रोखेना पुरुषी लेप : कल्पनांची गरुडझेप

    41

    (कल्पना चावला स्मृती दिन)

    काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणी सदैव जिवंतच ठेवतात. भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना ‘गरुडझेप’ मिळवून देणारी ती नायिका समस्तांच्या हृदयावर राज्य करीत आहे. जी पहिली भारतीय अंतरिक्ष वीरांगणा ठरली. अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रातसुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच सक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात, हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी ती अंतराळयात्री आहे. ती प्रत्येक भारतीयांच्या मनांमनातील अवकाशीय परी म्हणजेच कल्पना चावला होय. तिला आज दि.१ फेब्रुवारी रोजी स्मृतिदिनी अभिमानाने सॅल्युट..! त्यानिमित्त तिच्या कौतुकास्पद कार्यकर्तृत्वाचा घेतलेला त्रोटकशा शब्दांत आढावा…

    कल्‍पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. त्यांचा जन्म हरियाणातील कर्नालमध्ये १७ मार्च १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला तर आईचे नाव संयोगीता असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पनाजींना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे वा घरकामांपेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खुप आवडत असे. त्या भावाबरोबर खुप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात छोट्या कल्पनाजी पटाईत होत्या.

    त्यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. हुशार असल्याने त्या नेहमी पहिल्या पाचमध्ये येत. शिक्षकांच्याही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या. भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा त्यांनाही तेथे जावे असे वाटत होते. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी ती स्त्री आहे. ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही, असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पनाजींना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्यांनी कॉलोरॅडो विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून सन १९८८मध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली.
    शैक्षणिक काळात कल्पना चावला यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली.

    जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून त्यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. बालपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व इ.स.१९८४ साली त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवडही वाढू लागली.डिसेंबर १९९४ मध्ये त्यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर पथकात निवड झाली. मिशन विशेष तज्ज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम सुरू केले. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे. दि.१९ नोव्हेंबर १९९७ या दिवशी हरियाणाच्या मुलीने अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे अंतराळात घालवली. नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावलांकडे ७ सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे त्यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.

    दि.१ फेब्रुवारी २००३ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडे येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडे झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला, तेव्हा सर्व योग्यरीत्या सुरू होते. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळचे ८.४० वा.कोलंबिया यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर व नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेच आनंदी होते. पुढच्या २२ मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होते. पण सुमारे ८.५४ वाजता यानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटायला सुरुवात झाली. ठिक ९.१६ वा.काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि अरेरे.. कोलंबिया यान इतिहासात जमा झाले. तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला व त्यातच कल्पना चावलांसह सगळ्या अंतराळवीरांचे निधन झाले.

    अशा त्यांच्या धाडशी शौर्याची गाथा ऐकून कोणीही सहजच उच्चारील “अबला नव्हे, ती तर सबला – कल्पना चावला!”
    !! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या अचाट कर्तबगारीला विनम्र अभिवादन !!

    ✒️संकलन व शब्दांकन – श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.[विश्वबंधुत्व मिशनचे सदस्य व मराठी साहित्यिक]
    मु. एकताचौक, रामनगर, गडचिरोली,
    पो. ता. जि. गडचिरोली (मो. ९४२३७१४८८३).
    email – krishnadas.nirankari@gmail.com