अजिंक्य’तारा चमकला

35

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान चालू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार कामगिरी करीत पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ( एमसीजी ) चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावात रोखला. भारतीय फलंदाजांनीही पहिल्या डावात अप्रतिम कामगिरी करीत १३१ धावांची आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले आहे.

भारतीय संघाच्या या अप्रतिम कामगिरीचे श्रेय हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याला जाते. अजिंक्य रहाणे याने या कसोटीत संघाची धुरा सांभाळताना अप्रतिम नेतृत्व केले आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना २०० च्या आत रोखण्याचे श्रेय जितके गोलंदाजांना जाते तितकेच कर्णधार अजिंक्य रहाणे याला जाते. अजिंक्य रहाणे याने आपल्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवत क्षेत्ररक्षकांची रचना केली. त्याने लावलेल्या क्षेत्ररक्षणाप्रमाणेच गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यामुळे ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी चुका केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशाने हे भरवशाचे फलंदाज त्याने रचलेल्या जाळ्यात अडकल्यानेच बाद झाले.

त्याने गोलंदाजांचाही योग्य वापर केला. त्याच्या नेतृत्वगुणाचे अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी कौतुक केले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजनसिंग या माजी खेळाडूंनी त्याची प्रशंसा केली. फलंदाजीतही त्याने कमाल केली.संघ अडचणीत असताना त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करीत शतक झळकावले. २ बाद ६१ अशी संघाची अवस्था असताना हनुमा विहिरी, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या युवा खेळाडूंना हाताशी धरुन त्याने किल्ला लढवत भारताला महत्वपूर्ण अशी आघाडी मिळवून दिली.

आपल्या संयमी खेळीने त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. ११२ धावांची त्याची खेळी दुर्दैवाने धावबाद झाल्याने समाप्त झाली नाही तर भारताला आणखी आघाडी मिळाली असते. अजिंक्य रहाणे याने जी संयमी खेळी केली ती युवा खेळाडूंसाठी आदर्श अशी होती. खडतर परिस्थितीत कशा प्रकारे फलंदाजी करावी याचा वस्तुपाठच त्याने युवा खेळाडूंना घालून दिला. त्याच्या शतकी खेळीने भारताला सामन्यावर वरचष्मा मिळवता आला. आता दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी पहिल्या डावाची पुनरावृत्ती केली तर भारत ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधू शकतो त्यासाठी भारतीय खेळाडूंनी कर्णधार अजिंक्य रहाणेचा आदर्श ठेवून संयमी खेळ करायला हवा.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५