कोरेगांव, फलटण, माण, खटाव व कराड तालुक्यातील ग्रामपचायतींच्या सरपंच – उपसरपंच पदाच्या निवडी स्थगित : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश

    43

    ✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

    सातारा(दि.7फेब्रुवारी):-सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील कठापूर, फलटण तालुक्यातील जावली, माण तालुक्यातील पिंगळी (बु.), खटाव तालुक्यातील सातेवाडी व कराड तालुक्यातील पोतले या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल झालेल्या आहेत.

    सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (159 चा मुंबई अधिनियम क्र. 3) मधील कलम 30 (5) व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आले असल्याने मा. उच्च न्यायालयाच्या दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशानुसार कोरेगांव, फलटण, माण, खटाव व कराड या तालुक्यातील दि. 8 ते 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी दि. 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत रोखून ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

    मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतीच्या याचिका कर्त्यांची व हितसंबंधितांची याचिका कर्त्यांच्या अर्जावरील सुनावणी मंगळवार दि. 9 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या न्यायालयात मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे घेण्यात येणार आहे. वरील तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित 6 तालुक्यांमध्ये (सातारा, जावली, वाई, महाबळेश्वर, खंडाळा व पाटण ) ग्रामपंचायतींच्या दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत होणाऱ्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी यापूर्वी देण्यात आलेल्या नमूद आदेशानुसार पार पाडण्यात याव्यात असे आदेशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.