जंगलूजी दरेकर यांनी केलेली भजनसेवा कौतुकास्पद- बंडोपंत बोढेकर

29

🔸गोवरी येथे श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ९२ वर्षीय ज्येष्ठ भजनगायक जंगलूजी दरेकर यांचा गौरव

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.28डिसेंबर):-थोर तत्त्वज्ञ वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी आपल्या हिंदी मराठी राष्ट्रीय भजनांच्या माध्यमातून जनतेला जागृत करण्याचे महान कार्य केले. त्यांच्या भजनात सांगितलेली अध्यात्म आणि विज्ञानाची योग्य सांगड लक्षात घेऊन आपण गावात एकतेचा सेतू मजबूतपणे बांधला गेला पाहिजेत . भजनांच्या तात्त्विक कार्यस्फुर्तीने प्रेरणा घेत गावात श्रमदान, स्वच्छता अभियान , अंधश्रध्दा निर्मुलनाचे महत्त्वाचे कार्य सामुदायिक पध्दतीने केले गेले पाहिजेत .भजनांतील संतवाणीने अंतरंगी रंगून ग्रामसेवेच्या कार्यात उत्स्फुर्तपणे जो रंगतो तोच खरा भजनकरी असतो , असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी गोवरी येथे केले.

श्रीगुरूदेव सेवा मंडळ , राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि दरेकर परिवार गोवरी च्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी राजुरा तालुका सेवाधिकारी ॲड. राजेंद्र जेनेकर , गोवरीचे ज्येष्ठ भजन गायक जंगलूजी दरेकर , उर्जानगर श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मुर्लिधर गोहणे , महादेव दरेकर , भाऊराव बेदरकर आदींची उपस्थिती होती. प्रास्तविक शंकर दरेकर यांनी करून ज्येष्ठ भजनगायक जंगलूजी दरेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ॲड . जेनेकर यांनी तालुक्यातील श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या कार्याचा आढावा घेत कोरोना च्या काळात सेवा मंडळांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.

मुर्लिधर गोहणे , सौ. ज्योती दरेकर यांनीही समयोचित विचार मांडले. याप्रसंगी आजवर दिलेल्या सेवा कार्याबद्दल ९२ वर्षीय ज्येष्ठ भजनगायक जंगलूजी दरेकर यांचा दरेकर परिवार गोवरी तसेच उर्जानगर श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे मानवस्त्र स्मृतीचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तर दरेकर परिवाराच्या वतीने ९२ श्रीगुरूदेव कॕलेंडर आणि ९२ ग्रामगीता ग्रंथाचे वितरण उपस्थित ग्रामस्थांना करण्यात आले. सूत्रसंचालन इंजि. विलास उगे यांनी केले. कार्यक्रमास प्रा. श्रावण बानासुरे , भास्कर लोहे, देवराव कोंडेकर , गणेश दरेकर , महादेव हुलके , जानबाजी गांवडे आदी प्रचारक मंडळीची उपस्थिती होती . कार्यक्रमाची सुरूवात सामुदायिक प्रार्थना आणि खंजेरी भजनाने झाली. खंजेरी भजनांचे सादरीकरण उर्जानगर श्रीगुरूदेव सेवा मंडळानी केले होते . गावाचे आराध्य राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज आणि मोहनगीर बाबा यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. भजन आणि मार्गदर्शनामुळे गोवरी ग्रामस्थ आनंदीत झाले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कवी प्रकाश काळे , सौ. पंचफुला दरेकर , सौ. गोहणे, सौ. नम्रता दरेकर ,सौ.कोंडेकर , कु. बंदिनी दरेकर , सौ. सुषमा उगे, कु. प्रज्योनी दरेकर , अवांशकुमार आदींनी अथक परिश्रम घेतले. छोटेखानी स्वरूपात सामाजिक अंतर पाळत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . सॕनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली होती . कार्यक्रमात प्रथमतः कोरोना नियमांची माहिती सर्वांना देण्यात आली.