ानंतर देशातून देशात झालेले सर्वात मोठे स्थलांतर ठरत आहे.नेताजी या दुःखाला तप आणि त्याग या शब्दानी भुलावन करत आहे ,हे केंद्र सरकारचे अपयश आहे.

नेताजीनी भारताचे दोन भागात विभाजन केले आहे ,एक श्रीमंताचा इंडिया दुसरा गरिबांचा भारत .देश भग्नावस्थेत उभा असतांना सरकार कामगाराचे सैंवधानिक कायदे नष्ट करून भांडवलदाराच्या मर्जीप्रमाणे कायदे करत आहे.तर काही राज्य सरकारने कंपन्यासाठी गालीचे अंथरून ठेवले आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी भारताच्या कामगारांना गुलामीच्या जंजीरात जखडून टाकले आहे.हे कामगार कायद्यातील बदल ब्राम्हणशाही/भांडवलशाही यांच्यासाठी राजमहाल निर्माण करून श्रमिकांना जमीनदोस्त करणारी आहे.वर्तमान सरकारच्या केंद्रस्थरीय नेतृत्वामुळे भारताची जी अधोगती झाली ती आजपर्यतच्या इतिहासात भारताने कधीही पाहिली नाही.

नव्या कामगार कायद्यातील बदल हे भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्काचे उल्लंगण आहे.भारतीय संविधानात कामगारासंबंधीचे अनुच्छेद क्रमांक १४ ते १८,१९,२३,३८,३९अ,३९ड,३८ई,४१,४४अ,यामध्ये घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत.या तरतुदी वर्तमान अध्यादेशाने समाप्त होत आहेत.जागतिक पातळीवर कामगाराच्या सामाजिक सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्या आहेत . १९१९ साली ILO ने आपल्या अभिवचनात म्हटले आहे की,”कामगाराचे त्याच्या रोजगारातून उद्दभवणा-या आजारपण,रोगराई,आणि दुखापतीपासून संरक्षण,बालकांचे संरक्षण,युवक आणि कल्याण ,वृध्दत्वाची तरतुदी आणि दुखापत यापासून संरक्षण करण्यात येईल.” या अभिवचनाचे व भारतीय संविधानाचे उल्लंगण या अध्यादेशाने केले आहे.

भारतीय कामगाराच्या सामाजिक सुरक्षेसाठी अनेक कायदे करण्यात आले.त्यात ट्रेड युनियन अँक्ट १९२६,औद्योगिक विवाद कायदा १९४७,पेमेंट अॉफ वेजेस अँक्ट १९३६,मिनिमम वेजेस अँक्ट १९४७,बोनस बाबद कायदा १९६५,फँक्टरी कायदा१९४८,खाण संबंधी कायदा १९५२, समान वेतन कायदा १९७६,वेठबिगारी नष्ट करण्यासंबंधातील कायदा १९७६,बालमजूरी प्रतिबंध कायदा १९८६ ईत्यादी अनेक कायद्यान्वये कामगाराच्या जीवनात आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे वचन दिले आहे.परंतु लॉकडाऊन काळाचा गैरफायदा घेऊन वर्तमान राज्यांनी व केंद्र सरकारने भांडवलदारी राजसत्ता निर्माण करण्यासाठी सामाजिक सुरक्षाचे कायदे समाप्त करून कामगारांना गुलाम करण्याचे षडयंत्र रचले आहेत.हे षडयंत्र भारतीय कामगार नक्कीच हानून पाडेलच असा विश्वास आहे.

भारतीय कामगार संघटित व असंघटित क्षेत्रात विभागले आहेत. संघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद सरकारकडे असते तर असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद सरकारकडे नसते.२००४-२००५ (NSSO) नुसार जवळपास ९४% कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत . यासाठी २००८ ला “असंघटित कामगारांची सामाजिक सुरक्षा अधिनियम ” पारित केला आहे.पण त्याची पुर्तता अजूनपर्यत न झाल्यानी लॉकडाऊनचा सारा भार या क्षेत्रावर पडला आहे.त्यामुळे त्याची अवस्था ना घर के ना घाट के अशी झाली आहे.कामगार कायदे दुरूस्ती विधेयक २०१४ नंतर व्यवसायाची व्याख्यांच बदलवून टाकली आहे.त्याचा असर असंघटित क्षेत्रातील कामगारांवर मोठ्या प्रमाणात पडला आहे.

कामगार हा देशाच्या निर्मितीचा कणा असून कोरोना विषाणू महामारीने तो पुर्णपणे तुटला आहे.त्याला भावनिक आधारापेक्षा जीवनाची सरक्षितता महत्वाची आहे.केंद्र सरकारने विस लाख करोड रूपयांची घोषणा केली पण,हेच पँकेज लॉकडाऊनच्या पूर्वी मिळाले असते तर करोडो श्रमिकांचे स्थलांतर झाले नसते आणि त्याच्या जीवनाची वित्त व जीवीतहानी झाली नसती.आता संसाराला आर्थिकतेबरोबर सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे.कारण या महामारीने जवळपास ९८% कामगारांचे जीवन उद्धवस्त केले आहे.या महामारीत कामगार कायद्यात दुरूस्ती करून त्याच्या दुखावर मीठ छिळकण्याचा प्रयत्न अमानविय आहे.असैवधानिक कामगार कायद्या दुरूस्ती विधेयक मागे घेतले नाही तर श्रमिकच या कायद्याला जमीनदोस्त करून सरकारला जमीनीत गाडल्याशिवाय राहणार नाही.तो अध्यादेश लवकरात लवकर वापस घ्यावा नाहीतर भारतात संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही.