सावित्री झिजली म्हणून महिला सजली

42

भारताचा इतिहास बघता स्त्रिही गुलामांची गुलाम म्हणून स्त्रीकडे फक्त शरिर सुख, पोटाची भुक आणि नातवंडाचे मुख एवढ्याच पुरते बघितलं जात होत. मनुस्मृती नावाच्या ग्रंथाने व त्या ग्रंथाला प्रमाण माणुन माणसामध्ये भेद करून समाजव्यवस्था निर्माण करणाऱ्या आणि स्त्रिला दासी व हीन समजून प्रवाहात येण्याचे सर्वच मार्ग बंध करून महिलांना पायातील वहाण समजणाऱ्या निच माणसिकतेच्या लोकांनी महिलांना कोणतेच हक्क अधिकार दिले नाहीत. उलट स्त्रीला दासी समजून भोगण्याची मानसिकता निच विचार व निच संस्कारात वाढलेल्या लोकांनी स्त्रियांना डोक्यावरचा पदरही बाजूला न जाऊ देण्याची परवानगी नाकारून स्त्रिला शारीरिक व मानसिक गुलाम बनवून ठेवल्या गेले, आणि वर्षानुवर्षे महिलांच्या डोक्यात अंधविश्वास पेरून भविष्यात महिला स्वतंत्र विचार करणारच नाही याची व्यवस्था निर्माण करून ठेवली. आपल्या भुतकाळा विषयी अपवाद वगळता स्त्रिया आजही अज्ञानी आहेत.

शिकलेल्या नौकरी करणाऱ्या स्त्रियांना अजून सावित्रीबाई ची ओळख पटली नाही. काय होती महिलांची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक प्रगती तर स्त्रियांना कोणतेच अधिकार तर नव्हते पण स्त्रि मानसा प्रमाणे वर्तन सुद्धा करू शकत नव्हती. स्त्रिने शिक्षण संपती आणि अधिकाराच्या गोष्टी करणे कोसो दुर होते. अशा बिकट परिस्थिती मध्ये व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, स्वतः चे सुख वैभव सोडून महिलांना सुशिक्षित करण्यासाठी घराबाहेर पडून शिक्षणाची मजबूत फळी उभी केली. मुलींनी शिक्षण घेतले म्हणजे धर्म बुडतो म्हणणाऱ्या व्यवस्थेला लाथाडून मुलींचे शिक्षण आणि गावातील सुख वैभव यापैकी एकच गोष्ट निवडायचा पर्याय असताना मुलिंचे शिक्षण हा पर्याय निवडणूक आधुनिक भारतात विषमतावादी व्यवस्थेला फटका देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले.

शाळा सुरु करून मुलीला शिकविणे वाटते तेवढे सोपे नव्हते. धर्माच्या ठेकेदारांनी तर सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण रुपी कार्याला अडचण निर्माण करून मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणले परंतु महात्मा जोतीराव फुलेंसारखा क्रांतिकारक सोबत असताना मोठ मोठ्या संकटावर मात करत शिक्षणाची मुळे महिलांच्या उन्नती साठी या समाजात रूजविण्याचे धाडस सावित्रीबाई फुलें यांनी केले.शिक्षण सुरू करताना अनेक अडचणी धर्ममांर्तड आणि मनुस्मृती च्या पिलावळांनी निर्माण केल्या. परंतु सावित्रीबाई व जोतीराव फुले थोडेही डगमगले नाही. आणि संकटांना सामोरे गेले. अंगावर शेत माती, उष्ठे अन्न या व्यवस्थेच्या ठेकेदारांनी सावित्रीबाई च्या अंगावर फेकून मारले. तेही त्यांनी सहन करून शिक्षणाची कास सोडली नाही. त्यांनी सर्व सुख वैभव सोडून एका साडीवर महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तेव्हा कुठे आज महिलांच्या घरात पर्फ्युम आणि कपाटभर साड्या दिसतात.

घरात कपाटभर साड्या आणि अंगासाठी सुवासिक लाऊन नटून थटून बाहेर पडणाऱ्या महिलांना फाटक्या साडीत शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची कधीच आठवण होत नाही. शिक्षण शिकुन लाखो रुपये कमवणाऱ्या महिलांच्या घरात सावित्रीबाई फुलेंचा फोटो सुद्धा दिसत नाही. एवढ्या बेईमान आज सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई ला झालेल्या दिसून येते. सावित्रीबाई फुलेंच्या त्यागाची जाणीव आणि शिक्षणाचा उद्देश आजही महिलांना कळाला नाही. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शिक्षणाचा पाया रोवला मात्र शिक्षणाचा फायदा महिलांनी फक्त सुविधा आहे म्हणून आर्थिक उन्नतीसाठी करून घेतला आहे. सामाजिक राजकीय उन्नती मध्ये आजही महिला दुय्यम आहेत. महागड्या साड्या अंगावर घालून, फँशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन करून अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या नावाखाली लग्न, वाढदिवस, इतर पार्ट्या करण्यासाठी सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी झटल्या नाहीत तर सुशिक्षित महिला एक समाज निर्माण करून देशाच्या उभारणीला हातभार लाऊन विज्ञानाचा पुरस्कार करून अंधविश्वासाला हद्दपार करून माणसिक स्वातंत्र्य मिळवतील यासाठी शिक्षण सुरू केले होते. परंतु येथे परिस्थिती उलटी आहे.

स्वतः ला सुशिक्षित समजणाऱ्या महिला आजही मानसिक गुलामगिरी मध्ये जिवन जगत असून महिला म्हणजे दुय्यम या अर्थाने स्वतः लाच कमी समजून स्वतः चे अस्तित्व किती कमी आहे हे दाखवत असतात. कधीही सावित्रीबाई ची आठवण न येता वटपौर्णिमेला वडाशी फेरे, संक्रांतीला वान, कुमारवयीन हरतालिका, विवाहित हरतालिका करून चांगल्या नवऱ्याचे जतन करतात. अंधविश्वासाला धर्माशी जोडून महिला भावनिक झालेल्या आहेत. परंतु ज्यांच्या मुळे शिक्षण मिळून स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संधी मिळाली त्या सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा विसर पडतो. आजही आमच्या महिला अंधविश्वासामध्ये फसलेल्या आहेत. विज्ञानाला पायाशी तुडवून अंधविश्वासाची पेरणी समाजात आजही सुरू आहे त्याचा स्विकार येथे रोजच केला जात आहे. जो कोणी अंधविश्वास मातीत गाडून विज्ञानवादाचा पुरस्कार करण्याचा सल्ला देतो तेव्हा समाज त्याच्या कडे वेगळ्या नजरेने बघतो. अ़ंधविश्वासा विषयी भावनिक झालेले विज्ञानाशी भावनिक झाले नाही म्हणून आजही आकाश गंगेतील ग्रह आपल्या जिवनात प्रवेश करून संकटे निर्माण करतात, करोडो रूपयो संशोधनावर खर्च करून शोधलेले ग्रह अकरा, एकावन्न रुपयात दुर करण्याची ताकद फक्त भारतीय अंधविश्वासा मध्येच आहे.

स्वतः व्यवस्थेचा रोष पत्कारून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वटवृक्ष लावला, तर्कवाद शिकवून सत्याची जाणीव करून दिली, आपले जिवन जगत असताना आपला शत्रु कोण मित्र कोण याची जाणीव महिलांना नाही. सावित्रीबाई फुले यांना शत्रु माहिती होता, शत्रुची ताकत आणि कटकारस्थान माहिती होते म्हणून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले हे शत्रुशी दोन हात केले आणि आपली लढाई जिंकली. शत्रूला शत्रु आणि मित्राला मित्र म्हणण्याची ताकद जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण सुशिक्षित व समजदार झालो असा त्याचा अर्थ होतो. परंतु आज आपल्या महिलांना शत्रु आणि मित्राची ओळख नाही, ती कधीच करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. याउलट अंधविश्वासाला खत पाणी घालून स्वतः चा शत्रु मोठा करून स्वतः ला कमकुवत करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. धर्म जातीला चिकटून बसलेल्या महिला मुलिंचे लग्न स्वजातीमध्ये च व्हावे याचा अट्टाहास करतात तेव्हा कळते शिक्षणाचा उद्देश साध्य झाला नाही. आजही महिला समाज आणी देशाचा शत्रु जिवंतच नाही तर जास्त सक्रीय आणि ताकदवान आहे. या शत्रुला महिला सहज नमवू शकतात परंतु सुशिक्षित महिलांना कामापासून सवड मिळत नाही, मिळालेल्या वेळेमध्ये बरेच काम असतात, पोथीपुरान अंधविश्वासाला वाढविण्याचे काम करणाऱ्या विषयाचे अनेक पुस्तक घरात असतात, परंतु विज्ञानवादी पुस्तके घरात दिसेनासे झालेले आहेत.

