सामायिक प्रवेश प्रकियेनंतर रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ द्या – यश दत्तात्रय

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.5फेब्रुवारी):-राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या वर्षी सामायिक प्रवेश प्रक्रियेच्या फक्त दोन फेऱ्या राबविण्यात आल्या. २०२० वर्षात राज्यात असलेल्या कोरोना च्या प्रादुर्भावाचा प्रतिकूल परिणाम अभियांत्रिकी च्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेवरही झाला. प्रवासाची अडचण, प्रक्रियेच्या तारखांची नेमकी माहिती उपलब्ध नसणे अश्या अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी या दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित राहिले. त्यामध्ये अनेकांनी व्यवस्थापन कोट्याच्या आधार भेट प्रवेश घेतला. परंतु ते विद्यार्थी शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे त्यांना देखील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना या वर्षी प्रवेशाच्या फक्त दोनच फेऱ्या असणार याचीही माहिती नव्हती. त्यामुळे एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळूनही दूरचे अंतर असणे इत्यादी कारणांमुळे ते प्रवेश घेऊ शकले नाही व पुढील फेऱ्यांमध्ये संधी मिळेल या आशेवर राहिले. राज्य शासनाने मार्च २०२० मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार सत्र २०२०-२१ मध्ये जे विद्यार्थी सामायिक प्रवेश प्रक्रियेच्या व्यतिरिक्त किंवा नंतर (against CAP) प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती मिळणार नाही. असे जाहीर केले. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

विदर्भातील चंद्रपूर सारख्या ग्रामीण व आदिवासी बहुल जिल्ह्यात मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या भागातील मागास प्रवर्गाचे अनेक विद्यार्थी दुसऱ्या फेरीनंतर देखील प्रवेशापासून वंचित आहेत. हीच अडचण गडचिरोली, धुळे, नंदुरबार अश्या इतरही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची असू शकते. विशेष म्हणजे दोन फेऱ्यांनंतर हे विद्यार्थी जसे प्रवेशापासून दूर राहिले व इच्छुक आहेत तसेच अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागाही रिक्त आहेतच. कोरोना मुळे सर्व पातळीवर निर्माण झालेल्या अडचणी बघता हे विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती न घेता अभियांत्रिकी शिक्षण घेणे केवळ अशक्य आहे. कोरोना मुळे शासकीय कामकाजात आलेल्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना CVC/NCL/EWS असे प्रमाणपत्र देखील वेळेत मिळू शकले नाही.

विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करून शासनाने या वर्षी सामायिक प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर महाविद्यालयात थेट प्रवेश घेतल्यास सर्व मागास जाती प्रवर्गाच्या व इ. मा. व. तसेच आर्थिक दृष्ट्या मागास उन्नत गटातील (EWS) विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे. आज यश दत्तात्रय, कृष्णा रेड्डी, रक्षीत अन्नालकर, प्रणय साठे, शंतनू सातपुते, गोविंदा अमृतकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले