क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’स्वयंप्रज्ञनेंच्या सूर्या

26

“असे गर्जुनी विद्या शिकण्या परंपरेच्या बेड्या तोडूनी! जागे होऊन झटl
शिकण्यासाठी उठा!”
हा संदेश देऊन समस्त मानवजातीला जागे करणाऱ्या सावित्रीबाई होत!आजही आम्ही गुलामगिरीत, अज्ञानात, दारिद्र्यात खितपत पडलो असतो. जर सावित्रीबाईंनी आम्हाला जागे केले नसते.. आज क्रांतीज्योती, कर्मयोगिनी, क्रांतीजननी सावित्रीमाईची जयंती त्यांना शतशः प्रणाम शतशः प्रणाम..सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी, सहकारी, एवढीच त्यांची ओळख नाही तर सावित्रीबाई फुले या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या, जिज्ञासु, उत्तम वक्तव्य, संघटन कौशल्य असलेल्या प्रतिभावंत स्त्री होत्या. त्यांच्या कार्याची ओळख स्वतंत्रपणे झाली पाहिजे.

सावित्रीबाई भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या,पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत, पहिल्या मुख्याध्यापिका, आद्य कवयित्री, उत्तम संचालिका,मराठीतील पहिल्या पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका,सत्यशोधक समाजाच्या पहिल्या राष्ट्रीय अध्यक्षा, आनंददायी शिक्षणाची कल्पना मांडणाऱ्या शिक्षण तज्ञ.. क्रांतीज्योती सावित्रीबाईलहानपणापासूनच धाडसी,जिज्ञासू,दयाळू मनोवृत्तीच्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले सोबत विवाह झाल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखीनच धार चढली होती.

महात्मा फुलेंनी हातात घेतलेल्या प्रत्येक कार्याला सावित्रीबाईंनी पूर्णत्वास नेले. पतीच्या कार्यात पतीला साथ देण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या पतीसोबत हक्काचे घर सोडले.खऱ्या अर्थाने ही मोठी क्रांतिकारी घटना होती. कारण एखादी सामान्य बुद्धिमत्तेचे स्त्री असती तर ती म्हणाली असती की समाजासाठी आपण आपले भरले घर का सोडावे? सावित्रीबाई या असामान्य बुद्धिमत्तेच्या समर्थ, निग्रही,करारी,तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री होत्या. ज्या दिवशी सावित्रीबाईंनी आपल्या घराचा उंबरठा ओलांडला तो दिवस म्हणजे भारतीय स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ होता. मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीमाई घराबाहेर पडल्या तो काळ म्हणजे स्त्रियांना भावना मन आहे याची कोणी दखल घेत नव्हते त्या काळात घराचा उंबरठा ओलांडण्याचा विचारही स्त्री करू शकत नव्हती. त्या काळात स्त्रीचा जन्म म्हणजे पूर्वजन्मीचे पाप !स्त्री म्हणजे चंचल अविचारी असा समज रूढ होता.

शूद्र जैसा स्त्री ही दीन! शस्त्र धरिती त्यावर बुद्धिहीन!
“लिहिणं-वाचणं हे आपलं काम नाही महाराच्या घरी गाणं कुणब्याच्या घरी देण व ब्राह्मणाच्या घरी लिहिणं ” ही म्हण त्या काळात प्रचलित होती.यानुसार समाजातील लोक जीवन जगत होते. “भाकरी खाणे व बैल हाकने” एवढेच काम बहुजन समाज करत होता. “ठेविलेअनंते तसेची रहावे” ही समाजाची मानसिकता होती.गुलामगिरीच कुणालाही ओझं वाटत नव्हतं. आणि ज्यांना कोणाला गुलामगिरीच ओझं वाटत असेल त्यांना गुलामगिरी झुगारून देण्याचे कोणतच साधन नव्हतं.स्त्री शूद्रातिशूद्र समाज डोळे असून आंधळ्यागत जीवन जगत होता. हजारो वर्ष जो समाज अन्याय अत्याचार सहन करत जीवन जगत होता.त्या समाजाला आपल्या हक्क अधिकाराची जाणीव करून देणे. त्या समाजाचे आत्मभान जागृत करून रूढी परंपरेचे निर्बंध धुडकाऊन लावण्यासाठी फुले दाम्पत्याने शिक्षणाचा मार्ग दाखवला.

