कुंडलवाडीच्या परिसरात पट्टकादंब हंस या विदेशी पक्षी पाहुण्यांचे आगमन

39

🔸परिसरातील तलाव मनमोहक दृश्यांनी फुलले

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.13जानेवारी):-शहराच्या परिसरातील तलाव सध्या मनमोहक दृश्यांनी फुलले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या विदेशी पाहुण्यांच्या आगमणाने पक्षी प्रेमींसाठी मनमोहक दृश्यांची मेजवानीच घडत आहे.
सध्या कुंडलवाडी शहराच्या परिसरातील तलावात पाहुणचारासाठी विदेशातील पक्षी पाहुणे म्हणून मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या पक्षांना इंग्रजीत बार हेडेड गीज तर मराठीत पट्टकादंब हंस म्हणतात.पट्टकादंब हंस हे पक्षी जगात सर्वात उंच उडणारे पक्षी म्हणून त्यांची ओळख आहे. हे स्थलांतरित पक्षी असून जवळपास ३० हजार फीट उंच म्हणजेच जेट विमानाच्या बरोबरीने उडतात.

सध्या हे विदेशी पाहुणे कुंडलवाडी करांचा पाहुणचार घेण्यासाठी आले असता त्यांना तालुक्यातील हुनगुंदा येथील रहिवासी असलेले पक्षीनिरीक्षक क्रांती बुद्धेवार यांनी कॅमेराबद्ध केले आहे.पट्टकादंब हंस हा पक्षी भारतीय हंसासारखा असतो. त्याला सामान्यपणे बार हेडेड गीज या नावाने ओळखले जाते. संस्कृतच्या वेदांमधील उल्लेखामुळे त्याला कादंब हे नाव पडले. या पक्ष्यांच्या डोक्या मागील काळ्या-आडव्या खुणांमुळे त्याला पट्ट हे नाव देण्यात आले. या पक्षांचे मुख्य वास्तव्य कजाकिस्तान, तिबेट, मंगोलिया आणि रूस पासून हिमालय ओलांडून डिसेंबर महिन्याच्या शेवटी भारतात प्रवेश करतात.पट्टकादंब हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्षामधून एक असून तो मकालू पर्वतावरून उडत येतो. एवढ्या उंचीवरून उडताना त्याला हवेतील केवळ १० टक्के ऑक्सिजनची गरज असते.

हा राखाडी रंगाचा, बदकाच्या जातीतला म्हणजेच पायांना पडदे असलेला पक्षी आहे. डोळे मिटून विश्रांती घेणारे हे पक्षी एक ठराविक अंतर राखून आपल्याला जवळ येऊ देतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटी येणारे हे पट्टकादंब हंस किंवा बार हेड गीज हे मार्चपर्यंत येथे मुक्काम करतात. आणि लगेच तिबेटच्या दिशेने उलट्या प्रवासाला लागतात. असे ह्या विदेशी असलेल्या पक्षी पाहुण्यांच्या आगमनाने कुंडलवाडी परिसरातील तलाव मनमोहक दृश्यांनी फुलून गेले आहे. त्यामुळे शहर व परिसरातील पक्षी प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरत आहे.