दिव्यांगाना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री संजय बनसोडे

31

✒️विशेष प्रतिनिधी(संजीवकुमार गायकवाड)

उदगीर(दि.15फेब्रुवारी):-समाजातील दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक दिव्यांग व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्य, रोजगार हमी योजना व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालय अंतर्गत केंद्र शासन व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर व पंचायत समिती उदगीरच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारीता शिबीरअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सहायक उपकरणांचे निःशुल्क वितरण कार्यक्रमाचे आयोजन येथील भागीरथी मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

याप्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, सभापती शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, कृषी सभापती गोविंद चिलकुरे,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड,बापूराव राठोड, जि.प.सदस्या उषा रोडगे, आदींसह पं.स.सदस्य माधव कांबळे,मनोज चिखले प्रा.श्याम डावळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.बनसोडे म्हणाले की,राज्य शासन विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासन, अलमिको यांच्या सहकार्यातून दिव्यांगांना विविध उपकरणांचे वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत व राज्यशासन पूर्णपणे दिव्यांगाच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
तसेच लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम होत असून राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला पुढाकार राहणार असल्याचे सांगत उदगीरची पंचायत समिती मॉडेल पंचायत समिती बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे राज्यमंत्री बनसोडे यांनी आवाहन केले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की,दिव्यांगासाठी निधी आणणारी लातूर जिल्हा परिषद देशात दुसरी व राज्यात पहिली जिल्हा परिषद असून लातूर जि. प.ला केंद्र सरकारकडून दिव्यांगाकरीता साडेआठ कोटी रुपये मिळाले असल्याचे सांगितले. दिव्यांगाना योजनेची माहिती व्हावी, व योजनेचा लाभ मिळावा याकरिता जिल्हा परिषदेत दिव्यांग केंद्राची स्थापना केली असून तालुकास्तरावर देखील असे केंद्र निर्माण व्हावेत असे मत यावेळी जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी केले. यावेळी 40 लाभार्थ्यांना सहायक उपकरणे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.सुप्रिया पटवारी या दिव्यांग मुलीने मनोगत व्यक्त केले.सभापती प्रा.शिवाजी मुळे, यांचेही भाषण झाले.सूत्रसंचालन ज्ञानोबा मुंडे यांनी केले तर उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी आभार मानले.