शिक्षणामुळेच खरं-खोटं न्याय अन्यायाची जाणीव होऊन गुलामगिरी झुगारण्याचे साहस निर्माण होणार होते याची जाणीव त्यांना होती.स्त्री ही पुरुषाला सुख देणारी साधनं मात्र आहे.स्त्रियांना स्वतंत्रपणे विचार करणे त्या काळात शक्यच नव्हते.अशा काळात सावित्रीबाईंनी घराबाहेर पाऊल टाकणे म्हणजे एक क्रांतिकारी घटना होय.सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी शेण दगड,चिखल झेलले,शिव्याही खाल्ल्या हा प्रसंग काही साधा प्रसंग नाही. या प्रसंगामुळेच खरा इतिहास घडला. सावित्रीबाई मोठ्या निर्धाराने मुलींना शिकवण्यासाठी भिडे यांच्या वाड्याकडे जाऊ लागल्या . सनातन्यांनी त्यांच्या दिशेने शेण, दगड , चिखल भिरकावलं सावित्रीबाईंनी पर्वा केली नाही. सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना लगबगीने त्या मुलीच्या शाळेकडे जात होत्या. डोक्यात एकच विचार होता आज आपण मुलींना शिकवणार तेवढ्यात एक दगड सावित्रीबाई च्या दिशेने आला आणि सावित्रीबाईच्या कानशिलाला लागला त्या रक्तबंबाळ झाल्या.

पण थांबल्या नाही.का थांबल्या नाही? कारण त्यांचा निर्धार पक्का होता. मुलींना शिकवण्याचे पवित्र काम मी थांबवणार नाही. मी कुणालाही घाबरणार नाही. मला जे करायचे ते मी करूनच दाखवणार! सावित्रीबाई या प्रसंगातून बाहेर पडल्या नसत्या तर आजही स्त्रीयांची स्थिती रांधा वाढा उष्टी काढा! करा सत्यनारायण मारा वडाला फेर्‍या!! अशीच झाली असती.सावित्रीबाईचे झुंजार विचार जोपर्यंत मुलींना कळणार नाही तोपर्यंत आपल्या मुली झुंजार होणार नाही.आपल्या मुली झुंजार झाल्या नाहीत तर त्यांची काय अवस्था होत आहे हे आपण वर्तमानात आणि जगलो तर भविष्यात बघणार आहोत.सावित्रीने मुलींना शिक्षण दिले एवढेच सांगत बसू नका तर सावित्री एक धाडसी,निडर, झुंजार व्यक्तिमत्त्वाची स्त्री होती हेही आपल्या मुलींना सांगा.त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सावित्रीबाईंना जातीच्या चौकटीतून बाहेर काढावे लागेल.

सावित्रीबाईंनी ज्याप्रमाणे शैक्षणिक ज्योत पेटवली त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक ज्योतही घरोघरी पेटवली. समाजातील कुप्रथा, कालबाह्य झालेल्या चालीरीती, परंपरा , अनिष्ट रूढी यांच्याविरुद्ध आवाज उठवला. समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध सावित्रीबाईनी आपली लेखणी व वाणी या द्वारे परिवर्तन करण्याचा ध्यास घेतला होता. परिवर्तन करण्यासाठी ते रात्रंदिवस झटत होते. तहान भूक विसरून त्यांचे कार्य सुरू होते. एकच ध्यास होता तो म्हणजे समाज परिवर्तन . सावित्रीबाई या प्रतिभासंपन्न कवित्री होत्या. त्यांची काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्‍नाकर ही दोन काव्यसंग्रह सुप्रसिद्ध आहेत. सावित्रीबाई फुले या आद्य मराठी कवयित्री होत.त्यांची अनेक विषयावर भाषणे प्रसिद्ध आहेत.सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून जनजागृती केली. लोकांचे अज्ञान दूर केले.

गोट्याला शेंदूर फासुनी तेलात
वसती देवात दगड तो!!
धोंडे मुले देती नवसा पावती
लग्न का करती नारी नर!!

एक प्रकारे सावित्रीमाई मनूला आवाहन देत होत्या.’नाआवडतीचे मीठ आळणी’ या म्हणीप्रमाणे सावित्रीबाईचे प्रतिभासंपन्न साहित्य ही मनुवादी लोकांना रुचले नाही.सावित्रीबाई आपल्या काव्यात फक्त कल्पनेची भरारी घेत नव्हत्या तर त्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू होते. म्हणूनच म्हणावेसे वाटते कि “ बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले”

सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी लढा देणार्‍या सावित्रीबाई या पहिल्या स्त्री होत्या.चार भिंतीत बंदिस्त झालेल्या स्त्रियांना समाजामध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या सावित्रीबाई..स्त्री स्वातंत्र्याला प्रेरणा देणार्‍या सावित्रीबाई..चूल आणि मूल या जोखंडा तून स्त्रियांना बाहेर काढून आपले विचार मुक्तपणे मांडण्याचे सामर्थ्य स्त्रियांना देणार्‍या सावित्रीबाई..शिक्षणातून खरे-खोटे याची जाणीव होते. शिक्षण हे माणसांमध्ये मनुष्यत्व निर्माण करते असा विचार सावित्रीबाई आपल्या काव्यात मांडतात म्हणून सावित्रीबाई मानव व सृष्टी या काव्यात म्हणतात

मानवी जीवन हे विकसुया
भय चिंता सारी सोडुनिया
इतरा जगवू स्वतः जगूया
मानवप्राणी निसर्गसृष्टी दोन शिक्क्याचे नाणे! एकच असे ते म्हणुनी सृष्टीला शोभवू मानव लेणे!

सावित्रीबाईंनी स्त्रियांची संबंधित प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नकेला. सावित्रीबाईंनी समाजातील जातीयतेचा अनुभव घेतला होता . समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी एक मंडळ स्थापन केले. तसेच विधवा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन , दारुड्या नवर्‍याच्या जाचातून पत्नीला सोडवण्यासाठी त्या मंडळामार्फत कार्य केले. समाजासाठी कार्य करत असताना सावित्रीबाईंनी समाजातील लोकांचा रोष सहन केला परंतु माघार घेतली नाही. आपल्याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील विधवा काशीबाई च्या पोटी जन्मलेल्या मुलाची स्वतःच्या हाताने नाळ कापली . पुढे याच मुलाचे नाव यशवंत ठेवले .यशवंतला दत्तक घेतले. एका विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या मुलाला दत्तक घेऊन फुले दाम्पत्याने तत्कालीन समाजाला मोठा धक्काच दिला होता. कृतीतून समाजाला धडे दिले जात होते.

दुष्काळाच्या काळात सावित्रीबाईंनी अनेक ठिकाणी अन्नछत्र चालवली . अनाथ,आंधळ्या, निराधार हजारो मुलांची आई झालेल्या सावित्रीबाईंना कोण वांझ म्हणेल? दुष्काळात 52 अन्नछत्र सावित्रीबाईंनी चालवली.सावित्रीबाई खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होत!प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाईंना ओळखले जाते.आपल्या मुलाच्या शिक्षणातील मोठा अडथळा म्हणजे पालकांचे अज्ञान! पालकांचे अज्ञान दूर व्हावे यासाठी सावित्रीबाईंनी महिलांसाठी रात्रीच्या प्रौढशाळा वर्गाची सुरुवात केली.सावित्रीबाई फुले नसत्या तर घेऊ शकल्या असत्या का स्त्रिया एवढी उंच भरारी?? पृथ्वीतलावरच नाही तर अवकाशात स्त्रियांनी आपली पावले ठेवली असती का? आज देश-विदेशात स्त्रिया आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत ही सावित्रीबाईची कृपादृष्टी आहे.. हे विसरून कसं चालेल? सावित्रीबाईंच्या विचाराची आज खरी गरज आहे.जागतिकीकरण खाजगीकरणाच्या युगात स्त्रियांचे परत एकदा वस्तूकरण होण्याच्या मार्गावरआहे.

स्त्रियांनी सावित्रीबाईंच्या विचाराचा स्वीकार करणे आवश्यक आहे नाहीतर पुन्हा एकदा आजची स्त्री मनुवाद्यांच्या तावडीत सापडणार आहे. सावित्रीबाईंचे कार्यकर्तृत्व विचारात घेतल्याशिवाय स्त्रीमुक्तीचा इतिहास समजणार नाही. चला तर मग सावित्रीबाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करूया. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन भविष्याकडे वाटचाल करूया.राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला योग्य तो न्याय अजून मिळालेला नाही तर सावित्रीबाई तर एक स्त्री होत्या त्यांच्या कार्याला कधी न्याय मिळेल? क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला तोडच नाही! म्हणूनच म्हणावसं वाटतं की,महात्मा फुले युगपुरुष होते तर सावित्रीबाई युगस्त्री होत्या! महात्मा फुले क्रांतीसूर्य होते तर सावित्रीबाई क्रांतीज्योती होत्या! एवढेच नाही तर सावित्रीबाईंचे कार्य म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या बरोबरीचे कार्य होते. म्हणूनच म्हणावसं वाटतं “करू पहिलं नमन ज्योती सावित्रीला त्यांनी स्त्री मुक्तीला जन्म दिला “.

✒️लेखिका:-श्रीम. मनिषा अनंता अंतरकर (जाधव )
मो:-7822828708
Saiantarkar@gmail.com