विवेकानंद साहित्य मानवाला कृतिप्रवण करणारे – शंकर तडस

24

🔹युवा प्रतिष्ठान कोरपना व ब्रदर्स ऑन ड्युटी यांच्या तर्फे कोरपना येथे राष्ट्रीय युवक दिन साजरा

✒️कोरपना(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोरपना(दि.13जानेवारी):-जी व्यक्ती स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या संपर्कात आली ती स्वस्थ बसत नाही. मानव सेवेसाठी ती कृतिप्रवण झाल्याशिवाय राहत नाही, असे मत प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ पत्रकार व श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, वडगाव, चंद्रपूरचे सदस्य शंकर तडस यांनी व्यक्त केले. कोरपना येथे स्वामी विवेकानंद जयंती आयोजन समिती तर्फे आयोजित ‘स्वामी विवेकानंदाचा युवकांना संदेश’ याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे तर प्रमुख उपस्थिती गुरुदेव सेवा मंडळाचे मिन्नाथ महाराज पेटकर, चंद्रपूर शासकीय रुग्णालय रक्तपेढीची चमू, नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर डॉ. शारदा येरमे, डॉ. प्रवीण येरमे, राजीव गांधी मेडिकल कॉलेज आदिलाबादचे डॉ. नरसिंमा रेड्डी, अजिजभाई, सामाजिक कार्यकर्त्या सविता जेणेकर, कोरपना नगर पंचायतचे उपाध्यक्ष भारत चन्ने, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे, ब्रदर्स ऑन ड्युटीचे दिनेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

मिन्नाथ महाराज यांनी युवकांनी संतविचाराचा वारसा जपण्याचे आवाहन आपल्या मनोगतात केले. यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 80 रक्तदात्यानी रक्तदान केले. यावेळी IIT मुंबई येथे प्रवेश प्राप्त केलेला गुणवंत विद्यार्थी निशांत अनंता रासेकर याचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना शंकर तडस म्हणाले, स्वामी विवेकानंदाचे विपुल साहित्य उपलब्ध आहे.

यश कोणत्याही क्षेत्रात गाठायचे असेल तर विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार आपण प्राप्त केले पाहिजे. त्यातून माणूस म्हणून जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती प्राप्त होईल व आदर्श व्यक्तिमत्व घडेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच संचालन शामसुंदर वाघमारे यांनी केले. श्रीरामकृष्ण आश्रमातर्फे रुचीत भोंगळे यांनी विवेकानंद साहित्याचा स्टॉल लावला होता. कार्यक्रमाला युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी व सामाजिक संघटनाच्या सदस्यांनी सहकार्य केले.