मिळुनी जण सारे : सण करू साजरे !

29

[नाताळ, गीता जयंती व मौनी एकादशी विशेष]

विश्वातील मानव देवधर्मामुळे विभागला गेला आहे. मानवजात व सृष्टीचा निर्माता परमपिता परमात्मा एकच आहे, हे मनुष्य मानायला तयार नाही. दि.२५ डिसेंबर २०२० या एकाच दिवशी अनेक धर्मातील महत्त्वाचे उत्सव आले. ते ख्रिश्चन बांधवांचा ठरलेला सण नाताळ, हिंदू बांधवांचा गीता जयंती आणि जैन बांधवांचा मौनी एकादशी हे आहेत. कोणी हेवा, तिरस्कार करू नये किंवा खट्टूही होऊ नये. सर्व सजीवांचा परमात्मा एकच आहे, हे यातून नियतीने सिद्ध करून दिले. म्हणून ख्यातनाम ग्रंथकार शहंशहा बाबा अवतारसिंहजी महाराजांनी लिहिले –

“हिन्दू सिख मुसलम तों पहला बन्दे सिर्फ इन्सा एं तूं |
वैर विरोध नूं दिलों मिटा दे जे रब दा चाहवान एं तूं |”
[सम्पूर्ण अवतार बाणी : पद क्र.३५५.]

नाताळ (ख्रिसमस डे) –
नाताळ किंवा क्रिसमस डे हा एक ख्रिश्चन बांधवांचा प्रमुख सण आहे. तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ अथवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन बांधवांच्या श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात.

तसेच आपापल्या घरांना रंगरंगोटी व रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ अर्थात ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूस यांचे प्रतीक आहे. या दिवशी रात्री सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो, असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, आदी वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. जगप्रसिद्ध कॅरोल्स् असे म्हटले जाते –

“Jingle Bells, Jingle Bells…
Santaclause is coming along…”

जवळपास इ.स.३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा, असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो. तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या संतशिरोमणी मॅथ्यू आणि संतश्रेष्ठ ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत, त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू.३३६ मध्ये रोम येथे नाताळ (ख्रिसमस डे) साजरा झाला, असे मानले जाते.

गीता जयंती –
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात.

एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात नाविन्यपूर्ण व नवलाईची गोष्ट असेल. त्यातून या ग्रंथाची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते. यातील ज्ञानाने मानवास ब्रह्मानंद व मोक्षमार्ग गवसतो. म्हणून तो मोक्षशास्त्र ठरतो. याची निर्मिती मार्गशीर्ष शुक्ल एकादशीस झाली. त्यामुळेच या जयंती उत्सवास ‘मोक्षदा एकादशी’ म्हणण्याचा प्रघात पडला असावा. नाना धर्माच्या लफड्यात न पडता परमात्मा (श्रीकृष्ण) यास शरण जाऊन मोक्ष प्राप्ती करा, ते असे –

“सर्वधर्मान्परित्यज मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।।”
[पवित्र भगवद् गीता : अध्याय १८वा : मोक्ष संन्यास योग : श्लोक क्र.६६.]

दि.७ सप्टेंबर इ.स.पू.३००८ रोजी भगवंताने अर्जुनास गीता उपदेशीली. ती महाभारत ग्रंथाचा अंश आहे, असे म्हटले जाते. समग्र महाभारताचे नवनीत सार महर्षी व्यासांनी त्यांत घातले आहे. त्यांची ती मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. गीतेत एकूण अध्याय १८ व श्लोकांची संख्या ७०० आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला असून ते उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार त्यांत आहे. म्हणूनच हा धर्मज्ञानाचा कोष आहे. त्यास ‘गीतोपनिषद’ असेही म्हटले जाते. आपले काम निष्काम भावनेने पूर्ण करावे, असे त्यात सांगितले आहे –

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।”

[पवित्र भगवद् गीता : अध्याय २रा : सांख्ययोग : श्लोक क्र.४७.]
हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील, काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मंत्रमुग्ध केले आहे. भगवद् गीता मानव जातीस जगण्याची हिंमत आणि तेज देते, जीवनाचा पुरुषार्थ स्पष्ट करून दाखविते. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनविले. परंतु प्रत्यक्षात विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा त्यात चिरंतन मार्ग दाखवला आहे. मनुष्याने नरजन्माचे सार्थक केले पाहिजे. संधीचे सोने करावे, असे आंग्ल कवी बेंजामिन फ्रॅन्कलिन यांनी लिहिलंय –

“Cocks crow in the morn; To tell us to rise.
And who live late; Will never be wise.”

मौनी एकादशी –
मौनी एकादशी अर्थात मगसिर सुदी (मौन ग्यारस) या दिवशी जैन धर्माचे श्रद्धाळू बांधव मौनव्रत पाळतात. त्यासोबतच पौषध व्रत, लोगस्सचा कार्योत्सर्ग, खमासणा, स्वस्तिक आणि जप पदाचे उच्चारण आदी करतात. हा त्यांचा मंगलमय पर्व असतो. मौनव्रत पाळल्याने समस्त पाप-तापांतून मुक्ती मिळते. यालाच कर्म क्षय करण्याचा प्रमुख दिवस मानण्यात येतो. या दिवशी जैन उपाश्रय, मंदिरे, प्रार्थना स्थळे, धर्मस्थळे आदी ठिकाणी विशेष धर्म-आराधना केली जाते.

या दिवशी व्रतस्थ राहून धार्मिक क्रिया व पूजापाठ केल्याने दीडशे पटपेक्षाही अधिक पुण्यफळांची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे पाप कर्मे केली नाहीत, तर त्याची फळेही दीडशे पटीहून जास्तच मिळू शकतात. यास न जुमानता पापाचरण आचरिले तर ती पातकेही त्याच प्रमाणात आपल्या झोळीत सांठविली जातील. म्हणून पुण्य जोडावे, अशी त्यांची समजूत आहे. या दिवशी हे स्तोत्र म्हटले जाते –

“करे लोह को हेम पाषण नामी, रटे नाम सो क्यों ना हो मोक्षगामी ।

करै सेव ताकी करै देव सेवा, सुने बैन सोही लहे ज्ञान मेवा ।।८।।
जपै जाप ताको नहीं पाप लागे, धरे ध्यान ताके सबै दोष भागे ।बिना तोहि जाने धरे भव घनेरे, तुम्हारी कृपातै सरै काज मेरे ॥९॥”
[पवित्र जिनवाणी संग्रह : श्री पार्श्वनाथ स्तोत्र]

या पावन दिवशीच धर्माचे १८वे तीर्थंकर श्री अमरनाथ भगवान, १९वे तीर्थंकर श्री मल्लिनाथ भगवान आणि २२वे तीर्थंकर श्री नेमिनाथ भगवान यांनी प्रापंचिक जीवन त्यागून दीक्षा घेतली व ज्ञान प्राप्त करून साधूत्व स्वीकारले होते. माणसाने अमूल्य मानवजन्म एका परमेशाच्या प्राप्तीने सुसफल करून घ्यावा. प्रेम, दया, माया, शांती, समाधान, बंधुभाव आदी हे दिव्यगुण जीवनात तेव्हाच उतरतील. अशी संतोक्ती ग्वाही देते 

“आपुला तो देव एक करोनि घ्यावा ।
तेणे विना जीवा सुख नोहे ।।”
!! प्रेमाने बोलुया जी, धन निरंकार जी !! या त्रिवेणी संगम सणांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

✒️लेखक:-‘बापू’ – श्रीकृष्णदास निरंकारी.
[विश्वबंधुत्व मिशनचे सदस्य व मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश]मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,
रामनगर-२०, गडचिरोली.
पो.ता.जि. गडचिरोली
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
email – krishnadas.nirankari@gmail.com