पुणे सोलापूर रोडवर कोयत्याच्या धाकाने ट्रक लुटला

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.15फेब्रुवारी):- ट्रकच्या समोरील बाजूची काच दगड मारून फोडून तीन मोटरसायकलवरून आलेल्या नऊ जणांपैकी दोघेजण ट्रकमध्ये चढले. त्यांनी ट्रकमालकाच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील 1 लाख 19 हजार रूपयांची रक्कम जबरदस्तीने घेऊन गेले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ घडली.
या प्रकरणी माढा तालुक्‍यातील अंजनगांव (खेलोबा) येथील दोघे व सात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. ट्रकमालक रविंद्र दत्तू परबत (वय 48, रा. चाळीस फुटी रोड, इंदापूर) यांनी सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी (रा. अंजनगांव खेलोबा, ता. माढा) व सात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ट्रकमालक रविंद्र परबत व ट्रकचालक हैदर अमिन पठाण हे दोघे गुरूवार (ता. 11) रोजी ट्रक (एम. एच. 12/ क्‍यू. जी. 7174) घेऊन तेलंगणा राज्यातील तांडूर येथे सिमेंट आणण्यासाठी गेले होते. तांडूर येथे ट्रकचे टायर स्वस्त मिळत असल्याने जाताना इंदापूर येथील युनियन बॅंकेतून एक लाख व स्वतःकडील दहा हजार असे एकूण एक लाख दहा हजार रुपये घेऊन गेले होते. त्यापैकी दोन हजार रूपये खर्च झाले.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता तांडूर येथून सिमेंट भरून गाडी भाड्याचे बारा हजार रुपये ऍडव्हॉन्स घेऊन परत निघाले. कर्नाटक राज्यातील सेडम येथे टायरची चौकशी केली असता जास्त किंमत सांगितल्याने टायर घेतले नाहीत. नंतर शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोडनिंब येथील उड्डाण पुलानजीक ट्रक आली असता तीन मोटरसायकलवरून नऊजण आले. ते ट्रक थांबव थांबव असे म्हणत होते. पण ट्रक न थांबविता पुढे घेऊन गेले. नंतर त्यांनी मोटारसायकलवरून पुढे येऊन काचेवर दगड मारला. त्यामुळे काच फुटल्यावर ट्रक बाजूला घेऊन थांबविला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोपट काशिद हे करीत आहेत.

मोडनिंबच्या दिशेने चोरटे रवाना तोंडाला रूमाल बांधलेले दोघेजण क्‍लिनरच्या बाजूने ट्रकमध्ये चढले. त्यांनी ट्रकमालकाच्या गळ्याला कोयता लावला व जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील एक लाख 19 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दोघेजण ट्रकमधून खाली उतरले. त्यांनी तोंडाला बांधलेला रूमाल काढला, तेव्हा सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी या दोघांना ट्रकमालकाने ओळखले. इतर सात जणांनी तोंडाला रूमाल बांधून ट्रकच्या खाली थांबले होते. नंतर ते सर्वजण मोडनिंबच्या दिशेने निघून गेल्याचे रविंद्र परबत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.