मनोहारी गाव माझा

25

किती रम्य नजारा
भुरळ घाली मनाला
किलबिल पाखरांची
सुखावती कानाला

मखमालीसम हिरवी तृणपाती आणि त्यावर पडलेले उगवत्या भास्कराचे कोवळे सोनकिरण. अहाहा! निसर्गाचा किती रम्य, मनोहारी हा देखावा! पाहताच डोळे तृप्त होतात…. भास्कराच्या सहस्त्ररश्मी तृणपात्यांवरील दवबिंदूंना रुपेरी वर्खात चमचमवतात…..ते दवबिंदूंचे टप्पोरे थेंबही हिऱ्याप्रमाणे खुलून दिसतात. जणूकाही ही वसुंधरा नवथर तरुणीचा साजच लेवून बसली आहे…. हिरवळीचा मखमाली शालू तिला शोभून दिसतो. मधेच गुलाबी थंडीचा शहारा तनामनाला मोहवितो अन् त्या मखमाली हिरवळीवर अनवाणी चालताना तळपायांना गुदगुल्या होतात……..दूरवर दिसणाऱ्या निळा डोंगर टेकड्या हिरवळीने फुललेल्या दिसतात. शेतातील कणसांच्या ओंब्या मोत्यावाणी सजून-धजून टचटचून भरलेल्या दिसतात……….. पाखरांचा थवा किलबिलाट करत कणसावर बसतो आणि हळूच कुठूनतरी भिरभिरत येणारा गोफण गुंडा शिवारात पडतो. घाबरलेल्या पाखरांचा थवा भूर्र करत चटकन नभात झेपावतो…….. सृष्टीच्या या रमणीय सौंदर्याचे पान करत चालताना वाटते याहून स्वर्गीचे नंदनवन काही निराळे असेल का?……… शिवार टचटचीत दाण्यांनी फुललेले पाहून बळीराजाही सुखावलेला असतो.

देवावाणी शेत माझं
नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या
शेतात गावलं

अशी आनंदाची गाणी म्हणत बळीराजा ढवळ्या पवळ्याच्यासंगे मजेत शिवारात फिरत पिकाची राखण करत असतो……. जणू काही आपला आनंद ढवळ्या पवळ्यासंगे वाटून घेत असतो. लवकरच त्याचा हा माल बाजारात जाणार असतो आणि त्याच्या हातात पैसा खुळखुळणार असतो. आता घरधनीणीला साडी आणि पोरांना कपडे घेऊन त्याला खुश करायचं असतं……

आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे

गुलाबी थंडीच्या ऋतूमध्ये सगळीकडे आल्हाददायक , तजेलदार वातावरण असते. सृष्टीतील प्रत्येक सजीव फुलून, उमलून गेलेला असतो. थंडीत जेवणही चांगल्याप्रकारे जात असते. पोटाला उबारा मिळण्यासाठी गरम भजी, चहा अशा खाण्याची रेलचेल असते. पशुपक्षीही खुशीने बागडत असतात. सौंदर्याचा हा साज भरभरून लुटत असतात. रोपट्यांवरची फुलेही आनंदाने डोलत असतात…….रानवारा भूल घालत पानांपानांमधून सळसळत असतो आणि फुलांचा सुगंधी परिमळ साऱ्या परिसरात पसरवत असतो…….. साऱ्या परिसराला एक वेगळ्या प्रकारचा तजेला,चैतन्य आलेले दिसते. जणूकाही सृष्टीतील हरेक सजीव थंडीचे स्वागतच करत असतो. पहाटेला बायका लवकर उठून जात्यावर दळण दळत असतात. त्यांच्या गोड गळ्यातील ओव्या कानाला हव्याहव्याशा वाटतात. त्यांची लेकरे ती अंगाई समजून त्यांच्या मांडीवर पहूडलेली दिसतात. धन्याला न्याहारी करण्यासाठी त्यांची घाई चाललेली असते. मंदिरातल्या काकडारतीचा आवाज आणि घंटेचा घणघणाट कानावर पडताच प्रसादासाठी पोरे तिकडे धावत सुटतात. पुजारी आणि काही भक्त मंडळी देवाच्या भजनात, आरतीत मग्न असतात………
विठु तुझ्या दारी आलो

जपतो रातदिन तुझे नाव
व्हावा शेवट गोड आमुचा
सुखी रहावे आमचा गाव

असेच गावकरी आणि भक्त गण ग्रामदेवतेला आळवीत गावाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी प्रत्येक जण झटून काम करत असतो. जगाच्या एका कोपऱ्यात वसलेले आमचे हे खेडेगाव सुधारित व्हावे अशीच प्रत्येकाची इच्छा असते. ग्रामपंचायतीचे सदस्य टेबलावरील फाईली चाळत हिशोब करत बसलेले असतात. ग्राम सुधारणांसाठी निधी कसा मिळवायचा याचा ठोकताळा मनाशी करत गावचा विकास करण्याचे स्वप्न पहात आहेत. ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक गावासाठी सहकार्य करतात. गावात सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी ते बांधील असतात. त्यामुळेच आज गावांगावात संपन्नता, वैभव पाहायला मिळते.

नका दुखवू मुक्या जीवांस
लेकरे लाडकी देवाची सारी
घालवू आयूष्य हे सुखातच
येईल बोलावा देवाच्या द्वारी

उमललेल्या फुलांवरचे मध टिपून घेण्यासाठी भ्रमर, मधमाशा आणि फुलपाखरे गुणगुण गाणी म्हणत गुंजन करत असतात आणि फुलांवर भिरभिरत असतात. त्यांच्या मनाजोगे मधुपान झाल्यावर ते आपले सुंदर पंख पसरवत इकडून तिकडे फुलांवरती उडत असतात. फुलपाखरेही इतक्या रंगांची आणि आकारांची असतात की फुल कोणते नि फुलपाखरू कोणते हे ही ओळखून न यावे! त्यांना पकडण्यासाठी इवलीशी मुले त्यांच्या मागे धावत असतात…….. पण ते मुळीच हाताला लागत नाहीत. मधमाशांची सुंदर तान कानावर येताच उगाच घाबरायला होते….. निसर्ग जणू सांगत असतो, माझ्या अंगाखांद्यावर खेळण्याचा सर्वांना अधिकार आहे. माझ्या कुशीत वाढणारी ही सर्व माझीच लेकरे आहेत. हे मानवा, तू आता माझा विध्वंस करून या मुक्या जीवांना बेघर करतोस. किती यातना होत असतात या मुक्या जीवांना!

वृक्षतोड करून तू चिमण्या पाखरांना निराश्रित करतोस मानवा! त्यांची घरटी पडून जातात आणि त्यातील पिल्लेही मरून जातात.माझ्या झाडां, वृक्षांवर कितीतरी पक्षांनी आपली घरटी विणलेली असतात . त्यात ते सुखमय जीवन स्वच्छंदी रितीने जगत असतात. वृक्षांची कत्तल करून तू त्यांना बेघर केलेस त्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. त्या चिमण्या चोचींना चिमणचाराही आता मिळत नाही.तुझ्या बुद्धिमत्तेच्या जीवावर तू निसर्गावर मात करू पहात आहेस, परंतु त्याचे विपरीत परिणाम तुझ्याच जीवनावर होत आहेत हेही तितकेच खरे आहे. तेव्हा हे मानवा, आता निसर्गाचा विध्वंस थांबव. थोडं आवरतं घे आणि माझ्या अंगाखांद्यावर या चिमण्या पाखरांना, पशुपक्ष्यांना खेळू दे, बागडू दे. मग बघ ही निसर्गसृष्टी अजून किती फुलेल, बहरेल. तुला भरभरून वैभव प्राप्त होईल.झोंबणारा वारा अंगावर झेलत पाखरे चिमणचारा शोधण्यास उंच आकाशात झेपावतात. त्यांच्या पिल्लांना मोठे होण्यासाठी बळ हवे असते.

वृक्षांवरच्या घरट्यात बसलेली ही चिमणी पिलं चिव चिव करत चिमणचाऱ्यासाठी आपल्या आई-बाबांची वाट पाहत असतात. किती प्रेम माया वसतेय या मुक्यां जीवांत देखील. सृष्टीचे हे मनोहारी रूप जणू कॅमेऱ्यातच कैद करून ठेवावेसे वाटते. डोळ्यात मावणार नाही इतका सुंदर हा नजारा! तो पाहताना देखील आपले हृदय विशाल बनवून जाते.आपणही ह्या फुलपाखरे, पक्षी, प्राणी, वनचर यांच्याप्रमाणे बागडावेसे, नाचावेसे वाटते आणि मन मयूर प्रफुल्लित होऊन जाते

बागडावे स्वच्छंद मुक
विशाल अशा सृष्टीवरी
झंकारून उठते तनमन
नाचावे बनुनी निलांबरी

गायरानात सोडलेल्या गाई, म्हैशी, वासरे मनसोक्त हुंदडत असतात. मध्येच अंगचटीला आलेले वासरू आईच्या पोटाला ढूशा देऊ लागताच गाय त्याला शिंगा उगारून धुडकावून लावते. वासरूही मस्त रानचा वारा पीत स्वच्छंदपणे नाचत असते. कोवळे ऊन पिताना त्यांना मस्ती करण्याची लहर कधीकधी भावंडांशी कोवळ्या उगवलेल्या शिंगांनी ढूशा देत राहतात. जवळच्या रानातून चुकारीने बाहेर आलेली हरणे, काळवीटे, सांबरे शत्रूची चाहूल घेत निमूटपणे चरत असतात.आपली शिकार होऊ नये म्हणून हरणे, ससे देखील कान उभारून तृणपात्यांचा आस्वाद घेत असतात. दुपारी उन्हाचा तडाखा लागताच सर्व खिल्लार झाडां खाली सावलीत शांतपणे रवंथ करत बसते. काही जनावरे थकून तिथेच डुलक्या घेतात. नुकताच पावसाळा संपून गेल्यामुळे धरित्री फुला फळांनी आणि हिरव्यागार तृणपात्यांनी फुललेली दिसते. तिची शोभा अवर्णनीय दिसते.

