गडचिरोली जिल्हयातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर

    36

    ?दोन टप्प्यात दि.१५ व १७ जानेवारी २०२१ ला मतदान, सर्व जिल्हयात आचारसंहिता लागू

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.12डिसेंबर):-जिल्हयातील एप्रिल ते जून आणि जुलै ते डिसेंबर २०२० मध्ये कालावधी संपलेल्या व नव्याने स्थापित सुमारे ३६२ ग्रामपंचायतीमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणूक जिल्हयात दोन टप्प्यात संगणीकृत पध्दतीने होणार असून पहिल्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या ८ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात दि.१७ जानेवारी २०२१ रोजी अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा येथे होणार आहे. मतदानाची वेळ दोन्ही टप्प्यांसाठी सकाळी ७.३० वा. पासून दुपारी ३.०० वा. पर्यंत असणार आहे. जिल्हयातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी ५० टक्केपेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपुर्ण जिल्हयात आचारसंहिता दि. ११ डिसेंबर पासून निवडणूकांचा निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे.

    या निवडणूकिसाठी तहसिलदार १५ डिसेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. तहसिल कार्यालयात नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक २३ ते ३० डिसेंबर दरम्यान सकाळी ११ वा. ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टया वगळून असणार आहे. नामनिर्देशन छाननी दि. ३१ डिसेंबर रोजी असणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत असणार आहे.

    त्याच दिवशी दुपारी ३.०० वा. नंतर निवडणूक चिन्ह नेमून देणार आहेत तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दोन टप्प्यात दि. १५ जानेवारी व १७ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दोन्ही टप्प्यातील निवडणूकीची मतमोजणी व निकाल १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. सदर निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.