परंपरेच्या जोखंडात गुदमरतोय श्वास!!

28

पुर्वापार चालत आलेल्या काही परंपरा आजही अस्तित्वात आहेत. परंपरेचे हे जोखंड स्त्रीयांना आणि मुलींनाच जास्त त्रासदायक आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अर्धी आहे. स्त्रियांची प्रगती म्हणजे राष्ट्राची प्रगती असे मानले जाते. पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाहा सारखी समस्या आजही अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशभर असे बालविवाह आजही होतात. कोरोना काळामध्ये बालविवाहाचे प्रमाण खूपच वाढलेआहे. कमी खर्चात मुलीचे लग्न आटोपून मुलींचे वडील एका जबाबदारीतून मुक्त होऊ पहात आहेत. परंतु या बालविवाहामुळे पुढे अनेक समस्या निर्माण होतात याची जाणीव होण्याइतपत समज पालकांना नाही परंतु ज्यांना कोणाला या समस्येचे गांभीर्य माहित आहे त्यांनी तरी या समस्येचा विचार करावा. कितीतरी मुलींचे कमी वयात विवाह होत आहे. हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकंदरीत समाजाच्या राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही.

राजकारणी लोक ज्या पद्धतीने राजकीय समस्याचा मागोवा घेतात त्याच पद्धतीने बालविवाह या सामाजिक समस्याचाही त्यांनी मागोवा घ्यावा. गोरगरीब, शेतकरी, मजूर आपल्या मुलींचे बालविवाह करत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावी. जेणेकरून मुलींची यातून सुटका होईल. शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही मुली आई-वडिलांच्या इच्छेखातर बोहल्यावर चढतात. या जोखंडात मुलींचा श्वास गुदमरत आहे. मोकळा श्वास घेण्यास सहाय्य करावे. गुणवत्तेच्या बाबतीत दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये मुली इतिहास रचतात. कोणत्याही परीक्षेत मुली मुलांपेक्षा पुढे असतात. मुलींना, महिलांना सहानुभूती व मदतीपेक्षा संधी देण्याची गरज आहे. संधी मिळताच संधीच सोनं कसं करावं हे मुलींकडून शिकावं. खूप शिकण्याची इच्छा असतानाही आपल्या आई-वडिलांवरील ओझ आपण कमी करावं. ओझं म्हणावं लागेल कारण आजही ग्रामीण भागांमध्ये मुलींना ओझं समजलं जात. (काही सन्माननीय अपवाद असतीलही जे मुलींना ओझं समजत नाही आणि मुलाप्रमाणे वागणूक देतात.)एकंदरीत मुला-मुलींना समान वागणूक दिली जात नाही. सरकारने अशा काही योजना कराव्यात की, जेणेकरून बालविवाह होणार नाहीत. मुलींना शिक्षणाची संधी मिळेल व त्या स्वतःला सिद्ध करून दाखवतील.कितीही संकट आले तरी त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.

शारीरिक मानसिक परिपक्वता प्राप्त होण्याआधी मुलाचा किंवा मुलीचा केला जाणारा विवाह म्हणजे बालविवाह होय. शिव फुले, शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातच नाही तर देशभर असे बालविवाह सर्रासपणे होत आहे. covid-19 च्या काळात म्हणजे 2020साली 2019 च्या तुलनेत 73.8/ बालविवाह झाले आहे. बेटी बचाव बेटी पढाव च्या घोषणा देणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह होत आहे.हे बालविवाह म्हणजे मुलींच्या मानवी हक्काविरुद्ध आहे. देशातील 15 ते 18 वयोगटातील 30% मुलींच्या गळ्यात दरवर्षी मंगळसूत्र पडते . ग्रामीण भागात सातवी आठवी पर्यंत मुलीचे शिक्षण झालं की, मुलीच्या विवाहाचा विचार सुरू होतो. हिंदू विवाह कायद्यानुसार मुलीच्या विवाहाचे वय 18 वर्षे मुलाचे 21 वर्ष ठरलेले आहे. कायदा अस्तित्वात आहे . बालविवाह निषेध अधिनियम 2006 कायदा बालविवाहास प्रतिबंध करतो.तरीही सर्रासपणे बालविवाह होत आहेत. कायदा आहे सर्व आहे तरीही तेरी भी चूप मेरी भी चुप या पद्धतीने सर्रासपणे बालविवाह होत आहेत. ज्या मुलींच्या मानवी हक्काची पायमल्ली होते त्या मुलींना मानवी हक्काची जाणीव नाही. असेल तरी कशी एवढ्या कमी वयात मानवी हक्काचे शिक्षण त्यांना कोण देईल?? तसेही देशातील 53 टक्के महिलांना मानवी हक्काबद्दल काहीही माहिती नाही. अशा परिस्थितीत कोणीही काहीही तक्रार करत नाही.

आपले राहणीमान सुधारले, जीवनमानाचा दर्जा सुधारला परंतु आजही बराच समाज रूढीवादी, जातीवादी संकल्पनाना सोडता सोडत नाही. आपल्या देशातील राजकारणी लोक खाजगीकरण, उदारीकरण यासारख्या गोष्टीचा लगेच स्वीकार करतात. जगात पुढे जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे परंतु त्या तुलनेत रूढीवादी, जातीवादी, महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रथा-परंपराना नकार देण्यास कुणीही पुढे सरसावत नाही. राहणीमान आधुनिक झाले परंतु विचार मात्र बुरसटलेले आहेत ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. संवेदनशील मुलींसाठी महिलांसाठी कायदे बनवताना या समस्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही आणि ज्या काही योजना अस्तित्वात आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. covid-19च्या काळात बालविवाहाचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. covid-19च्या काळात जे आर्थिक नुकसान झाले आहे ते भरूनही निघेल परंतु या काळामध्ये जी काही सामाजिक हानी होत आहे ती भरून निघणार नाही.सध्या शिक्षण बंद म्हणून आई-वडील नातेवाईक मुलींचे विवाह लावून देत आहेत. Covid-19 मुळे मुलींचं शिक्षण काही काळ थांबलं आहे परंतु मुलींचे बालविवाह लावून देऊन आई- वडिलांनी मुलींचे शिक्षण कायमचेच बंद केले आहे. आजही बालविवाह होतात परंतु covid-19 च्या काळात बालविवाह मध्ये वाढ झालेली आहे म्हणून बालविवाह या समस्येबद्दल सध्या थोडीफार चर्चा सुरू आहे. या चर्चेतून मार्ग निघावा आणि या समस्येतून कायमस्वरूपी तोडगा निघावा.

बालविवाहाला पालकांची मानसिकता अधिक जबाबदार आहे. मुलगी म्हणजे परक्याचे धन! मुलीला शिकून काय करायचे? मुली शिकल्या तरी त्याचा आपल्याला काय उपयोग? शेवटी भाकरीच करायच्या आहेत आणि सध्या ग्रामीण भागात एक नवीन वर्ग निर्माण होत आहे तो म्हणजे शिकून तरी काय करायचे आहे. शिकून काय नोकरी लागणार आहे का? मुलींना शिकवलं तर त्या शेतात काम करतील का? गावात मुलींच्या शिक्षणाची सोय नाही. तालुक्याच्या ठिकाणी कशाला पाठवायचे? जमाना खराब आहे . उगाच काही वाईट वंगाळ झाले तर काय करावे. मुलीची जात आहे . आपलं लवकर लग्न करून दिलेलं बर !आपणही मोकळे होतो एकदाचे ! शिवाय आमची गरिबी आहे. मुलाकडचे म्हणतात आम्हाला काही नको फक्त मुलगी आणि नारळ द्या. एकदा का मुलीचे लग्न झाले की, आपले गंगेत घोडे न्हाले . तिला लेकरू बाळ झाले की, ब्रह्मानंदी टाळी वाजली अशा संकुचित मानसिकतेमुळे मुलींचे बालविवाह होत आहेत. पालकांची ही मानसिकता अज्ञान दूर करण्यासाठी शासन काय करते? देशात लैंगिक अत्याचाराच्या घडत असलेल्या निर्दयी घटनांना लगाम बसवा. तरच पालकांची मानसिकता काही अंशी बदलेल. असुरक्षिततेच्या भावनेमुळे ही बालविवाह होत आहेत . सरकारने यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात तसेच कायद्याची अंमलबजावणी करणारी व्यवस्था काटेकोर असावी. शाळा महाविद्यालयांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी चोख व्यवस्था असावी. मानसिक परिपक्वता येण्यापूर्वी मुलीवर असू व मुलावर संसाराची जबाबदारी टाकने म्हणजे त्यांच्या मानवी हक्काचे उल्लंघन करणे होय. बालविवाहाचे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतात. संपूर्ण शारीरिक वाढ होण्याअगोदर अकाली स्त्रीवर मातृत्व लादले जाते. 18 वर्षापेक्षा कमी वयात 22 टक्के मुली अपत्याला जन्म देतात. वयाच्या वीस वीस वर्ष आधी विवाह झाल्यास मातामृत्यूची शक्यता पाच पटीने वाढते . बाळाच्या तसेच आईचा मृत्यूदरात वाढ होते. यातूनच पुढे कुपोषणाच्या समस्या निर्माण होतात. भारत देशामध्ये 50.3 टक्के गर्भवती महिलांना रक्ताची कमतरता भासते. कुपोषण , शारीरिक दुर्बलता आणि बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होते . या सारख्या अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात आणि यातूनच पुढे मानसिक सामाजिक समस्या निर्माण होतात.

बालविवाह म्हणजे समाजाला लागलेला एक रोगच !यासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती झाली पाहिजे. प्रिंट मीडिया चैनल मीडिया यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. बालविवाह होण्याचे ऐक कारण म्हणजे शिक्षणाचा प्रसार पाहिजे तसा झालेला नाही. गरिबीमुळे मागास वर्गात मजूर, शेतकरी यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व राहिले नाही. शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे शिक्षण गरिबासाठी राहिले नाही असा एक नवीन वर्ग निर्माण झालेला आहे. अशिक्षित पालक वर्गाला शिक्षणाचे महत्त्व वाटत नाही.

राजकारणी लोकांचे लक्ष राजकीय समस्या कडे लगेच वेधले जाते त्या प्रमाणात इतर सामाजिक समस्या कडे जात नाही. निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या वाडीवस्तीवर प्रचार-प्रसारासाठी राजकारणी लोक जातात त्या गरीब, मजूर, शेतकऱ्यांचे काय हाल आहेत त्याकडेही लक्ष द्यावे. गरिबाच्या, मजुराच्या शेतकऱ्यांच्या मुली शिकतात का? त्यांना शिक्षणात काय अडचणी आहेत त्याही जाणून घ्या जरा !मुली बालविवाहामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहे. आपल्यामध्ये असलेल्या कला कौशल्याचा विकास करण्याची संधी त्यांना मिळत नाही. मुलींना चांगला पोषक आहार, शिक्षण, सन्मान पाहिजे. बालविवाह नाही. एकूण परिस्थिती गंभीर आहे घाईघाईत केले जाणारे विवाह यशस्वी झाले तर ठीक नाहीतर बारीक-सारीक गोष्टीवरून मुलींना दूषणं लावून माहेरी सोडणारे लोकही आहेत.त्यातूनच पुढे परीत्यक्त्या स्त्रीयांच्या समस्याही निर्माण होतात.

राज्यसरकार तसेच केंद्रसरकार यांनी ठोस उपाययोजना करून बालविवाह रोखून मुलींना शिक्षणाची हमी देऊन उज्वल भविष्याची संधी द्यावी. पालकांनीही मुलींना उंच भरारी घेण्यास प्रोत्साहन द्यावे. मुलींचे पंख छाटू पाहणाऱ्यांना वेळीच दंडीत करावे. मुलींच्या मानवी हक्का आड येणाऱ्यांना वेळीच समज मिळायला हवी.

✒️लेखिका:-श्रीम.मनिषा अनंता अंतरकर
( जाधव)7822828708
ता. अंबड जि. जालना
Saiantarkar@gmail.com