प्रजासत्ताक दिन समारंभ उत्साहात सर्व मिळुन वाढवू तिरंग्याची शान पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

27

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.26जानेवारी):-प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजे प्रजेचे राज्य. आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुलतत्त्वांचा अंगिकार करु. आपल्या राष्ट्राप्रति असलेल्या कर्तव्याचे भान राखू आणि सगळ्यांनी मिळुन आपल्या तिरंग्याची शान जगात वाढवू, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज अकोला जिल्हावासीयांना केले.

प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचा अकोला जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभ येथील शास्त्री स्टेडियम मध्ये पार पडला. या सोहळ्यास आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव तसेच सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक त्यांचे कुटुंबिय, शहीदांचे कुटुंबिय तसेच नागरिक, विद्यार्थी पत्रकार उपस्थित होते.प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर सामुहिक राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सलामी पथकाचे उघड्या जीप मधून निरीक्षण केले. त्यानंतर झालेल्या शानदान संचलनाने उपस्थितांची दाद मिळविली.

उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री ना. कडू म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शासनाच्या विविध योजना व मदतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा निधी पोहोचला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात आपली आरोग्य यंत्रणा अत्यंत जबाबदारीने आणि अहोरात्र लढत आहे, अशा शब्दात ना. कडू यांनी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, शासकीय यंत्रणेचे कौतुक केले.उर्जा विभागाने जाहीर केलेल्या कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले की, याद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांच्या वीजबिल सवलती चा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी पालकमंत्री डिजीटल राहुटी या उपक्रमाचा आपण प्रारंभ करीत आहोत असे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यात रोजगाराला चालना देण्यात येत आहे, समाजातील सर्व स्तरातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न होत आहेत,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ना. कडू यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला)- कु. गौरी यशवंत जयसिंगपुरे (बॉक्सिंग), गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष)- रोहन संजय पटेकर (बॉक्सिंग), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार- शाकीर अली खान पठाण गुलाम नबी खान पठाण (बॉक्सिंग) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या समारंभातील पोलीस दलाच्या संचलनाचे परेड कमांडर सचिन कदम यांनी नेतृत्व केले. तर सेकंड कमांडर एस.एस. गुलसुंदरे हे होते. तर आशीस लव्हंगळे, सुरेंद्र राऊत, सागर फेरण, जावेद तडवी, प्रेम दामोदर, श्रीमती मनिषा तायडे हे प्लाटुन कमांडर होते. प्रकाश नावकार हे बॅन्ड मेजर होते त्यांच्या वाद्यवृंद पथकाने शानदार वाद्यसंगित सादर केले.

मुख्य समारंभानंतर ना. कडू यांनी सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय, शहीदांचे कुटुंबीय यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पोलीस दलात दाखल २९ मोटार सायकलींचे वितरणही ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले.