धनुष मनोज सानप यांची इंडियन नेव्हल ऍकडेमीसाठी निवड

28

✒️रायगड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

रायगड(दि.4जानेवारी):- श्री धनुष मनोज सानप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये एनडीए / इंडियन नेव्हल अकॅडमी येथील प्रवेशाकरिता घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत 553 वा क्रमांक पटकावला. आता ते इंडियन नेव्हल अकॅडमी, एझिमला, जि.कन्नूर, केरळ येथे चार वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

धनुषने देशसेवेचा आणि करिअरचाही एक उत्तम मार्ग म्हणून इंडियन नेव्हल अकॅडमीची निवड केली. येथील चार वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर धनुष वयाच्या साडे एकविसाव्या वर्षी भारतीय नौसेनेमध्ये सब-लेफ्टनंट या अधिकारी पदावर रुजू होतील.

येथे प्रवेश मिळविताना त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची देशपातळीवरील लेखी स्पर्धा परीक्षा, एस.एस.बी मुलाखत व सैन्यदलामध्ये आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी हे टप्पे पार पाडले.त्यांच्या या यशात औरंगाबाद येथील “सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था” या शासकीय प्रशिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.

-अल्प परिचय- धनुष यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, ओएनजीसी,पनवेल येथून तर इयत्ता अकरावी आणि बारावीचे शिक्षण सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथून पूर्ण केले.त्यांना इ.दहावी मध्ये 93 टक्के तर इ.बारावी मध्ये 79 टक्के गुण मिळाले होते.

मागील वर्षीच धनुषची 17 वर्षांखालील वयाेगटातून राष्ट्रीय फुटबॉल संघात महाराष्ट्र राज्यातर्फे निवड झाली होती. धनुष फुटबॉलसह लॉन-टेनिस, बास्केटबॉल, टेबल टेनिस या खेळांमध्येही पारंगत असून त्यास इंग्रजी व जर्मन भाषेची त्याचबराेबर अभिनयाची विशेष आवड आहे.

आपल्याला मिळालेल्या यशात प्रामाणिक मेहनती बरोबरच सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वादही तितकेच महत्त्वाचे आहेत. असे ते मानतात. धनुष हे रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सानप व सौ रेखा सानप यांचे चिरंजीव तर कै. शिवाजीराव सानप व सुमनताई सानप यांचे नातू होत.