कुंडलवाडी पोलीसांच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे एलसीबीची शहरातील अवैध धंद्यावर धाड

40

🔸मटका व अवैध देशी विक्री करणा-यावर केली कारवाई

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.12डिसेंबर):-तालुक्यातील कुंडलवाडी पोलीसांच्या ‘अर्थ’पुर्ण दुर्लक्षामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यात वाढ झाली आहे.स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने दि.११ डिसेंबर रोजी शहरात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अवैध धंद्यावर धाड टाकीत मटका,अवैध देशी विक्रेत्यास पकडून कारवाई केली. या कारवाईने स्थानिक पोलीसांचे पितळे उघडे पडले आहे.

गत काही महिन्यांपासून कुंडलवाडी शहर व परिसरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यात मटका,गुटखा,जुगार,अवैध देशी व शिंदी विक्री,अवैध पेट्रोल व डिझेल विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी पोलीसांना हफ्ता पुरविला जातो अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यासाठी पोलीसांचे पंटर सक्रीय असून दर महिन्याला चोखपणे ही जबाबदारी पार पाडली जाते असेही सूर नागरिकांमधून निघत आहे.तसेच शहर व परिसरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे.

दि.११ डिसेंबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांचा वाढदिवस होता.यामुळे अनेक हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात केक,हार-तुरे घेऊन स्वागताला गेल्याची माहिती मिळाली असुन पोलीस अधिकारी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यात व्यस्त असताना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने शहरातील आठवडी बाजारात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर धाड टाकली तसेच बिलोली रोडवर अवैध देशी विक्री करणाऱ्यास पकडले हे मात्र विशेष.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे संजीव जिंकमवाड व संग्राम केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यातसय्यद तौफिक स.अंजुम व नरसिंग बाबु कांबळे यांच्या विरूद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. शहरात बोकाळलेले अवैध धंद्यावर लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी ठाण्यातील पोलीस अधिका-याची येथून बदली करावी अशी मागणी शहर व परिसरातील नागरिकांमधून जोर धरीत आहे.शहरात वाढलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.