पंजाबातील ‘भगतसींगांच्या’ मदतीला महाराष्ट्रातील ‘राजगुरू’ सरसावले

27

🔸दिल्ली आंदोलनासाठी गंगाखेडहून शेतकरी रवाना

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3जानेवारी):-स्वातंत्र्य लढ्यातील भगतसींग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान प्रेरणादायी आहे. त्याच धर्तीवर आता पंजाबातील शेतकऱ्यांचे निर्णायक आंदोलन सुरू असून त्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील अनेक सुखदेव शेतकऱ्यांच्या रूपात सिद्ध झाले आहेत. या शेतकऱ्यांचा पहिला जथ्था काल दि. २ जानेवारी रोजी गंगाखेडहून दिल्ली कडे रवाना झाला. यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.

दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांचे गंगाखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वागत करण्यात आले. येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संत जनाबाई मंदिर येथे मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कॉंग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीधर देशमुख, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, नगरसेवक प्रमोद मस्के, गोपीनाथराव भोसले आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. केंद्र सरकार कितीही अडथळे आणत असले तरी शेतकऱ्यांचा हा ताफा दिल्लीत धडकणारच असल्याचा आत्मविश्वास यावेळी बोलताना कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करून घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या पद्धतीने पंजाबमधील क्रांतीवीर भगतसींग यांना महाराष्ट्रीयन सुखदेव यांनी साथ दिली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत ऊभे रहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

हा प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास गंगाखेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा दुसरा जथ्था घेवून आपण दिल्लीला जाणार असल्याचे यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष बाळकाका चौधरी यांनी सांगीतले. शेतकरी नेते माणिकराव कदम, नितीन सावंत, शिवाजीराव कदम, ॲड. माधुरी क्षीरसागर आदिंची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. तर आभार ओंकार पवार यांनी मानले.

प्रारंभी आंदोलनादरम्यान शहिद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. परभणी जिल्हातून चार व कोल्हापूर परिसरातील तीन वाहनांद्वारे जवळपास दोनशे शेतकरी रात्री ऊशीरा नागपूरकडे रवाना झाले. नागपूर येथे राज्यभरातील शेतकरी एकत्र येवून दिल्लीकडे कूच करणार आहेत. गंगाखेड येथील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन पंडीतराव चौधरी, सुशांत चौधरी, साहेबराव चौधरी, युवक कॉंग्रेसचे नागेश डमरे, योगेश फड, बाळासाहेब सोनटक्के, सर्जेराव दाजी, नरहरी डमरे, भिमा नेजे, राजाभाऊ डमरे, गंगाधर यादव, प्रदिप चौधरी आदिंसह कॉंग्रेस आणि भाकप कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

🔺गंगाखेड पोलीसांचा निषेध
शहरातील श्रीराम ( दिलकश ) चौक येथे जाहिर सभा आणि निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तशी पुर्ण तयारीही झाली होती. पण ऐनवेळी स्थानिक पोलीसांनी संयोजक गोविंद यादव यांना लेखी पत्र देत परवानगी नाकारण्यात आल्याचे कळवले. यावरून संयोजक व आंदोलकांनी संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

ईतर सर्व राजकिय व प्रशासकीय कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यामागची पोलीसांची भूमिका अनाकलनीय असल्याचे गोविंद यादव यांनी सांगितले. तर स्थानिक पोलिसांचा हा निर्णय केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली घेण्यात आला असल्याचा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला. गंगाखेड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि विशेष शाखेतील कर्मचारी यांच्यातील अवमेळातून ही परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा होती.