हिंगणघाट जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला सोमवार पासुन सुरुवात – उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

34

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.14डिसेंबर):-राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारपासून न्यायालयात सुरुवात होणार आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उज्ज्वल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर होतील.

3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.

तीन महिन्यांत निकाल लावण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन कोरोनामुळे लांबणीवर हिंगणघाट जळीतकांडानंतर राज्यभरात निर्माण झालेला रोष पाहता सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यांत खटला निकाली काढून आरोपीला शासन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती.

पोलिसांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर अवघ्या 25 दिवसांत म्हणजे 28 फेब्रुवारीला न्यायालयात 426 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तसचे हा खटला चालवण्यासाठी वर्ध्यात फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज मंजूर न झाल्याने याप्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथे पार पडणार आहे. न्यायालयात आरोपी विक्की नगराळेवर आरोप ठेवण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे