गुरांच्या चोरी-कत्तलप्रकरणी 4 जण गजाआड

43

✒️रायगड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अलिबाग(दि.9डिसेंबर):- पाळीव गुरांची चोरी आणि नंतर त्यांची कत्तल करुन मांसाची तस्करी करणार्‍या 4 जणांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. या चौघांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.
 
गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व मासांची तस्करी करण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा लवकरात-लवकर उलगडा करुन, हे गुन्हे करणार्‍यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिल्या होत्या.
 
त्याअनुषंगाने रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि सहकारी कर्मचारी यांचे खास पथक तयार केले. गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती संकलित करुन प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले.
 
पेण आणि खोपोली पोलीस दाखल गुन्ह्यांप्रकरणी आसीफ सादिक कुरेशी (रा.जुबली पार्क, बिल्डींग नं.9, 2 रा माळा, कौसा-मुंब्रा, जि.ठाणे) व साकिब सहिद मनीयार (रा.लेफर कॉलनी, राधाकृष्ण मंदिराजवळ, मोहन सृष्टी बिल्डींग, पत्री पूल, कल्याण (प.), जि.ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर पाली पोलीस ठाणे हद्दीतील चोरीप्रकरणी सूरज खलीराम कायरीया (रा.कोनगांव, पिंपळास रोड, धर्मा निवास, कोनगांव, ता.कल्याण) याला जेरबंद करण्यात आले आहे.
 
पोयनाड, रेवदंडा, वडखळ, कर्जत, रसायनी, रोहा येथील पोलीस ठाण्यात दाखल विविध 8 गुन्ह्यांप्रकरणी इंतजार अली मुद्दी शेख (वय 32, रा.धुम कॉम्प्लेक्स, ए विंग, रुम नं.404, सानिया हॉल जवळ, चांदनगर, कौसा मुंब्रा जि.ठाणे) याला गजाआड करण्यात आले आहे. अटक केलेल्या चारही जणांनी चौकशीमध्ये पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनेसुद्धा हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे.
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि पथकाने केली आहे.

🔺गुंगीचे औषध, इंजेक्शन देऊन करायचे गुरांची चोरी

हे गुरे चोर सायंकाळी मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून त्यांच्या वाहनाद्वारे पनवेल मार्गे रायगड जिल्ह्यातील प्रवेश करतात. रात्रीच्या वेळी वाडी-वस्तीवर तसेच रस्त्यांवर फिरणार्‍या गाय-बैल या जनावरांना गुंगीचे औषध ब्रेडला लावून खाण्यास देतात. कधी कधी गुंगीचे इंजेक्शन देतात. सुमारे 15 मिनिटांत जनावर बेशुद्ध झाल्यानंतर त्यास बांधून वाहनात भरतात किंवा निर्जन स्थळी आल्यानंतर त्यांच्याजवळील हत्याराने जनावरांची कत्तल करुन मुंडके, कातडे, कोथळा तेथेच टाकून मांस वाहनांत भरुन निघून जातात. चोरी केलेले जनावर मार्केटमध्ये विकतात तसेच मांसाची मार्केटमध्ये विक्री करतात, असे निष्पन्न झाले आहे.