जन्मोत्सव माझ्या सावित्रीमाई फुलेंचा

29

[सावित्रीमाई फुले जयंती : महिला शिक्षण दिन, महिला मुक्ती दिन व बालिका दिन सप्ताह]

महाराष्ट्रभर ज्यांचा जन्मदिवस हा ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून हर्षोल्हासाने साजरा होत आहे. तोच अनेक सामाजिक ठिकाणी ‘स्त्रीमुक्ती दिन’ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. ज्यांच्या जन्मोत्सव सप्ताहात विविधांगी स्पर्धा व ज्ञानवर्धक कार्यक्रमांची लयलूट केली जाते. त्या सावित्रीमाईं फुलेंचा जन्म नायगाव येथे दि.३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्या प्रथम भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवयित्री व क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडात पुणे येथे पहिली मुलींची शाळा उघडली. महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाचा प्रारंभिक पाया त्यांनीच रोवला. त्यांनी प्राणांतिक लढा देत स्त्री व शूद्रांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या जयंतीनिमित्त ही तुटकी-फुटकी शब्दसुमने त्यांच्या पावन चरणी वाहात मानाचा मुजरा ! माईंच्या शब्दांतच शिक्षणसम्राट महात्मा फुले दाम्पत्याचे ऋणनिर्देश व्यक्त करतो –

“काळ रात्र गेली, अज्ञान पळाले ! सर्वे जागे झाले, सूर्याने या !!
शूद्र या क्षितीजी, जोतीबा हा सूर्य ! तेजस्वी अपूर्व, उगवला !!”
[ काव्यफुले’ : शिळा प्रेस प्रसिद्ध : सन १८५४ ]

विद्यादायीनी सावित्रीमाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असलेल्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स.१८४० साली महात्मा जोतीरावजी फुले यांचेशी साऊंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी साऊंचे वय नऊ, तर जोतीरावजींचे वय तेरा वर्षांचे होते. त्यांचे सासरे गोविंदरावजी फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना ‘फुले’ हे आडनाव मिळाले. आपल्या भरल्या घराचे वर्णन त्या अशा करत –

“चिमा थोर माता, पिता गोविंदाजी ! तयांचे कुशी जन्मला जोतीबाजी !!
सती थोर माता, पिता गोविंदाजी ! तयां वंदिते, आदरे जोती कांता !!माझ्या जीवनात, जोतीबा स्वानंद ! जैसा मकरंद, कळीतला !!”
[ ‘काव्यफुले’ : शिळा प्रेस प्रसिद्ध : सन १८५४ ]

महात्मा जोतीरावजींना बालपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. त्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करत होत्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग फुले दाम्पत्यांना प्रेरित करण्यासाठी केला. सावित्रीमाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावजींनाही एक प्रेरणादायी नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून माईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनीही रीतसर शिक्षण घेतले.

त्यांनी दि.१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात शिक्षणप्रेमी पती जोतीरावजींसह मुलींची शाळा उघडली. मनुवादाने बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी तथा कुत्सित भावनेने बरबटलेल्या समाजकंटकांनी त्यांच्या पवित्र शैक्षणिक कार्यात बाधा आणण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांच्यावर दगडगोटे व शेणमातीचा मारा केला. तरीही समस्त कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षिका व मुख्याध्यापिका बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्याही. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्या सांगत –

“शुद्रांना सांगण्या जोगा, शिक्षण मार्ग हा !
शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा !!”
[ ‘काव्यफुले’ : शिळा प्रेस प्रसिद्ध : सन १८५४ ]

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या. पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला.. जग बुडणार.. कली शिरला..” असे बोंबलून केले. सनातन्यांनी विरोध केला. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. परंतु अनेक संघर्ष करत सावित्रीमाई व सहायक शिक्षिका फातिमामाई शेख यांनी हे शिक्षण प्रसाराचे उपक्रम चालूच ठेवले होते. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही त्या न डगमगता खंबीर राहिल्या.

स्त्रीशिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे माईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी हिंमतीने व हिकमतीनेही आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. मनुवाद्यांना विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करत असे. जन्माला येणाऱ्या मुलाला नरक यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. महिलांतील अज्ञान व अंधश्रद्धा घालविण्यासाठी त्या सदैव प्रबोधन करत असत –

“ऐसा भाग्यवंत असेल तुजला । नसे आनंदाला पारावार ।।
पोरे बाळे ऐसे भवजंजाळाचे । ओझे वाहण्याचे काय तुझे? ।।”
[ ‘काव्यफुले’ – शिळा प्रेस प्रसिद्ध : सन १८५४ ]

शिक्षणसम्राट महात्मा फुलेजींनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीमाईंनी ते समर्थपणे चालवले. आमिषाला बळी पडलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांची बाळंतपणे त्या करू लागल्या. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेले काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे माईंनी कल्पकतेने पार पाडली.

सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असे. राष्ट्रपितामह शिक्षणमहर्षी महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीमाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. संतती व संपत्तीसाठी देवाला नवस बोलणाऱ्या स्त्री-पुरुषांना साध्या पण अवाक् करणाऱ्या शब्दात त्या तत्वज्ञान सांगत –

“धोंडे मुले देती, नवसा पावती । लग्न का करती, नारी नर? ।।
सावित्री वदते, करूनी विचार । जीवन साकार, करूनी घ्या ।।”
[ ‘काव्यफुले’ : शिळा प्रेस प्रसिद्ध : सन १८५४ ]

इ.स.१८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीमाई फुलेंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर क्रयविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांना सत्यशोधक कुटुंबांच्या आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई व महाराजा सयाजीराव गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.इ.स.१८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळाल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून माईंनी प्लेगच्या पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.

अशाही परिस्थितीत त्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीमाईंनाही प्लेगची लागण झाली. त्यातच ती विद्यावरदायीनी बहुजनांची दयाळू मायाळू आई सावित्रीमाई दि.१० मार्च १८९७ रोजी निर्मीकात चिरनिद्रेने विसावली. माईंनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल आम्ही चेतन झालो, तरच त्यांचे कधीही न फिटणारे पांग फेडणारांच्या केवळ रांगेत उभे होण्याची आमची लायकी असेल, अशी आशा वाटते –

“ज्ञान नाही, विद्या नाही ! ते घेणेची गोडी नाही !!
शहाणे असुनी, चालत नाही ! तयांसी मानव, म्हणावे का? !!”
[ ‘काव्यफुले’ : शिळा प्रेस प्रसिद्ध : सन १८५४ ]

क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंना व त्यांच्या कार्य कल्पकतेला शिरसाष्टांग दंडवत प्रणाम !
!! अभ्यासपूर्ण व ज्ञानवर्धक माहिती पुरविण्याचा एकच उद्देश, फक्त नियमित वाचा ‘पुरोगामी संदेश’ !! जय ज्योती !! जय क्रांती !!

✒️लेखक:-‘सत्यशोधक’ – श्री कृष्णकुमार लक्ष्मी गोविंदा निकोडे.[मराठी साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक]
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,
ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
email – nikodekrishnakumar@gmail.com