गाव खेड्यातल्या अनेक डिसले गुरुजींचे काय ?

29

सोलापूरच्या डिसले सारख्या उपक्रमशील शिक्षकाच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा घेतली गेली तेव्हा आपल्याकडे जाग आली.आपली भूमी सुपीक सकस आहे इथे व्यापकता,बुद्धिमत्ता ,कुशलता,कौशल्य असलेली माणसे अफाट आहे ,आपल्या इथे सगळं आहे फक्त नाही आहे ती या सगळ्यांकडे पाहण्याची निरोगी सकस दृष्टी,कमतरता आहे ती राजकीय इच्छाशक्तीची.नेमकी तीच आपल्या मातीतील माणसातील बुद्धिमत्ता आज डिसले या शिक्षकाच्या निमित्ताने जगासमोर आली आहे.आता त्यांचे सत्कार होतील,अभिनंदनाचे सोहळे होतील पण त्यांच्या उपक्रमतेचा केलेल्या कार्याचा आलेख आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीत कसा करून घेता येईल,जेणेकरून काय मिळवायचं आहे हे विसरून फक्त नोकरीसाठी घोकंमपट्टी करणारी गाढव न निर्माण करता आपल्याला अशा प्रयोगशील उपक्रमांद्वारे ज्ञानाचा ज्योती उजळणारा ज्ञानदेव घडवता येईल.आज आपल्या देशात राज्यात असे अनेक डिसले गुरुजी आपापल्या खेड्यात गावात तालुक्यात प्रामाणिकपणे काम करत आहेत.पण लक्षात कोण घेतो अशी अवस्था.

एकद्या डिसले गुरुजीची दखल घेतली गेली बाकीच्या शिक्षकांचे काय?एक शिक्षक एक संपूर्ण पिढी घडवतो.पूर्वी मास्तर ,गुरुजी ,शिक्षक या नावात माणसात एक जरब होती एक भीतीयुक्त दरारा होता,आज सर सर म्हणून त्या शिक्षकाला आमच्या नव्या पिढीने सरकवूनच ठेवले आहे.अशा प्रयोगशील शिक्षकांची राज्याच्या सर्वोच्य सभागृहात विधानपरिषदेत नेमणूक व्हावी ,जेणेकरून ते आपल्या बुद्धिमतेने आपल्या प्रयोगशीलतेची परंपरा कायम राखत राजाश्रयाच्या पाठींब्याने इथल्या मृतप्राय होत चाललेल्या शिक्षण पद्धतीला नवंसंजीवनी देतील.

त्यामुळे हार-तुरे सत्कार यावर न थांबता डिसले यांसारख्या उपक्रमशील शिक्षकांना विधानपरिषदेत पाठवा ही काळाची आणि उभ्या महाराष्ट्राची गरज आहे.आणि शिक्षक हा ही एक माणूस आहे तो पिढी घडवतो,आज खाजगी शाळेतील शिक्षक तर मेल्याहून मेल्यासारखे झाले आहेत,सर्व्हे,निवडणुकीची व अन्य कामे लावून त्यांना दारोदार भटकवल जातंय.कोरोनाच्या नावाखाली पगार द्यायला अनेक शिक्षणसंस्था चालकांनी नकार दिल्याने अनके शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.विनाअनुदानित शाळेचा शिक्षक तर आपल्या मागण्यांसाठी लढून लढून आता रडणं ही विसरून गेला आहे.गाव खेड्यातल्या अशा शिक्षकांना रोज काही तासांचा प्रवास करून स्वखर्चाने शिकवाव लागतंय.

अश्या अनेक गोष्टी आहेत .त्यासाठी त्या क्षेत्रातला जाणकार माणूस विधानपरिषदेत जायला हवा तिथे त्याने आपली प्रयोगशीलता दाखवून ज्ञानाचा झालेला हा बाजार थांबवायला हवा. आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीवर कुठल्याही प्रदेशाचा आलेख मोजता येतो.आरोग्याचे तर तीनतेरा वाजलेले आहेत.शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेला शिक्षक मेटाकुटीला आलाय.एकादा डिसले गुरुजी नावारूपाला आला असे अनेक डिसले गुरूजी आज गावखेड्यात कार्यरत आहेत.त्यांचे काय हा प्रश्न शेवटी शिक्षणाच्या लायकीचे प्रश्न विचारून आ वासून उभा रहातोय.

✒️लेखक:-अनुज केसरकर(मुंबई)