राष्ट्रमाता, राजमाता , स्वराज्य संकल्पिका आदर्श मातृत्व मासाहेब जिजाऊ!!

29

‘आईच्या योगाने मुलांची प्रगती होते’ तसेच ‘आईच्या कर्तुत्वात मुलाचे मोठेपण सामावलेले असते’.’ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धरी’ जिजाऊंनी फक्त पाळण्याची दोरी सांभाळली नाही तर राजकारण,अर्थकारण या सर्वच क्षेत्रात अग्रभागी होत्या.पिता रक्षति कोमार्य पति रक्षति यौवने, पुत्र रक्षति वार्धक्य न स्त्रीस्वातंत्र्य महरती!या मनू वचनाला जिजाऊ मासाहेबांनी खऱ्या अर्थाने तिलांजली दिली!!महाराष्ट्राला जिजाऊ , सावित्रीबाई, रमाई , अहिल्या राणी या कर्तृत्ववान स्त्रीयांचा वारसा लाभला याचा आम्हा स्त्रियांना सार्थ अभिमान आहे..! यश समृद्धी ज्याच्या घरी पाणी भरत होती. सिंदखेडचे लखुजी राव जाधव आपल्याला मुलगी नाही याचं दुःख त्यांच्या मनात सलत होतं. ‘ गावात नदी व घरात मुलगी असली म्हणजे समृद्धी राहते’. असं म्हणतात. राजाचं प्रजेच दुःख दूर करणारा क्षण उगवला.म्हाळसाराणीच्या पोटी 12जानेवारी 1598 रोजी सकाळी सहा वाजता जिजाऊंचा जन्म झाला. मुलीचा जन्म झाला म्हणून लखुजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर पान वाटले.जिजाऊ वडिलांकडून शौर्याच्या कहाण्या ऐकत होत्या. आईकडून ही पराक्रमाच्या कथा जिजाऊ ऐकत होत्या. लखुजीराव जाधव यांनी आपल्या मुलाप्रमाणे जिजाऊनाही घोड्यावर बसणे , दांडपट्टा चालवणे , तलवार चालवणे , युद्ध शास्त्राचे शिक्षण दिले होते. मराठा सरदार जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा घराची जबाबदारी स्त्रियांवर येत. वेळ प्रसंगी मराठा सरदारांच्या पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढाया करण्याची सुद्धा त्यांची तयारी असे. त्यावेळी पडदा पद्धती नसावी.

जिजाऊंच्या बालमनावर हे संस्कार झाले होते. म्हणूनच पुणे सुपे येथील जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी जिजाऊंनी कौशल्याने पार पाडली.जिजाऊंचा विवाह 1610 मध्ये वेरूळ येथील शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला. जिजाऊ शहाजी राजे यांची एक आदर्श पती पत्नीची जोडी होती . वेगवेगळ्या मोहिमेवर जाताना सर्व जबाबदारी जिजाऊ वर सोपवून शहाजीराजे मोहिमेवर जात असे. आपल्या पत्नीच्या कर्तुत्वावर विश्वास दाखवणारे शहाजीराजे एक आदर्श पती होते..!!19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवबांचा जन्म झाला. आपल्या पोटी पुत्र जन्मावा आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करावे अशी प्रतिज्ञा जिजाऊंनी केली होती. मासाहेब जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. स्वराज्य हे राज्यातील प्रत्येक घटकासाठी आहे ही जाणीव शिवाजी राजांच्या मनात मासाहेबांनी निर्माण केली म्हणूनच राज्यातील अठरा अलुतेदार बारा बलुतेदार व प्रत्येक जाती धर्माचा मनुष्य स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण देण्यास तयार होता!राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी जिजाऊंची शिवबांना कशी शिकवण होती हे पोवाड्यातून मांडले आहे.कन्या विर जाधवाची जिने भारत लावले!

पुत्रा नीट ऐकविले!
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले!
सांगत मुळी कसे झाले!!
क्षेत्र वासी म्हणून नाव क्षत्रिय धरले !
क्षेत्री सुखी राहिले!!

अन्य देशी चे दंगेखोर हिमालय आले !होते लपून राहिले!!
पाठी शत्रू भोवती झाडी किती उपाशी मेले! गो मासा भाजून घाले!!सर्व देशी चाल त्यांचे गुलाम बनविले! डोलाने शूद्र म्हणाले!!ब्रह्मा मेल्यावर परशुराम पुंड माजले! उरल्या क्षत्रिया पिडले!!शुद्रा म्हणती तुम्हा मान रोवले! आज बोध आया फावले!!गाणे गात ऐका बाळा तुझ्या ओंजळी शिकले ! बोलो नाही मन धरले!!मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते व ते स्वप्न आपल्या मुलाच्या मनात उतरविले होते. स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ माँ साहेबांनी आपल्या मुलाला घडवले होते. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने पुणे उध्वस्त केले होते. त्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता आणि जो कोणी पुण्यात जाऊन नांगर धरील त्याचा वंश नष्ट होईल अशी त्याकाळी अंधश्रद्धा होती. पुरोगामी विचाराच्या जिजाऊ मासाहेब पुणे येथे आपल्या मुलाला म्हणजे शिवबांना घेऊन आल्या. सोन्याच्या फlळाने भूमी नांगरली पुणे सुजलाम-सुफलाम केले .शहाजीराजांनी शिवबांना स्वतंत्र राजमुद्रा दिली.

