डिकास्ट का झाले पाहिजे ?

34

एकीकडे भाजप आरेसेस सारख्या कट्टर वैदिक हिंदुत्ववादी पक्ष-संघटना “जात” संस्था बळकट करण्यासाठी सामदामदंडभेद (अ)नितीचा वापर करून देशात जातीय अराजकता माजवतात,जातीय विष पेरत असतात त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजन हितवादी अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना स्वतः “डिकास्ट” होण्यासाठी सल्ला देतात. केवळ सल्ला देऊन थांबत नाहीत तर कार्यकर्त्यांना प्रेरित करतात हि बाब लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

बावीस डिसेंबर रोजी नागपुरात पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.शिबिरार्थींना संदेश देताना अॅड बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की,” चळवळ हि लोकांची असते.चळवळीमध्ये आपण जेवढे अधिकाअधिक प्रवाहांचा समावेश करून घेऊ तेवढी चळवळीची ताकद वाढते अन हे करून घ्यायचे असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा स्वतः “डिकास्ट” होणे गरजेचे आहे.” अॅड बाळासाहेब आंबेडकरांचे हे भाष्य जातीअंताच्या लढाईतील महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे त्याहीपेक्षा अलुतेदार , बलुतेदार या वंचित समूहाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्याचा सोपा आणि प्रशस्त एककलमी राजमार्ग होय.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कधी जातीच्या नावाखाली, तर कधी धर्माच्या नावाखाली अठरापगड अलुतेदार बलुतेदार बहुजन समाजात फुट पाडून “डिव्हाईड अँड रूल ” नितीनुसार मुठभर सरंजामदारांनी राजकीय सत्ता कायम आपल्या कुटुंबातच कैद केली. वंचित समूहाला राजकीय सत्तेची फळे चाखूच दिली नाही.राजकीय सत्तेच्या फायद्यांपासून कोसो लांब असलेल्या वंचित समूहात “राजकीय सत्ता मिळवणे आपले साध्य नाही तर ते केवळ विशिष्ट उच्च जातीतील विशिष्ट लोकांनीच उपभोगायची बाब आहे” हि पराकोटीची उदासीनता, नैराश्याची भावना जाणीवपूर्वक निर्माण करण्याचे षडयंत्र सत्तादांडग्यांनी आजवर केलेले आहे.

सत्तेची मक्तेदारी घेतलेल्या राजकीय पक्षांनी ” जात” व्यवस्था एवढी घट्ट करून ठेवली आहे की,अलुतेदार बलुतेदार समूह जातीच्या उतरंडीत पार अडकून पडला आहे.या व्यवस्थेवर कोटी करताना अॅड बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की,” भारतीय व्यवस्थेमध्ये बघीतले तर कुठलीही जात घ्या,या जातींमध्ये साडेतेरा जाती दिसतात.हि अर्धी जात कुठून आणली हेच मला कळले नाही? वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणे लागतात हे समजू शकते! परंतु स्वतःच्या साडेतेरा जातीत आपसात जातीच्या उच्च निच्चतेवरून भांडणे लागतात न समजण्यासारखे आहे ?”जाती जातीत आणि पोटजातीत संख्येने मोठा असलेला बहुजन समाज आपसात भांडत राहिला व जातीचे- पोटजातीचे उच्च निच्च , श्रेष्ठ कनिष्ठत्व जोपासात राहिला तर राजकीय सत्तेपासून अजूनही दूरच राहणार आहे. याची गंभीरता ओळखून बाळासाहेब आंबेडकर म्हणूनच आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देताना म्हणतात,” कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा “डिकास्ट” झाले पाहिजे.

