पत्नी सरस्वतीची मदत : पहिला मूकपट निर्मित !

27

(धुंडिराज गोविंद फाळके स्मृती दिन)

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होती. यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. सन १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. सन १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली. भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली. भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीत दादासाहेब फाळकेंच्या नावाने सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.

दादासाहेब फाळके यांचा जन्म दि.३० एप्रिल १८७० रोजी नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे पूर्णनाव धुंडिराज गोविंद फाळके. दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्रींचे नाव द्वारकाबाई. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृततज्ज्ञ होते. त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पतकरले. पुष्कळ ठिकाणी जादूचे प्रयोगही करून दाखविले. ते प्रो.केल्फा अर्थात फाल्के या नावाचा उलटा क्रम, यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. उद्विग्न मनःस्थितीत असतानाच मुंबईत गिरगावमधील अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ या तंबूवजा चित्रपटगृहात दि.१५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मितिविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला.

डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ.प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.मध्यंतरीच्या काळात परदेशातून चित्रपटविषयक वाङ्‍मय मागवून त्याचा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. पुढे आपली बारा हजार रूपयांची विमा पॉलिसी गहाण टाकून ते इंग्‍लंडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्‍या फिल्मची मागणी नोंदवून ते भारतात परत आले. सर्व सामग्री हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले व यशस्वी घोडदौड सुरू केली. भांडवलासाठी पत्‍नीचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ.सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. आपल्या चित्रपटासाठी त्यांना स्त्रीकलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही त्यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर आपले चित्रपट निर्मितिगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र सहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये दि.३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला.

हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व चित्रपट दाखवीत. पौराणिक चित्रपटासाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी व वाडे तसेच नैसर्गिक परिसर नासिकला असल्याने त्यांनी मुंबईहून नासिकला स्थलांतर केले. वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत त्यांनी पूर्वीचा आपला अनुभव जमेस धरून एनॅमल बोर्ड प्रॉडक्शन सुरू केले.
यात दादासाहेबांच्या पत्नी सरस्वतीबाईंचा पहिला चित्रपट बनवण्यात मोलाचा सहभाग होता. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग, एडिटिंग करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅटबाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करून त्यांचे कपडेही धुवून देत असत. रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग करीत. त्यांनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते. सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे. दादासाहेबांचे दि.१६ फेब्रुवारी १९४४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी नासिक येथे विपन्‍नावस्थेत निधन झाले.
!! त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पुरोगामी संदेश परिवाराचा मानाचा मुजरा !!

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(मराठी-हिंदी साहित्यिक व थोरांचा इतिहास अभ्यासक)मु. पिसेवडधा, ता. आरमोरी,
जि. गडचिरोली, मो. ७७७५०४१०८६.
email – nikodekrishnakumar@gmail.com