गंगाखेडला खाजगी क्लासेस सुरू करण्याची मागणी

33

🔸काँग्रेससह शिक्षक संघटनेचे निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.10डिसेंबर):-डिसेंबर महिन्यापासून राज्यातील शैक्षणिक संस्था सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. या धर्तीवर शहर व तालुक्यातील खाजगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी गंगाखेड तालुका काँग्रेससह खाजगी शिकवणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गंगाखेड तहसीलदारांची भेट घेत एक निवेदन देत कोरोना पार्शभूमीवर योग्य ती काळजी घेण्याची लेखी हमी प्रशासनास दिली आहे.

कोरोना साथ बऱ्यापैकी आटोक्यात आल्यानंतर बरेच उद्योग आणि व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आले आहेत. याचबरोबर राज्यातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळांचे वर्गही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू खाजगी शिकवणी वर्ग मात्र अद्याप बंदच आहेत. खाजगी शिकवणी बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असून हे होऊ नये यासाठी खाजगी शिक्षण शिकवणी सुरू राहणे आवश्यक असलयाचे खाजगी शिकवणी संघटनेच्या शिक्षकांचे मत आहे. शासन आणि प्रशासन ज्या अटी आणि शर्ती घालून देईल त्या पूर्ण करत आमची शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी आहे. तेव्हा शासन, प्रशासनाने आम्हाला खाजगी शिकवणी क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने गंगाखेड तहसीलदार यांना भेटून करण्यात आली आहे.

यासंदर्भात गंगाखेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच तहसीलदारांची भेट घेतली. सुरू करण्यात आलेल्या शाळांप्रमाणेच कोरोनाची साथ पसरू नये यासाठी काळजी घेण्याची आमची तयारी असून आपण खाजगी शिकवणी सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे सर्वश्री प्रा. अनंत मुंडे, प्रा. ज्ञानेश्वर बाबर, प्रा. माऊली मुंडे, प्रा. राजकुमार जाधव, प्रा. संतोष गव्हाणे, प्रा. बाळू जायभाये, प्रा. दत्ता घोडबांड, प्रा. जगदिश मंदोडे सर, प्रा. शिवदास जाधव, शिंदे सर, प्रा. विजय बाबर सर व ईतर पदाधिकारी ऊपस्थित होते.