बालभारती : जीवन कौशल्यांचा व्यापक दृष्टिकोन

  39

  [म.रा.पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ : स्थापना दिन – २७ जानेवारी]

  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत दि.२७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था आहे. बालभारती या नावाने ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे, विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध करून देणे तथा योग्य प्रकारे मुद्रण व वितरणाची व्यवस्था करणे आदी कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते. पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत.

  निरीक्षण, निवेदन, वर्गीकरण, तुलना, सहसंबंध, कार्यकारणभाव, उपयोजन, प्रयोग कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अनुमान काढणे इत्यादी क्षमता आत्मसात कराव्यात तसेच विज्ञानाच्या अभ्यासातून आवश्यक ते जीवनकौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असा व्यापक दृष्टिकोन या पुस्तक निर्मितीमागचा आहे. दरवर्षी सुमारे १९ कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारतीमार्फत केले जाते. महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक शाळांमधून हीच पुस्तके वापरली जातात.
  पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशनांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकांचा दर्जा, किंमतीमधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार याबाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किंमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी म्हणून राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी, अशी शिफारस करण्यात आली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार दि.२७ जानेवारी १९६७ ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना झाली. याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते दि.२ फेब्रुवारी १९६७ला झाले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी तर पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक बापूराव नाईक होते. मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक सन १९६८मध्ये प्रकाशित झाले. सन २०१३पासून बालभारतीच्या सहाव्या मालेचे प्रकाशन सुरु आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

  बालभारती ही राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्या विभागात चालते. विद्या विभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण १४ विभाग आहेत. पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. पाठ्यपुस्तकांखेरीज इतर अनेक पुस्तकांचे प्रकाशन बालभारती करते. ही पुस्तके अध्ययन-अध्यापनाला पूरक असतात.

  मंडळाने दि.१४ नोव्हेंबर १९७१पासून ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ हे मासिक सुरू केले. त्यातील उत्तम साहित्याचे १४ खंड प्रकाशित झाले आहेत.
  !! अशा या बहुगुणी संस्थेचे पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्थापना दिनानिमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन !!

  ✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
  (मराठी साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.
  फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
  email : krishnadas.nirankari@gmail.comया