संत गाडगेबाबा

    46

    स्वच्छतेचा महान संदेशानी
    गावागावाची सफाई केली.
    किर्तनाच्या माध्यमातूनी
    मनामनातील घाण साफ केली…

    माणसाला माणूस जोडूनी
    समानतेची पेरणी केली.
    ढोंगीपणाच्या नायनाटासाठी
    स्वतःची वाणी बुलंद केली….

    धर्मशाळेच्या कार्यातूनी
    विषमतेला मूठमाती दिली.
    वऱ्हाडी भाषेच्या गोडीतून
    जनक्रांतीची नीव रोवली….

    बाबासाहेबांच्या क्रांती प्रेरणेची
    सतत अग्नीज्वाला तेवत ठेवली.
    अंधरूढीच्या पाखंड्यावर
    सत्यवाणीची मशाल धरली…

    बहुजनाला सोबत घेऊनी
    माणूसकिची ज्याेत पेटवली.
    कामाशिवाय अन्न न घेता
    कष्टांची महती घडवली…

    समाजउत्थानासाठी जीवन वाहुनी
    अख्खा महाराष्ट्रात जागृती केली.
    देव नसणाऱ्या दगडावरती
    शब्द वज्राची तोफ डागली….

    धर्म गुलामीत अडकलेल्यांना
    सत्यधर्माची संजीवनी दिली.
    सत्यशोधक स्वतः बनूनी
    माणूसकिची ऊर्जा दिली….

    गाडगेबाबा रंजल्यागांजल्याचा
    कैवारी बनला तुम्ही.
    माणसात देव शोधणारा
    संत बनला तुम्ही…

    ✒️संदीप गायकवाड
    नागपूर(मो:-९६३७३५७४००)