चाळीसगांव तालुक्याने अजून एक सुपुत्र गमावला

58

🔹वाकडी येथील जवान अमित पाटील हे जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असतांना झाले शहीद

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

चाळीसगांव(दि.17डिसेंबर):- तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान अमित साहेबराव पाटील हे जम्मु काश्मीर येथे सेवा बजावत असतांना अंगावर बरफ पडल्याने उपचारा दरम्यान शहीद झाले. दिनांक 16 रोजी सकाळी ही बातमी गावात आली आणि पूर्ण वाकडी गाव हे सुन्न झाले. नुकतेच शहीद झालेले यश देशमुख या जवानाची आठवण तालुक्याला ताजी असतांना त्यातच अमित यांच्या रूपात तालुक्याने अजून एक सुपुत्र भारतमातेसाठी गमावल्याने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमित पाटील हे 2010 साली चाकूर येथून सैन्यदलात भरती झाले होते, त्यानंतर 21 जून 2010 रोजी गांधीनगर येथे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतले, व 2 एप्रिल 2011 रोजी नऊ महिन्याची खडतर ट्रेनिंग पूर्ण करून त्यांची पहिलीच पोस्टिंग 183 बटालियन सीमा सुरक्षा बल पश्चिम बंगाल मालदा येथे झाली. त्यानंतर छत्तीसगड येथे 2 वर्ष कर्तव्य पार पाडून जून 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पुछ येथे त्यांची बदली झाली. अतिशय थंड तापमानामुळे 27 नोव्हेंबर पासून कमरेचा व घुडघ्याचा त्रास अमित यांना सुरू झाला होता, अशा अवस्थेत देखील अमित हे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत होते, शेवटी 1 डिसेंम्बरला त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने फिल्ड वरून त्यांना उतरविण्यात आले, व त्या नंतर BSF च्या रुग्णालयात दाखविण्यात आले 4 दिवस BSFच्या रुग्णालयात उपचार देण्यात आले.

त्यांच्या तब्येतीची सुधार होत नसल्याने नंतर त्यांना पुछच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, आणि तेथेच त्यांची प्राण ज्योत मालवली. अतिशय मनमिळावू स्वभावाचे असलेले जवान अमित पाटील हे देशासाठी शहीद झाल्याने सम्पूर्ण गाव शोक सागरात बुडालेले आहे, अमित यांचे प्राथमिक शिक्षण गाचातच असून पुढील शिक्षण हे चाळीसगांव महाविद्यालयात पूर्ण झाले, त्यांचा विवाह 25 मे 2014 रोजी झाला होता, त्यांना चार वर्षाचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दिनांक 18 रोजी सकाळी 10 वाजता गावातील त्यांच्या शेतात करण्यात येणार असल्याने त्यांच्या निकट वर्तीयांनी सांगितले आहे.