म्यानमारमध्ये लष्कराचे बंड

30

भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. म्यानमारमध्ये सत्तेवर असलेले लोकनियुक्त सरकार हटवून लष्कराने सत्ता हस्तगत करुन एक वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. इतकेच नाही तर तेथे सत्तेवर असलेल्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की तसेच राष्ट्रपती विन मिंट यांच्यासह सत्तारुढ पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. लष्कराच्या या बंडामुळे तेथील जनता संतप्त झाली आहे. लष्कराचे हे बंड तेथील जनतेला मान्य नाही. आपल्या या बंडाविरुद्ध जनता रस्त्यावर उतरेल म्हणून लष्कराने रस्त्यारसत्यावर सैन्य तैनात केले आहे तसेच फोन लाईन बंद केल्या आहेत. म्यानमारमध्ये पूर्वीपासून लष्करशाही होती पण मागील काही वर्षात तेथील जनतेने लोकशाहीचा आग्रह धरल्याने तेथे लोकशाही अस्तित्वात आली.

म्यानमारमध्ये मागील वर्षी निवडणुका झाल्या त्यात आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लीग फॉर डेमोक्रोसी या पक्षाला बहुमत मिळाले. या पक्षाच्या नेत्या आंग सान स्यू की या पंतप्रधान बनल्या पण सत्ता स्थापन करण्याआधीच लष्कराने बंड करून सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांना अटक केली. या आधी २०१५ साली जेंव्हा आंग सान स्यू की पंतप्रधान बनल्या तेंव्हापासून तेथील लष्कर सत्ता उलटवण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांना यश मिळत नव्हते यावेळी मात्र त्यांचे बंड यशस्वी झाले. म्यानमार या देशात पूर्वीपासूनच लष्कराचे राज्य आहे. तेथील लष्कराने लोकशाहीला कायम विरोध केला आहे. तेथे लष्करालाही खूप अधिकार आहेत. तेथल्या संसदेतही लष्कराला २५ टक्के जागा राखीव आहेत. तसेच सरकारच्या तीन महत्वाच्या विभागावर देखील लष्कराचेच नियंत्रण आहे. याबाबीचाच लष्कराने फायदा घेतला आहे.

लष्कराच्या या बंडाला चीनची फूस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्यानमारमध्ये लोकशाहीवादी सरकार आल्यापासून चीन म्यानमारमध्ये छुप्या कारवाया करीत होता कदाचित त्यामुळेच इतकी मोठी उलथापालथ होऊनही चीनने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पण म्यानमारमधील या घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारताने या घटनेवर खेद व्यक्त करून म्यानमारमध्ये लोकशाही प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाने लष्कराच्या बंडाचा निषेध करुन अटक केलेल्या नेत्यांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी केली. अमेरिकेने तर थेट धमकी देत म्हटले आहे की लष्कराने आपले बंड मागे न घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. जगातील बहुतांश देशांनी लष्कराच्या बंडाचा निषेध केला आहे पण चीनमात्र मूग गिळून गप्प बसला आहे यावरून या बंडामागे चीनचाच हात असल्याच्या संशयाला पुष्टी मिळते.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५