शासकीय धान्य गोदामातील हमाल मापाडींना सोयी सुविधा देणार- ना. छगन भुजबळ

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

मुंबई(दि.13जानेवारी):-मंत्रालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक झाली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील,सहसचिव मनोज सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव व महामंडळाचे पदाधिकारी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी, त्यावरील लेव्ही, त्यांचे नियमित वेतन असे विविध प्रश्न सोडविण्यात येतील तसेच शासकीय धान्य गोदामात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

कोरोना कालावधीत हमाल-मापाडी यांनी चांगले काम केले. लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेला अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी पार पाडली. हमालांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील सर्व शासकीय गोदामात हमालांसाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच गैरव्यवहार करणारे कंत्राटदार व बोगस हमाल मापाडी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले.

वर्धा, पंढरपूर, सांगली, बीड, औरंगाबाद येथील हमालांच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या गैरसोयीबाबत श्री.बाबा आढाव यांनी निवेदन दिले. या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी यांना सकारात्मक कार्यवाही करणेबाबत कळविण्याचे निर्देश दिले.शासकीय गोदामांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 885 पैकी 448 गोदामात शौचालय व पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधांची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यानुसार शासनाने 8.62 कोटी रूपये मंजूर केले असून यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED