देश बलशाली होईल!

28

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले दोन राष्ट्रीय सण आहेत. हे दोन्ही सण संपूर्ण भारतात मोठया उत्साहात साजरे केले जातात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या दिवशी तिरंग्यांला मानवंदना देऊन देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतात ; पण दुर्दैवाने अनेक लोकांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यातील फरक सांगता येत नाही. भारताला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. देश स्वातंत्र्य झाला तेंव्हा आपल्या देशाला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यांवर ( कलमावर ) आधारित होते. स्वतंत्र देशाला स्वतःचे संविधान असावे, त्या संविधानात देशाचा कारभार कसा चालवायचा या संबंधी नियम आणि कायदे असावेत तसेच नागरिकांचे हक्क आणि कर्तव्यांचाही त्या संविधानात समावेश असावा असे सर्वांचे मत होते.

हे संविधान तयार करण्याचे शिवधनुष्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वानाने पेलावे असे आव्हान करण्यात आले तेंव्हा ते संविधान तयार करण्याचे आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करुन तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील या समितीने दोन वर्ष, अकरा महिने, अठरा दिवसात संविधानाचा मसुदा तयार केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी हा मसुदा मान्य केला. संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रति तयार करण्यात आल्या.

इंग्रजी व हिंदी भाषेत या प्रति होत्या. दोन दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९५० पासून या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. संविधानेने आपल्याला मूलभूत हक्कांसोबत मूलभूत कर्तव्ये देखील दिली आहेत. हक्क आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जितके हक्कांबाबत जागरूक असतो तितके आपण आपल्या कर्तव्याबाबत जागरूक नसतो. जर प्रत्येक नागरिकाने आपल्या संवैधानिक हक्कांसोबत संवैधानिक कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे बजावली तरच भारत बलशाली होईल.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५