मासाहेब जिजाऊनी शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली .पिण्याच्या पाण्यासाठी आंबावडी व पुनवडी धरणे बांधून घेतली. शेतकऱ्यांना सर्व सोयी सवलती दिल्या. शिवबांच्या मनावर नैतिकतेचे संस्कार केले . तसेच शेतकरी, कोळी , कातकरी , मुसलमान , मराठी, मांग, महार विविध जाती-धर्माची मुले त्यांचे मित्र होते, मावळे होते . जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांनी शिवबांची साथ दिली. या मुलांसोबत जेवण करुन शिवबांनी अस्पृश्यता खऱ्या अर्थाने संपवली होती. समतेवर आधारलेले स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना दिली!मासाहेब जिजाऊ धोरणी, खंबीर होत्या. लहानपणी एकदा शिवबा घोड्यावरुन पडले. तेव्हा त्यांना उठवण्यासाठी कुणी गेले नाही. शिवबा आई साहेबांकडे आले व म्हणाले, आम्ही पडलो आम्हाला लागले, रक्त निघाले याचे आम्हाला दुःख नाही . परंतु आपण आम्हाला उठवायला आला नाहीत मासाहेब याचे मला दुःख वाटले . तेव्हा मासाहेब जिजाऊ म्हणाल्या की , जो मातीत पडतो त्याला कधीही उठवायचे नसते. मातीत पडलेल्या व्यक्तीला आपण उठवले तर तो स्वतःहून कधी उठू शकत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला उठवले नाही . मा साहेब जिजाऊ यांनी शिवबा राजेंना ज्याप्रमाणे घडवले त्याप्रमाणे आज आपण आपल्या मुलांना घडवणे आवश्यक आहे. तरच आपली मुले खंबीरपणे जबाबदारीने उभे राहतील!

मासाहेब जिजाऊ जेवढ्या खंबीर होत्या तेवढ्या करारी होत्या. एकदा लढाईला जाण्याअगोदर शिवाजी महाराज आईकडे आले आईला भेटले . त्यांच्या मनात विचार आला असावा की आपण परत आईला भेटतो की नाही. तेव्हा आऊसाहेब म्हणाल्या,’ शिवबाराजे तुम्ही निश्चिंत होऊन जा. लढाई जिंकून परत आला तर आम्हाला आनंद होईल .आणि परत आला नाही .. तर बाळराजे शंभू ना गादीवर बसून जातीने कारभार पाहू . एवढा करारीपणा जिजाऊंच्या ठिकाणी होता.’परस्त्री मातेसमान’ शिकवण जिजाऊंनी शिवबांना दिली होती. आज आपण पाहतोय की दिवसेंदिवस मुलीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. आपण आपल्या मुलांना एका स्त्रीची एका मुलीची कशाप्रकारे प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, मान राखला पाहिजे याची शिकवण दिली पाहिजे. तसं तर प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांवर संस्कार करत असतात परंतु जाणीव पूर्वक संस्कार करण्याची गरज आहेमासाहेब जिजाऊ अंधश्रद्धा पाळत नव्हत्या. तोरणा किल्ल्याच्या डागडुजी प्रसंगी सुवर्णमुद्रा व सुवर्ण मूर्ती सापडल्या होत्या. देवाच्या सुवर्णमूर्ती देवार्यात ठेवून काय करायचे आहे . त्यापेक्षा त्या सुवर्णमूर्ती वितळून त्याचा उपयोग स्वराज्य स्थापनेसाठी च्या कार्यात करावा अशी सूचना देणाऱ्या जिजाऊ या देवभोळ्या नव्हत्या तर प्रयत्नवादी होत्या! सुवर्ण मूर्ती वितळून तो पैसा स्वराज्याच्या कामी रयतेच्या सुखासाठी वापरा म्हणणार्‍या जिजाऊ पुरोगामी विचाराच्या प्रयत्नवादी स्री होत्या .कर्मकांड जपानुष्ठान करणाऱ्या आजच्या स्त्रीने जिजाऊंचा आदर्श घेणे आवश्यक आहे!

शहाजी राजे यांच्या निधनानंतर जिजाऊ सती गेल्या नाही . पती मागे सती जाण्याची चाल त्या काळात प्रचलित होती. पुरोगामी विचाराच्या जिजाऊ मासाहेबांनी सती न जाण्याचा निर्णय घेतला .सती न जाता त्यांनी स्वराज्य स्थापन करून प्रजेच्या कल्याणाची प्रजेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रेरणा होती.मासाहेब जिजाऊ न्यायप्रिय होत्या. जिजाऊ मा साहेबांनी दादोजी कोंडदेवाचा निर्णय फिरवल्याचा उल्लेख आहे. न्यायप्रिय आई न्यायप्रिय मुलगा यांच्या जोडीतूनच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले होत.एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या रांझेपाटील यांचे हात-पाय कलम करणारे शिवाजीराजे आपल्या आईच्या शिकवणीतून घडले होते. आज जिजाऊ शिवरायांच्या न्यायव्यवस्थेची खरी गरज आहे.

