स्थैर्य वृद्धीचा पुण्यशील संदेश !

29

प्रभू परमात्म्याने विविध अवतार धारण करून मानवाला स्थैर्य समजावण्याचा प्रयत्न केला. तो मंदिर, मस्जिद, अग्यारी, गुरुद्वारा आदी ठिकाणी विसावला स्थिर झाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल परब्रह्म तर कंबरेवर हात ठेऊन हेच शिकवत आहे, अठ्ठावीस युगे पार झालीत. जसे –

“युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
तुळशीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कांसे पीतांबर कस्तुरी ललाटी ।।”
(संतश्रेष्ठ नामदेवजी महाराजकृत : पांडुरंगाची आरती)

तो विविध आपदांचे, महामारीचे, विषाणूंचे पत्रप्रयोग करून माणसाला सावध वागण्याचे इशारे देत आहे. सन २०२०च्या कोरोना विषाणूने तर खरोखरच जीवनात स्थिरता पाळण्यास बाध्य केले.संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगभरात सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश देत आहे. एका बाजुला प्रभु परमात्मा स्थिर आहे, अचल आहे. तर दुसऱ्या बाजुला विश्वातील इतर सर्व गोष्टी गतिमान, अस्थिर व परिवर्तनशील आहेत. त्यामुळे स्थिर परमात्म्याशी नाते जोडूनच स्थिरता प्राप्त केली जाऊ शकते. वर्तमान काळातील आधुनिक चुळबूळींमुळे हे विश्व गतिमान होत आहे अर्थात अस्थिर होत चालले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मानवी मनाला ईश्वरभक्तीने स्थिर करण्याची नितांत गरज आहे. आध्यात्मिक सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते. म्हणून सत्संगाला फार महत्व प्राप्त झाले आहे. ज्यावेळी आपले मन अस्थिर झालेले असेल किंवा मनात काहीतरी चलबिचल होत असेल, अशावेळी संतदर्शन, संताची भेट घ्यावी, संत संगतीत रमावे, सद्गुरुंच्या पावन सान्निध्यात त्यांच्या वचनांचा व आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात आनंदाने भाग घ्यावा. त्यामुळे मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर आपणास आपल्या ज्वलंत समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल.

“सूरज चन्न सितारे सारे निस दिन आउंदे जांदे ने ।
अगनी धरती पाणी वी पये हरदम चक्कर खांदे ने ।
वायु जीव अकाश कोई वी अमर अचल अडोल नहीं ।
निरंकार अबिनाशी दे तुल इन्हां चों कोई तोल नहीं ।”
(सम्पूर्ण अवतार बाणी : पद क्र.७९.)

परमपित्याची दृश्यमान महामाया अर्थात पंचमहाभुते – पाच तत्त्वानेच मानवाचे शरीर बनले आहे. ही तत्वे म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू ही होत. संपूर्ण ब्रह्मांडात अनेक ग्रह आहेत, परंतु फक्त पृथ्वीवरच जीवन आहे. पृथ्वीवरच पंचमहाभूतांचे संतुलन आहे, असे विज्ञान सांगते. शास्त्रांनुसार आकाशतत्त्वाने उत्तम विचार करण्याची क्षमता येते. पृथ्वीतत्वाने घराचे स्थैर्य, कामाचे स्थैर्य नेहमीसाठी चांगले राहते. जलतत्त्वाने मनःशांती टिकून राहते. अग्नितत्वाने राग-लोभ उत्पन्न होतात. तर वायुतत्वाने भ्रमण करण्याची सवय व चंचलता वाढते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या तत्त्वांचे महत्व जीवनात अनमोल आहे. परंतु या सर्व उठाठेवींना कुठेतरी मर्यादा पडणे व स्थैर्य मिळणे क्रमप्राप्तच ठरते.

सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांनी जीवनात स्थिरता धारण करण्याविषयी समजावत आहेत. ज्या वृक्षाची मुळे मजबूत असतात, तो नेहमी स्थिर राहतो. सोसाट्याचा वारा येवो किंवा वादळ येवो; जर त्या वृक्षाने आपल्या मुळांना घट्ट पकडलेले असेल तर तो स्थिर राहतो. अशाच प्रकारे ज्या मनुष्याने ब्रह्मज्ञान प्राप्त करुन आपले नाते या मूळ निराकार – निरंकार प्रभुशी दृढ करतो. त्याच्या जीवनात कशीही परिस्थिती आली तरी तो निराकार प्रभुचा आधार घेऊन स्थिरता प्राप्त करतो व स्वतःही स्थैर्यच होऊन जातो. या स्थिर स्थितीची व्याख्या अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे. स्थिर याचा अर्थ स्थितिशील नव्हे. ब्रह्मांड वा विश्व एकंदरीत स्थिर असले तरी विश्वातील घटकांत सदैव परिवर्तन होत असते. तारे वयानुसार बदलतात, तारका-विश्वांत परिवर्तन होते. पृथ्वीवरील नदी, पर्वत, पठार, रान, दरीखोरी, गाव, नगर-महानगर आदीत सातत्याने बदल घडते. फक्त सरासरी घेतल्यास विश्वाचे मोठ्या प्रमाणावरचे चित्र अपरिवर्तनीय असते. उदा.एखाद्या शांत व संथ वाहणार्‍या नदीचे चित्र आज, उद्या, परवा तसेच दिसेल. परंतु त्याचा अर्थ पाण्याचा प्रवाह थांबला असा होत नाही. मात्र खळखळणारे ओहोळ, नदी व नाले एका विशाल सागरास जाऊन मिळतात, मिसळतात व एकजीव होतात.ते सर्व स्थिरतेला प्राप्त झाले. जो संथ होतो, उफाळतो, लाटा उठवतो अथवा आटतो तो केवळ सागर असतो. ते नदी वा नाले नसतातच! तसेच या स्थिरतारुपी परमेश्वराचे – निराकाराचे आहे. भ.श्रीकृष्ण समजावतात –

“यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिस्थितो न दुःखेन गुरुणाऽपि विचाल्यते ।।”
[पवित्र भगवद्गीता : अध्याय ६वा : ध्यानयोग : श्लोक क्र.२२.]

जीवनातील प्रत्येक पैलुमध्ये स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आहे, शाश्वत आहे आणि एकरस आहे. जेव्हा आपण आपले नाते याच्याशी जोडून ठेवू तेव्हा मनामध्येही स्थैर्य येईल व आपली विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागेल. ज्यायोगे जीवनातील चढ-उतारांचा सामना आपण सहजपणे करु शकतो. ही बाब अधिक स्पष्ट करताना सांगता येते – ऋतुमानाप्रमाणे झाडाला फळ येण्यापूर्वी फूल लागते. नंतर फळे लागून परिपक्व झाल्यानंतर ती तोडण्याचीही वेळ येते. त्यानंतर मोसम बदलतो आणि पानगळ सुरु होते. पाने गळून पडल्याने हिरवेगार असलेले ते झाड व त्याच्या फांद्या सुकल्यासारखे दिसू लागतात. ऋतु बदलल्यामुळे झाडाच्या बाबतीत ही अस्थिरतेची स्थिती आली; परंतु तरीही ते झाड आपल्या जागी घट्ट उभे असते. कारण ते आपल्या मूळांशी भक्कमपणे जोडलेले असते. अशाच प्रकारे आमची मुळे, आमचा आधार, आमचा पाया या परमात्म्याशी जोडलेला असावा. त्याच्याशी एकरुप झालेला असावा. तेव्हाच कुठे परिस्थितीच्या प्रभावामुळे मनात येणारे विचार आम्हाला विचलीत करू शकणार नाहीत. निरंकारी बाबा संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराजांनी पोटतिडकीने सांगितले –

“सन्तों का है काम जगाना सन्तों ने जगाया है ।
ग़ाफ़िल बंदे को ग़फ़लत की नींद से उठाया है ।
माया के स्वामी से जुड़ जा माया से तू जाग रे ।
कहे ‘हरदेव’ यही है मौका प्रभु भक्ति में लाग रे ।।”
[सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र.२७१.]

संत निरंकारी मिशन समाज सेवेच्या कार्यामध्ये सदोदित अग्रणी राहिले आहे तथा त्याबद्दल प्रशंसेलाही पात्र बनलेले आहे. मिशनचे सर्व सामाजिक उपक्रम नियमितपणे संत निरंकारी चॅरिटेबल फौण्डेशनच्या माध्यमातून जनकल्याणार्थ राबविले जात आहेत. त्यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान आदी. यांव्यतिरिक्त भूकंप, महापूर, त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीने पीडितांच्या मदतीसाठी मिशनकडून भरपूर योगदान दिले जात आहे. तशीच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल विश्वातील मानवमात्रांस ही स्थिरता वृद्धिंगत करण्याचा पुण्यशील संदेश देत आहे.
!! प्रेमाने बोलुयाजी, धन निरंकारजी !!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
[मराठी साहित्यिक तथा संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक]मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).
इमेल – krishnadas.nirankari@gmail.com