कामगार- शेतकरी हिताचे संशोधन व्हावे – कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

30

🔹नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेचे नुतनीकरण

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

मुंबई(दि.21जानेवारी):- आयुष्यभर काबाडकष्ट करणा-या कामगार आणि शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या हिताचे संशोधन श्रमविज्ञान संस्थेने करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबई येथे केले.

मुंबईच्या परळ भागातील कै.नारायण मेघाजी लोखंडे श्रमविज्ञान संस्थेच्या अद्ययावतीकरणाचा उद्घाटन समारंभ कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कामगार राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते. कामगार मंत्री श्री. वळसे पाटील यांनी यावेळी कामगार चळवळीच्या इतिहासाला उजाळा देत संस्थेला शुभेच्छा दिल्या.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, शेतकरी आणि कामगार आयुष्यभर कष्ट करतच जगत असतो. त्यामुळे त्यांचे जीवनमान कसे उंचावेल याबाबतचे संशोधन या संस्थेद्वारे व्हावे. कामगार आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी यावेळी विविध योजनांची माहिती दिली. संस्थेच्या नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले. या संस्थेतील सभागृह, ग्रंथालय व अभ्यासिकेचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.