पाऊस थांबल्यामुळे मोठे धबधबे कमी होऊन छोटे बनत गेले. छोटे बनलेले ओढे, ओहळ दरीतून खळाळत खाली पडताना दिसतात. त्यांचा खळाळणारा मंजुळ नाद कानाला सुखावतो. नदीला भेटण्यासाठी ते उतावळे झालेले असतात. पहाटेपासून कुईकुई आवाज करणारा गावकुसाबाहेरचा रहाटही आता विसावला आहे. गावातले सर्व स्त्रियां, पुरुष घरातील पाण्याची सोय करून आपापल्या कामाला लागले आहेत. बळी देखील न्याहारी करून खांद्यावर नांगर टाकून ढवळ्या पवळ्यासंगे शिवारात गेलेले आहेत. घरधनिणी धन्याला दुपारची शिदोरी बनवण्यात व्यस्त आहेत. त्यांची पोरे झाडावरच्या फांदीवर बसून पाव्यातून मधुर स्वर छेडत आहेत. किती शांत आणि रमणीय दृश्य हे!

मंदिरातल्या घंटेचा किणकिणाट मधूनच कानावर पडतो. घरातून बाहेर पडणारा प्रत्येक जण आपल्या कामावर जाण्यापूर्वी मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेत असतो.आजचा आपला दिवस सुखाचा जावा म्हणून देवाला आळवत असतो. गावातील वयोवृद्ध लोकं कोवळी ऊन्हं पिवून गावच्या पारावर किंवा मंदिरातल्या पायरीवर टेकले आहेत. नुकतीच न्याहारी आटोपल्याने देवाचे नाव घेत शिळोप्याच्या गप्पा करत आहेत.

झिजली काया करण्या
कष्टही जीवनात अपार
जपू नामजप देवाजीचे
जीवननौका होईतो पार

आयुष्यभर शेतात, घरात कष्ट करून वृद्ध झालेली ही मंडळी आता देवाचे नाव घेत मंदिरात विसावा घेत असतात. देवाचे बोलावणे येईपर्यंत ईश्वराचे नाम संकीर्तन, भजन करण्यात दंग असतात.मंदिरासमोरून शेळ्यांचा कळप बें बें करत रानच्या वाटेला लागलेला दिसतो. त्यांचा धनगर मालक खांद्यावर घोंगडी आणि घुंगरूवाल्या काठीला शिदोरी बांधून शेताकडे चाललेला दिसतो. संध्याकाळपर्यंत शेळ्या मस्त चरून रात्रीला भरपूर दूध देतील म्हणून खुशीत शीळ घालत असतो. शाळेत जाणारी इवलीशी पोरे शाळेत स्थिरावली आहेत. कोण कविता तर कोण गणिताचे पाढे गुणगुणत आहेत. मिशीवाले मास्तर हातात दंडुका घेऊन मुलांना शिकविताना दिसतात. किती आल्हाददायक वातावरण !……….

नाही गाड्यांचा खडखडाट ना भोंग्याचा आवाज. निरव शांतता आणि शिस्तबद्ध आयुष्य जगताना असणारा आनंद अवर्णनीय आहे. ऊर फाटेस्तोवर पैशाच्यामागे पळायला नको, पैशाची चिंता नाही अन मॉल, शॉपिंगची घाई नाही. निवांत दोन वेळचे पोटभर जेवून समाधानी असणारा गाव शहराहून किती सुखी असतो हे चित्र दिसते. उद्याची चिंता करत उगाच काळजीचे ढग मनात जमायला नको. नाही गाड्यांची रहदारी आणि प्रदूषणाची भीती.निसर्गाच्या सानिध्यात अंगमेहनत करून जगणारा बळी प्रदूषणविरहीत जीवन जगतो. जिथे बी.पी, मधुमेह अशा आजारांना थारा नसतो.

नको वेगळे जीम आणि श्वास खेचण्यासाठी प्राणायाम. रानच आवारा हाच त्यांचा श्वास नि प्राणायाम.नकोत लाखो, कोटी रुपयांचे घरे आणि ते कर्ज फेडण्यासाठी ऊर फाटेस्तोवर पळणे .नको मुलांना एबीसीडी हायफाय शिकवणाऱ्या इंग्रजी शाळा. अमृताहुनी रसाळ आपल्या मायबोलीत शिक्षण देणाऱ्या मराठी शाळाच बऱ्या.चार भिंतीतल्या शाळेपेक्षा शेतीमातीचे धडे शिकवणारी भिंतीबाहेरची शाळाच मुलांना सर्व व्यवहारज्ञान शिकवते. मुले त्यातूनच तावून सुलाखून निघतात आणि आपल्या आयुष्याची प्रगती साधून घेतात.वृक्षावरच्या पाखरासंगे शाळा शिकणारी ही मुले सर्व कौशल्य प्राप्त करून घेतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपले वास्तव्य साधतात.

नको शिकणे इंग्रजांचे
हवी आम्हांस अआइई
शिकविते जीवन विद्या
प्रिय मराठमोळी आई

✒️लेखिका:-सौ.भारती सावंत
मुंबई(मो:-9653445835)