घरातील टिव्ही समोर बसून येईल तो दिवस खर्च करायचा आहे ज्या मालीकेचा काहीच फायदा नसतो तरी तासंतास चर्चा असते. परंतु महिलांची पुर्वीची परिस्थिती कशी होती, महिलांवर गुलामगिरी का ओढावली ? महिलांसाठी शिक्षण सावित्रीबाई फुले यांना सुरू करण्याची गरज का पडली? या विषयावर कधीच चर्चा होताना दिसत नाही. सावित्रीबाई फुले यांचा त्याग आणि महिलांसाठी उचलेल्या क्रांतीकारी पाऊलांची माहिती सुद्धा महिलांनी करून घेऊ नाही म्हणजे किती शोकांतिका. बाजारात कोणती नवीन नटी आल्यापासून त्या नटीची नकल करून रहाण्यापर्यंत त्या नटीची इंत्यभुत माहिती यांना असते पण आपल्या अस्तित्वा साठी स्वतः चे वैभव न उपभोगलेल्या सावित्रीबाई ची यांना आठवण येत नाही. कित्येक महिलांना सावित्रीबाई फुलेंची प्राथमिक माहिती नाही तर काही महिलांना सावित्रीबाई फुलेंचेच नावच माहिती नाही, काही महिलांना सावित्रीबाई फुलेंचे नाव कार्य माहिती असून सुध्दा त्यांचा साधा फोटो पण घरात लाऊ शकत नाही. एवढ्या माणसिक गुलामीमध्ये खितपत पडलेल्या आहेत. ज्या महिलांना सावित्रीबाई फुलें यांच्या फोटोची अँलर्जी आहे त्या महिलांना सावित्रीबाई फुलेंचे कार्य व विचार कसे पटणार. देशातील प्रत्येक स्त्रिवर सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहेत पण जाणीव ठेवणार खूप कमी महिला आहेत. चौदा फेब्रुवारी ला बॉयफ्रेंड सोबत फिरायला सन्मान वाटणाऱ्या मुलींना सावित्रीबाई ची आठवण त्यांच्या जयंती दिनी येत नसेल तर याला शिक्षणाची मातीच म्हणावे लागेल.

संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी महिला सक्षम व्हाव्यात म्हणून आयुष्य भर काम केले. मग मग त्यामध्ये विधवा पुर्नविवाह, पाळणा घर, महिला प्रसुती गृहांची निर्मीती स्वतः च्या घरात करून, समाजातील स्त्रियांना एक मानसिक आधार देऊन आधुनिक भारतात स्त्रि सक्षमीकरण प्रभावी राबवले. खंत एवढीच वाटते ज्या वर्गासाठी सावित्रीबाई झिजल्या त्या आज भरजरी साडी आणि महागड्या सोन्यामध्ये सजल्या, पण सावित्रीबाई फुलेंशी, कार्याशी आणि विचाराशी बेईमानी करून सावित्रीबाई फुलेंच्या कार्यांचा विसर पाडून साडी माडी गाडीत गुंतून गेल्या. स्वतः च्या अंगावर हजारो रूपयांची साठी वापरताना सावित्रीबाई फुलेंचे एक पुस्तक, एक फोटो व एक दिवस एखादा हार सावित्रीबाई फुलेंच्या फोटोला घातल नाही अथवा त्याची लाज वाटते. सावित्रीबाई फुलें यांचे कार्य शिक्षण, आरोग्य, व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण यामध्ये खुप मोलांचे आहे. त्यावेळी सावित्री झिजली म्हणून आज महिला सजली हे विसरून चालणार नाही, आपण प्रत्येकापर्यंत सावित्रीबाई फुलेंचे कार्य पोहचवले तरच जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.
**************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
**************************************