सुवर्णमहोत्सवी शाळेत सन – २०१४-१५ बॅच चा स्नेहमेळावा

28

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.१५फेब्रुवारी):-सोमवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत वर्ग १० वी सन- २०१४ – १५ स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी शैलेश पाटील यांनी केले. स्नेहा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक – आदर्श शिक्षक जे.एस.पवार होते व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे व जेष्ठ शिक्षीका एम.के.कापडणे होते. स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व सर्व सन्माननीय शिक्षक बंधू – भगिनी यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्णमहोत्सवी शाळेतील सर्व गुरूवर्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून सन २०१४ -१५ बॅच च्या वतीने सुवर्ण महोत्सवी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.

यामध्ये कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समावेश होता.याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील यांना नुकताच ” राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला म्हणून पुष्पगुच्छ देऊन पी.डी. पाटील सरांचा सत्कार करण्यात आला.शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांसोबतच्या आठवणी सांगितल्या.

यामध्ये अर्चना माळी, राहुल खैरनार, वैशाली भोई, शैलेश पाटील, चेतन माळी, समाधान माळी, भाऊसाहेब चौधरी, अमोल माळी, किशोर पाटील, शुभम पाटील यांचा समावेश आहे.यानंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षक वर्ग दहावी चे वर्गशिक्षक पी.डी. पाटील, एस.व्ही.आढावे, व्ही.टी.माळी यांनी माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगितल्या. सात वर्षानंतर शाळेत आलेले हे माजी विद्यार्थी आज पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष – आदर्श शिक्षक जे. एस. पवार यांनी माजी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. खूप मोठे व्हा !.. शाळेचे नाव मोठे करा !… असा आशिर्वाद दिला व पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक बंधु भगिनी व कर्मचारी वृंद व माजी विद्यार्थ्यांसाठी अल्पोहाराची उत्तम व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खैरनार शैलेश पाटील यांनी केले तर आभार भुषण पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल खैरनार, किशोर पाटील, अमोल माळी, हर्षल गजरे, भुषण पाटील, व सर्व वर्ग १०वी चे सन २०१४ -१५ च्या बॅच च्या मुला-मुलींनी परिश्रम घेतले.