मदनकांता नृत्यसम्राज्ञी

27

हे सौंदर्य लतिके, गजगामिनी साजशृंगार करूनी अवतरलीस तू या भूवरी!!…. काय म्हणू तुला गं! नाव तुझे तरी सांग! तुझ्या सौंदर्याने एखादा राजकुमारही होईल गं बावळा !लांबसडक कुरळे काळे केशकलापही रूळलेत पाठीवरी मुक्त! त्यास सुगंधी पुष्पसुमांनी गुंफल्यात गजऱ्यांच्या माळा! सोडलास केशसंभार मोकळा मदनिके! जणू तुझ्या सौंदर्याची आभा पसरलीय या भूलोकांवर! हे नृत्यसारिके, तुझी सिंहासम कटी पाहूनी लाजतील स्वर्गीच्या रंभा नि मेनकाही. पाहता तुझे मृगनयन मिटेनात आमच्या डोळ्यांची कवाडेही!! काय जादू तुझ्या सौंदर्याची, वेड लागले वाटते आम्हाला !! तुझ्या नृत्यातील अलवार नजाकत…..

संगीताच्या तालावर थिरकणारा तुझा हा पदन्यास…वाटते जणू स्वर्ग दरबारातील रंभा की अप्सरा!……काळ्या कोरीव भिवया तुझ्या नि मुखाचे लावण्य समोरच्याचे डोळे दिपवित आहेत. तुझ्या नाजूक लांब बोटांच्या अदांनी समोरच्याचे हृदयही घायाळ झाले बघ! गोऱ्या कांतीमुळे सुंदर वाटते ही वेशभूषा तुझे गोरे रूप ,हेच कळेनासे झाले आहे. तू मदनाची मंजिरी की रती म्हणू तुजला?

नृत्यांगणा इंद्राच्या दरबारातील
थिरकतेस संगीताच्या तालांवरी
साजशृंगार करून नटलीस अशी
कृष्ण कन्हेय्याच्या सुंदर राधेपरी

तुझ्या सौंदर्याचे पान करण्यासाठी कुठे बसला आहे तुझ्या स्वप्नातील राजकुमार? येईल का श्वेत धवल घोड्यावरुनी करण्यास तुझे हरण?

नेईल का बसवुनी राजस
घोड्यावरती तुज समुद्रापार
तुझ्या प्रीतीचा असेल का गं
मदनासम देखणा राजकुमार

तू सौंदर्यवती, रूपगर्विता कोण्या गावची गं राणी? कशी उतरलीस या अवनीवरती की स्वर्गातूनी लावलीस गं शिडी? तुझा पदझंकार पाहण्यातच वेडावला बघ जीव !

कासावीस कित्येक हृदये
फडफडती बघ कसे वीर
तुझ्या या सौंदर्याने झाले
असतील कितीक वेडेपीर

तुझ्या नयनबाणांनी घायाळ त्या हृदयातून आरपार….. हे मयूर मोहिनी…… मयुराच्या पिसाऱ्यावाणी तुझ्या साडीचा फुलोरा बघ कसा फुलला आहे. कमरिया तुझा बांधा मनाला मोहवित आहे.भासतेय जणू
रानची नृत्य पारंगत लांडोर
नृत्यासाठीची वस्त्रेच लेवून
फिटले पारणेच डोळ्यांचे
तव आरस्पानी सौंदर्य पाहून

✒️लेखिका:-सौ.भारती सावंत(मुंबई)मो:-9653445835