घोड्यासोबत गाढवाचा वाढदिवस- घोड्याची झाली किंमत कमी

42

वाढदिवस हा शब्द आता दर दिवस कानावर पडत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दररोजच कोणाचाना कोणाचा वाढदिवस हे हमखास असणारच हे निश्चिती ढरले आहे.
वाढदिवस या शब्दाचा अर्थ आहे. “जी व्यक्ती त्या तारखेला जन्माला आली तो दिवस इतर व्यक्ती त्या व्यक्ती सोबत घेवुन केक कापून, पुष्पहार देऊन जन्मदिवस साजरा करतात त्याला वाढदिवसाच्या म्हणतात. पूर्वीच्या काळी एखाद्या कर्तबगार व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जायचा किंवा नवीन जन्माला आलेले मुलगा किंवा मुलगी यांचा वाढदिवस साजरा केल्या जात असत. पण आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दर दिवस एकाचा वाढदिवस केला जात आहे. वाढदिवसाचे स्वरुप बदलायला लागले आहे.

23 नोव्हेंबर 2018 मध्ये अभिनेता लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटातील भाई का बर्थ डे वाजले बारा या गाण्याने जे काही तरुणाईला चांगलंच भुरूळ पाडल. राजकारणापासून ते गल्लीतील भावी ग्रामपंचायत सदस्य, भावी नगरसेवक सेवका पर्यंत फक्त एकच वाक्य आज भाई का बर्थडे है. वाढदिवस साजरा करणे चांगली गोष्ट आहे. पण आता वाढदिवस कोणाचा साजरी करावयाचे याची नियमावली तयार करायला हवे. घोड्याच्या वाढदिवसा सोबत गाढवाचा वाढदिवस होत असल्याने घोड्याची किंमत कमी होत आहे असे दिसते. समाजामध्ये ज्यांनी आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय ,उच्च पदस्थ पद भूषवले, आपले व आपल्या परिवारा चे नाव लौकिक केले असेल अशा व्यक्तींचा वाढदिवस साजरा करायला काही हरकत नाही.

पण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत दारू पिऊन गुटखा खाऊन, गांजा ओढून, नशेत असणाऱ्या व्यक्तींचा भर रस्त्यावर चौकात फटाके वाजवून वाढदिवस साजरा करणे म्हणजे निव्वळ फालतूपणा आहे.आई-वडिलांना आपल्या जन्मदात्या मुला मुलीची फार अपरुग असते. त्या मुला मुलीचा आईवडिलांनी घरीच वाढदिवस साजरा केला तर काही हरकत नाही. इतरांना त्रास देऊन पैशाची उधळपट्टी करून वाढदिवस साजरा का करता. आताच्या घडीला राजकीय व्यक्तीकडून छोट्या छोट्या कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा जणू नवीन फंडाचा आला आहे. भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक ,भावी सरपंच आपल्या घरच्या कोणाचा वाढदिवस आला तर साजरा करणार नाहीत, पण राजकारणासाठी भर रस्त्यावर दहा किलोचा केक, पाच हजाराची फटाक्यांची लड आणि बिर्याणी डेग हे चित्र हमखास पाहण्यास मिळत आहे.

वाढदिवसाचे स्वरूप हे सामाजिक बांधिलकीतून निर्माण व्हायला हवे समाज उपयोगी कार्य यामध्ये झाले पाहीजे रक्तदान, गरीब मुलांची शाळेची फीस, त्यांना कपडे, वही-पेन, वर्षभर साजरा होणाऱ्या वाढदिवसा मधून एखाद्या अनाथ किंवा वडील नसलेल्या मुलीचे आपण त्या पैशातून लग्न लावणे हे फार मोठ्या वाढदिवस साजरा केल्यासारखे होईल. अशा पद्धतीचा जर वाढदिवस साजरा झाला तर येणारी पिढी ही आदर्श स्वीकारेल आणि समाजामध्ये ही आदर्श निर्माण होईल हाच खरा तुमचा वाढदिवस असेल.

✒️लेखक:-गुणवंत मुंजाजी कांबळे (गंगाखेड)