[ग्राम पंचायत निवडणूक सल्ला]

सध्या महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे सुरू आहे. आपल्या गावाचा कारभार सुरळीत चालवून गाव पातळीवरच गावाचा विकास करुन घ्यायचा हा ग्रामपंचायत चा मुख्य उद्देश असतो. निवडणूक कोणतीही म्हणली तर त्यामध्ये लढत आणि जय पराजय होतच असतो. परंतु ग्रामपंचायत निवडणूक समजून घेणे गरजेचे आहे कारण एक निवडणूक आपल्या गावाचे रंग रुप सर्व काही बदल घडवू शकते. ग्रामपंचायत हि गावची संसद असते आणि म्हणून या संसदेच्या माध्यामातून आपल्या गावात कायदा सुव्यवस्था कायम ठेऊन गावचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे असते. म्हणून या गावच्या संसदेमध्ये गावातील तरुणांनी सहभागी होणे अत्यंत गरजेचे असते. गावातील ग्रामपंचायत म्हणजे गावासाठी सर्वोच्च असते असते. गावातील शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, यासोबतच गावात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तरूणांचे कौशल्य विकास, ग्राम विकासावर भर देऊन ग्रामपंचायचे काम गावाचे नाव नौकलोकिक करण्याची संधी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक होय.

आपण बघतोय बऱ्याच गावातील ग्रामपंचायत विशिष्ट लोकांच्याच हाती असतात. निवडणुक झाली तरी ग्रामपंचायत समिती व सरपंच बहुतांश तेच ते असतात. यामुळे लोकांचा मताधिकार व ग्रामपंचायतचे महत्त्व आपोआप कमी होत असते. तेच ते चेहरे जर ग्रामपंचायत मध्ये जात असतील आणि गावाचा विकास काही होत नसेल, गावातील सांडपाण्याच्या व्यवस्थापनापासुन तर सर्व मुलभुत सुविधा पर्यंत व्यवस्थित सुविधा मिळत नसेल तर दरपाचवर्षी निवडणुक घेउन फायदा काय. निवडणुकिचा उद्देशच असतो सत्तेत असलेल्या लोकांनी जर लोक विकासाची कामे केले नाही तर त्यांना खाली बसवून दूसऱ्यांना संधी निर्माण करून दिली जाते. आणि यामध्ये युवकांचा सहभाग असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावामध्ये ग्रामसमस्या अनेक वाढलेल्या असताना आणि वारंवार तेच ते लोक निवडणूक लढवून ग्रामपंचायत मध्ये जात असतील याचा अर्थ तेथील युवा वर्ग झोपलेला आहे. आपल्या शिक्षणाचा व क्षमतेचा वापर तो आपल्याच गावासाठी करण्यास सक्षम नाही असा त्याचा अर्थ होतो.

काही काही ग्रामपंचायत खुप चांगल्या प्रकारे काम करून स्वतःच्या गावाचे नाव लौकिकासोबतच ग्राम विकास करून घेतात. त्या गावामध्ये गेले तर आपल्याला विकास काय असतो, इमानदारी काय असते याची प्रचिती येत असते. जर काही ग्रामपंचायत खूप काही प्रगत करून गावातील लोकांना सर्व सुविधा मोफत देऊ शकतात तर इतर ग्रामपंचायत का देऊ शकत नाही याचे उत्तर शोधले तर काही काही ग्रामपंचायत मधुन कामे कोणकोणते चालतात, आपण भरलेला कर ग्रामपंचायत कोठे खर्च करते याची माहीतीच नसते. ती माहिती करून देण्याची जबाबदारी तरूण वर्गाची आहे. मुलांनी समोर येऊन गावाचे नेतृत्व केले तर बऱ्याच समस्या तेथेच मिटतात. परंतु तरुण वर्ग समोर येण्यास तयार होत नाही. हि खेदजनक बाब आहे. आदर्श ग्रामपंचायत काय असते, आदर्श गाव निर्माण कसे करायचे, गावातील लोकांना प्रवाहात आणुन गावचा विकास कसा करायचा, गावाला सक्षम व स्वावलंबी कसे बनवायचे याचे नियोजन तरुणाईकडे असून सुद्धा तरुणाई निवडणुकीमध्ये उमेदवार बनुन गावाच्या हिताचे काम करण्याची तयारी दाखवत नाही पण गावातील निधी खाणाऱ्या, आज पर्यंत नविन चेहऱ्यांना संधी न देणाऱ्या एकाच घरातील सदस्य सरपंच असणाऱ्या लोकांच्या मागे जाऊन त्याचा प्रचार वा त्याचे समर्थन करतात.

तेथेच शिक्षणाची आणि आपल्या नेतृत्वाची माती होते. अडाणी आणि अल्पशिक्षित लोक सत्तेत असतात आणि शिक्षीत तरुण त्यांच्या मागेपुढे फिरत बसतो.रिकामा गप्पा मारुन वेळ खर्च करणारा तरुण मात्र गावाच्या कल्याणासाठी कधीच चर्चा करताना दिसत नाही. तरुणाईने मग मुलगी असो मुलगा दोघांनी जर माझे गाव सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. हे ठरवून पुढाकार घेतला तर प्रत्येक गाव आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. युवकांनी समोर येऊन नेतृत्व केले तर गावातील कामात पारदर्शकता येईल, आज पर्यंत चालत आलेल्या अलिखित नियमांवर बंदी येईल, ग्रामविकास निधी गावातील लोक कल्याण कामासाठी खर्च होईल, आणि ग्रामपंचायत चे मुळ काम काय आहे, आणि ग्रामपंचायत मुख्य उद्देश काय आहे हे सिद्ध होऊन राजकीय जागृती निर्माण होईल. ग्रामपंचायत गलीच्छ गढूळ आणि द्वेषाचे राजकारण करण्यासाठी करण्यासाठी नसुन ग्रामपंचायत सर्वांगीण विकास करण्यासाठी आहे हा समज निर्माण होईल. आणि ज्यांच्या कडे गावाला विकसित करण्याची क्षमता आहे असे तरुण गावाला पुढे नेण्यासाठी तयार होतील. गावातील ग्रामपंचायत निवडणुक ही आपल्या गावाचे भविष्य ठरवू शकते याची खात्री प्रत्येकाला होईल.

निवडणुकिमध्ये पैसा वाटून, दारू मटण चारून उमेदवार खर्च करत असेल आणि तो जर निवडून आला तर तो गावाचा विकास वा लोकांचे काम कशाला करेल? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला जर लोकांचेच काम करायचे तर मग तो पैसा दारू कशाला देईल. तरूण वर्गाने आपल्या मेंदूची बंद पडलेली दार उघडून सामाजिक जाणीवेचे भान ठेवणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकिचा खर्च वाचवून दर्जेदार निवडणूक घेण्याची क्षमता ही फक्त तरुणांमध्येच आहे. तरूणाने ग्रामपंचायत निवडणूक लढवून ग्रामपंचायत मध्ये गेले आणि दमदार कामगिरी करून आपली छाप निर्माण केली तर स्वतः ला तर यश मिळेलच परंतु गावाचा विकास होऊन एक नवीन नेतृत्व निर्माण होईल. प्रत्येक गावामधून निर्भीड, प्रामाणिक आणि तरुण नेतृत्व पुढे आले तर देशात प्रामाणिक आणि नविन दमाच्या नेतृत्वाची निर्मीती होऊन देशात परिवर्तनाची व नव्या नेतृत्वाची लाट येईल. सक्षम भारताची युवा नेतृत्वाची सुरुवात ही ग्रामपंचायत पासुनच होते म्हणून सक्षम भारताची धुरा सांभाळण्यासाठी तरुणांनी सज्ज होणे गरजेचे आहे.

चौकात बसुन टिंगल टवाळ्या करून स्वतः चे नाव खराब केल्यापेक्षा, गाव विकासाची कास हाती घेऊन गावाचा विकास करण्यासाठी तरुणांनी हातात हात घेऊन ध्येय पुर्ती करावी. व्यसन करून बदनाम न होता गावाचा गाडा हाकण्याची जबाबदारी घेऊन नाव कमावणे कधीही चांगलेच. भरकटलेल्या युवकांनी ग्रामपंचायत मधुन आपली क्षमता दाखवून व गावाचा गौरव करून देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझी आहे. अशी भावना निर्माण झाली तर गावातील संसद गावातच विकसित होऊन देशाच्या संसदेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल. ग्रामपंचायत च्या माध्यमातून देश मजबूत करण्याची शक्ती मीळते म्हणून तरुणांनी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये सक्रीय सहभागी होऊन आपले गुण दाखवून द्यावे तरच निवडणुकिचा उद्देश साध्य होईल.

✒️लेखक:;श्री.रविभाऊ शिरसाठ
आ.को.स.स.समिती खांदेश विभाग उपाध्यक्ष

▪️संकलन- संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED