माध्यमांना घराणेशाहीच प्रिय आहे का ?

44

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष, विचार यावर कधीच होत नाही. भावकी, बुडका या सारख्या मुद्द्यावर होतात. अलिकडे पैशाचा वापर खुप वाढलाय. अशा स्थितीत या वेळी काही ठिकाणचे निकाल खुप वेगळे आणि धक्कादायक लागले आहेत. त्यात बहूचर्चित पाटोदा गावची निवडणूक दखल घेण्यासारखी झाली आहे. तेथील लोकांनी पोटोद्याचे पंचवीस वर्षे सरपंच राहिलेल्या भास्करराव पेरे पाटलांच्या मुलीला पाडले. या मुद्द्यावरून राज्यातला मिडीया “पेरे पाटलांचा पराभव, पेरे पाटलांची सत्ता संपुष्टात !” अशी हाकाटी पिटतो आहे. खरेतर हा पेरे पाटलांचा पराभव नाहीच. त्यांनी तिथे पँनेलही लावले नाही किंवा मुलीचा प्रचारही केला नाही. ते स्वत:हून निवृत्त झाले आहेत. ते लढलेच नाहीत तर त्यांचा पराभव कसा ? खरेतर ह् पेरे पाटलांचा पराभव नव्हे तर त्यांनी तिथे रूजवलेल्या लोकशाहीचा विजय आहे. पेरे पाटलांनी पाटोद्यात प्रचंड काम केले, गावाचा चेहरामोहरा बदलला. गावाला राज्य आणि देश पातळीवर चमकवले. पेरे पाटलांनी इतके काम करूनही त्यांच्या मुलीचा पराभव कसा झाला ? हा यक्ष प्रश्न माध्यमांना पडला आहे. पेरे पाटलांनी पत्रकारांना याची खुप चांगली उत्तरं दिली आहेत, तरीही माध्यमातली मंडळी मुर्खासारखी परत तेच तेच प्रश्न विचारताना दिसतायत. माध्यमातल्या मंडळींचे प्रश्न ऐकून त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे ? त्यांना या देशात लोकशाही आहे याचे भान तरी आहे का ? त्यांना घराणेशाहीच प्रिय आहे का ? असे प्रश्न पडतात.

पाटोद्यात लोकांनी पेरे पाटलांच्या मुलीला नाकारले हा लोकशाहीचा विजय आहे. देशात लोकशाही आहे. ती लोकांनी आत्मसात करायलाच हवी. पाटोद्यातील लोकांनी ती आत्मसात केलीय यासाठी भास्करराव पेरे पाटलांचे व पाटोदावासियांचे अभिनंदन करायला हवे. गावात पेरे पाटलांनी चांगले काम केले म्हणून मुलीला निवडूण का द्यावे ? तिने काम करावे, लोकांच्यात जावे, आपली गुणवत्ता आणि क्षमता सिध्द करावी, त्यानंतर लोक तिला देतील निवडूण. सरपंचाचा पोरगा सरपंच, आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार हे दुष्टचक्र कुठवर चालवायचे ? भारतात लोकशाहीच्या मानगुटीवर घराणेशाही प्रस्थापित केली गेली आहे. सर्रास नेत्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना, मुलींना व बायकांना उमेदवारी दिली जाते. भारतीय लोकांचे नशिब इतके चांगले आहे की नेत्यांनी पाळलेल्या पाळीव कुत्र्यांना अजून उमेदवारी दिली जात नाही. नेत्यांच्या पोरांनी, नातेवाईकांनी जरूर राजकारण करावे. राजकारणात प्रस्थापित व्हावे, त्याला अजिबात विरोध नाही. पण बाप आमदार आहे, बाप खासदार आहे म्हणून लायकी नसलेली पिलावळ लोकांच्या भोकांडी का व कशासाठी ? नेत्यांनी बांधलेल्या गुलामांच्या झुंडी आणि लाचारांच्या फौजा घेवून लोकशाहीचा मुडदा सर्रास पाडला जातोय. लोकशाहीच्या पोटात संस्थानं आणि संस्थानिक खुषाल पोसले जातायत.

लॉर्ड डलहौसीने भारतातली संस्थानं खालसा केली. त्यानंतर १९४७ साली सरदार पटेल आणि व्ही पी मेनन यांनी देशातली संस्थानं खालसा करत त्यांचे विलीनीकरण केले. पण स्वातंत्र्यनंतर देशात लोकशाहीच्या माध्यमातून काही संस्थानं पुनर्जीवीत करण्यात आली व काही नवी निर्माण करण्यात आली. मतपेटीच्याच माध्यमातून आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार होतो आहे. राजकीय पक्ष याच लोकांचे राज्याभिषेक करताना दिसतात. एखाद्या नेत्याचा मृत्यू झाला तर त्याच्याच घरात उमेदवारी दिली जाते. पार्टीसाठी रात्रंदिवस मरणा-या, राबणा-या व झिजणा-या कार्यकर्त्यांनी उमेदवारीची कधी अपेक्षाही करायची नाही. नेत्यांची पोरं शेंबडी असली, लंपट असली, भामटी असली, बिनडोक असली तरी लोकांच्या उरावर बसवली जातात. त्यांची लायकी नसताना सत्तेच्या व संपत्तीच्या जोरावर त्यांचे राज्याभिषेक केले जातात. बापानंतर पोरालाच प्रस्थापित केले जाते. नेत्यांचा दिवा पेटला नसेल तर मुली असतात, मुलगी नसेल तर बायको किंवा सुनेला उमेदवारी दिली जाते पण पक्षातल्या दुस-या व तिस-या फळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात नाही.

कळत-नकळत लोकशाहीच्या आडून परत संस्थानिक व संस्थानं निर्माण केली जात आहेत. राजकारणातल्या मुठभर लोकांनी अशी काही व्यवस्था निर्माण केली आहे की कुणी सामान्य माणूस पात्रता असली तरी निवडणूकीच्या मैदानात उतरण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. लोकशाहीचा चौथा खांब असलेला मिडीयासुध्दा या घराणेशाहीच्या आहारी गेला आहे. माध्यमंसुध्दा नव्या नेतृत्वांना संधी देत नाहीत, त्यांना घडवत नाहीत. त्यांना स्पेस देत नाहीत, त्यांच्या बातम्या लावत नाहीत. नेते व त्यांची पोरं हागली-मुतली तर पान भरून बातम्या येतात. दोन चाकी गाडीवर बसला बातमी, वडापाव खाल्ला बातमी, चादरीवर बसला बातमी, चटईवर बसला बातमी, चड्डी घातली बातमी, काढली बातमी अरे काय हे ? न्युज चँनेलवालेही असलेच. दांडके घेवून याच पिलावळींच्या मागे. हा दुजाभाव माध्यमं करतात. त्यांना लोकशाही मान्य नसल्यासारखे बेजबाबदार वर्तन करतात. माध्यमांनी लोकांना या घराणेशाहीबाबत प्रश्न विचारायला हवेत. नेत्यांचीच पोरं का निवडूण देता ? त्यांच्याच घरी उमेदवारी का ? इतर कुणाची लायकी नाही का ? अख्ख्या मतदारसंघात नेत्यांच्या घरची मंडळी सोडली तर एकही माणूस लायकीचा नसतो का ? असे सवाल माध्यमांनी लोकांना व राजकीय पक्षांना करायला हवेत. पण इथे नेत्यांच्या मुलांना नाकारले की माध्यमांना अचंबा वाटतो. त्यांना तो निकाल पचत नाही. त्याचाच प्रत्यय पाटोद्यात आला. लोकशाहीत राजा हा मतपेटीतून जन्माला येतो असे आंबेडकरांनी म्हंटले होते. पण त्याच लोकशाहीच्या आड दडत राजा जन्माला घालणारी नवी संस्थानं निर्माण करून ठेवली आहेत. सर्वच पक्षांनी ती पोसली आहेत.

राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील त्यांच्या भाषणात सांगायचे की, माझ्यानंतर माझ्या घरातले कुणी आमदार होणार नाही, राजकारणात उमेदवारी करणार नाही. माझा सामान्य कार्यकर्ता उमेदवारी करेल, तोच माझा राजकीय वारसदार असेल. पण आर आर पाटलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीस पुरोगामी पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यांचे शिक्षण नाही, कसलाही अनुभव नाही, कधी घराच्या बाहेर नाही तरीही त्यांनाच उमेदवारी दिली. त्यांच्या मुलाचे वय बसत नव्हते म्हणून पत्नीला आमदारकी देण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी तर २०२४ च्या निवडणूकीत आर आर पाटलांच्या मुलास उमेदवारी देणार असल्याचे घोषित करून ठेवले आहे. आर आर यांच्या पत्नीचे, त्यांच्या मुलाचे सामाजिक काम काय ? समाजासाठीचे योगदान काय ? त्यांची वैचारिक भूमिका काय ? प्रगल्भता काय ? तालुक्याच्या विकासाचे व्हीजन, विकासाचा कृती आराखडा त्यांच्याकडे आहे काय ? लोकांच्या प्रश्नाबाबतचा अभ्यास काय ? याबाबत त्यांना कोण प्रश्न विचारणार ? हे प्रश्न मतदार राजाला तरी पडणार का ? पाटोद्याच्या लोकांनी जे केले ते भारतभर व्हायला हवे. नेत्यांच्या पोरांनी जरूर आमदार व्हावे, खासदार व्हावे पण आपली पात्रता व लायकी सिध्द केल्यानंतर. वारसाहक्काने उमेदवा-या करायला देश म्हणजे त्यांच्या बापाची वतनदारी किंवा जहागिरी नव्हे.