आज जर एखाद्या स्त्रीवर मुलीवर अन्याय झाला अत्याचार झाला तर न्याय सुद्धा मागण्याची त्यांची हिंमत नाही. कारण समाजाची मानसिकता याला जबाबदार आहे. ज्या मुलीवर स्त्रीवर अन्याय होतो अत्याचार होतो त्या स्त्रीकडे समाजातील लोक वाईट नजरेने बघतात. झालेल्या सर्व घटनेला त्या स्त्रीला जबाबदार धरलं जातं. अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत समाजाचा निकोप होत नाही तोपर्यंत कोणीही अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास पुढे येणार नाही. स्त्री असो वा पुरूष त्यांनी अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तरच समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींना लगाम बसेल. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडवले परंतु वेळ प्रसंगी त्या वीर माते सोबतच वीरांगना ही असल्याचे जाणवले. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ गडात अडकून पडले होते. तेव्हा जिजाऊंच्या मनात वीरश्री संचारली त्या म्हणाल्या “ आता शिवबा वाचून एक क्षणही राहणे अशक्य आहे. मी स्वतः सैन्य घेऊन जाते आणि सिद्दी जोहरचा निकाल लावते पन्हाळगडावर अडकलेल्या शिवबाला सोडवण्यासाठी मी तेवढा वेडा फोडते” या प्रसंगातून जिजाऊंच्या वीर वृत्तीचे करारीपणा चे दर्शन घडते . ‘मरणाने वैर संपते’ असं म्हणतात. अफजल खानाची समाधी अफजलखान बुरुज म्हणून प्रसिद्ध आहे . जिजाऊंनी अफजल खानाची समाधी बनुन हे सिद्ध केले की मानवता हाच खरा धर्म आहे.

6 जून 1674 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवरायांनी मातेचे दर्शन घेतले.
याचसाठी केला होता अट्टहास!शेवटाला दिस गोड व्हावा! या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे सर्व काही व्यवस्थित पार पडले.17 जून 1674 रोजी राजधानी राजगडाच्या पायथ्याशी. असलेल्या पाचाडच्या वाड्यात जिजाऊंनी देहत्याग केला. दोन-दोन छत्रपतींना घडविणाऱ्या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताची अस्मिता जागृत करणाऱ्या जिजाऊ मा साहेब यांची प्राणज्योत मालवली.
मासाहेब जिजाऊ एक आदर्श मातृत्व!! मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर जसे सुसंस्कार केले होते तसे सुसंस्कार प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलावर करण्याची आज गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पुढच्या पिढीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत . मोठ मोठी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आपल्या मुलांच्या ठायी निर्माण करणे आवश्यक आहे. आणि हे सर्व करत असताना जिजाऊंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे तितकेच आवश्यक आहे! विज्ञान-तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे परंतु हे तंत्रज्ञान म्हणजे दुधारी तलवारी प्रमाणेच आहे . आपण या तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करतो त्यावर ते अवलंबून आहे. आज घराघरांमध्ये टीव्ही नावाचा इडीयट बॉक्स आहे टीव्हीवर दाखवले जाणारे कार्यक्रम आपल्या मुलांच्या संस्कारक्षम मनावर प्रभाव टाकतात म्हणून मुलांनी काय पहावे काय पाहू नये यावर पालकांचा कटाक्ष असावा.

आज मुलांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत किंबहुना आई-वडील त्यांना त्या सुविधा पुरवतात परंतु मुलांना नाही ऐकण्याची सवय लावणे आवश्यक आहे . अपेक्षाभंगाची लस मुलांना लहानपणी टोचली नाही तर मोठेपणी अमुक वस्तू मिळाली नाही म्हणून आत्महत्या करणारी मुले आहेत. नियमित खत-पाणी मिळालेल्या झाडाची मुळं जशी खोलवर रुजत नाही तसेच सर्व सुखसोयी मिळाल्यावर अपेक्षाभंगाचे दुःख मुलांना सहन होत नाही.तसंही प्रत्येक जीव स्वतंत्र असतो. त्याला आपले अस्तित्व असतं. आपण मुलांच्या स्वतंत्र विचाराचा आदरही केला पाहिजे . मुलांना त्यांची ध्येय ठरवू द्यावीत, त्यांचे स्वप्न साकार करून द्यावीत . उंच आकाशात भरारी मारण्याचं बळ त्यांच्या पंखात आपण भरू शकतो . शेवटी उडान घेण्याचं काम त्यांचं त्यांना करायचं आहे . चला तर मग एकमेकींच्या सहकार्याने आचार विचाराच्या आदान प्रदानाने आपल्या मातृत्वाला सकारात्मक दृष्टिकोन देऊया!!

✒️लेखिका:-श्रीम.मनिषा अनंता अंतरकर (जाधव )
7822828708
Saiantarkar@gmail.com