डिकास्ट झालो म्हणजे “मी अमुक एका जातीचा नाही”. हि भावना ठेवली तर मग तो कोण होतो ? तर तो पहिल्यांदा “मानव” होतो.मानव झाला म्हणजे तो इतरांचे सुखदुःख समजून घ्यायला सुरुवात करतो, इतरांना जोडायला सुरुवात करतो. कार्यकर्ता डिकास्ट झाला नाही तर जातीची सगळे बंधनं घेऊन तो चळवळीमध्ये येतो.मग तो संघटन करण्याऐवजी विघटनच करत राहतो” असा गंभीर इशाराही अॅड बाळासाहेब देतात. आणि पुढे सांगतात की, “माणसं विचाराने जोडली जातात. तो विचार प्रवाह सगळ्यात महत्त्वाचा आहे” निवडणूकांमध्ये विजय संपादन करायचा असेल तर कार्यकर्त्यांनी डिकास्ट झाले पाहिजे याचाही ते पुनर्राच्चार करतात.

“राजकीय सत्ता हि अनेक प्रश्नांची गुरूकिल्ली आहे” असे अलुतेदार बलुतेदार समूहाला उद्देशून बाळासाहेब आंबेडकरांनी अनेकदा सांगितले आहे.गावगाड्यातील अलुतेदार समूहांची संख्या फार मोठी आहे. परंतु एक जात समूह घेतला तर त्याची लोकसंख्या फार कमी आहे. त्यांनाच मायक्रो ओबीसी म्हटल्या जाते.अशा मायक्रो ओबीसी, आदिवासी, जाती- जमातींमध्ये सरंजामदारांविरूध्द लढण्याचा आत्मविश्वास हरवलेला आहे. अशा वंचित समूहांमध्ये राजकीय आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्वपूर्ण वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून अॅड बाळासाहेब आंबेडकर करत आहेत.

फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणारे कॉंग्रेस – राष्ट्रवादी सारखे राजकीय पक्ष आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे घ्यायचे आणि निती मनुवाद्यांसारखी ठेवायची.वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याच्या प्रकरणी तोंडदेखलेपणा करायचा.हे पक्ष मोठमोठ्या घोषणा करतात आणि आपल्याच घोषणा हवेत कधी विरून जातात हे त्यांच्याही लक्षात राहत नाही.लोकांच्या विस्मरण शक्तीचा हे पक्ष सातत्याने फायदा घेताना दिसतात. ओबीसी, मायक्रो ओबीसी, मुस्लिम, अनुसूचित जाती जमाती यांच्याबद्दल (पूतना मावशीचे ) प्रेम दाखवायचे आणि या समूहातील कोणालाही निवडणूकीचे तिकीट द्यायचे नाही. ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत आपल्याच एका विशिष्ट उच्चभ्रू जातीतील कुटुंबात राजकीय सत्ता कायम ठेवण्याची धडपड हे पक्ष करत असतात.साध्या ग्रामपंचायतीची सत्ता सुध्दा ह्यांना ओबीसी, मायक्रो ओबीसींच्या हातात द्यावीशी वाटत नाही.

या सरंजामशाहीला छेद देण्याचे काम अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केले.जो अलुतेदार बलुतेदार समूह सरंजामदार सत्तादांडग्यांच्या खिसगिणतीतही नव्हता त्या समूहाचा राजकीय पटलावर ठसा उमटविण्यात अॅड बाळासाहेब आंबेडकरांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. मायक्रो ओबीसींची त्या त्या मतदारसंघात लोकसंख्या नगण्य असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मायक्रो ओबीसी समूहातील लोकांना लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे तिकटे देण्यात आले. त्या उमेदवारांना लोकसभेत लाखोंच्या संख्येने मतदान झाले. विधानसभेत हजारोंच्या संख्येने मतदान झाले. बाळासाहेबांच्या या किमयाने करिश्मा केला.केवळ मतदाना पुरता वापरून फेकून देणारा मायक्रो ओबीसी अनु.जाती जमाती,आदिवासी समूह राजकीय पक्षांचा “दखलपात्र” झाला.हा राजकीय पटलावरील बदल अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या “डिकास्ट ” भूमिकेमुळेच झाला यात तिळमात्र शंका नाही.कार्यकर्त्यांनी अॅड बाळासाहेब आंबेडकरांचा संदेश आदेश मानून त्या तत्वप्रणालीवर काम केल्यास निवडणूकीत हमखास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.

✒️लेखक:-सुरेश शिरसाट, अकोला
मो:-8999558949

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो-8080942185