सेलिब्रिटीची टीवटीव, भक्तांची चिवचिव

    40

    आपल्या न्याय हक्कासाठी जवळपास तिन महिन्यापासून शेतकरी रस्त्यावर उतरून संविधानीक मार्गाने आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे मिडीया, सरकार वा स्वतः ला देशभक्त समजणाऱ्या लोकांनी दुर्लक्ष केले. मिडीयाने कव्हरेज दिले नाही म्हणून आंदोलन कमी झाले नाही. किंवा कोणत्याही सेलिब्रिटी ने आंदोलनाला समर्थन दिले नाही म्हणून शेतकऱ्यांचे खच्चीकरण झाले नाही. स्वतः च्या न्याय हक्का साठी लढणारे आणि कृषी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सर्व काही सोबत घेऊन निघालेले शेतकरी खरचं देशाची आण बाण शान आहे. कृषी कायद्याची थोडीही माहीती नसणारे लोक फक्त भक्तीपाई शेतकऱ्यांना समर्थन करत नाही. कृषी कायद्याचा फटका फक्त शेतकरी च नाही तर शेतीशी संलग्नित असणारे जे काही छोटेमोठे व्यवसाय आहेत त्यांना सुद्धां बसणार आहे.

    शेतकरी स्वतः शेतातील भाजीपाला, धान्य स्वतः खाऊ शकणार नाही असा हा कायदा आहे आणि या कायद्याचे समर्थन करणारे किती विद्वान आहेत हे यावरून दिसून येते. शेतकरी आपल्या न्याय हक्का साठी कृषी कायद्या विरोधात रस्त्यावर उतरले आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी संविधानीक मार्गाने मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने ने शेतकऱ्यांचे म्हणने तर ऐकून घेतलेच नाही उलट थंडीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांवर पाण्याचा वर्षाव करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. ज्यांना देशाबद्दल एवढा पुळका आहे. ज्यांचे मन एवढे प्रामाणिक व संवेदनशील आहे तर शेतकऱ्यांवर थंडी च्या दिवसात पाण्याची फवारणी केली तेव्हा एकाही सेलिब्रिटी ने एकही शब्द बोलला नाही. कृषी कायदा काय आहे, त्याचा फायदा आणि तोटा काय आहे याचा विचार नंतर करू परंतु रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर पाणी टाकण्या सारखे अमानवीय व अमानुष कृत्य झाले पण स्वतः ला सेलिब्रिटी आणि रत्न समजणारे लोक हे व्यवस्थेच्या दावणीला बांधलेले असल्याने शेतकऱ्यां बद्दल एकही शब्द बोलले नाही.

    तेव्हा त्यांची माणुसकी थोडीसी जागृत झाली नाही. तेव्हा त्यांना देश आणि देशातील शेतकरी याविषयी आपुलकी वाटली नाही. मग यांना तरही मानसन्मान द्यावाच! पाण्याचा मारा करून शेतकरी थांबायला तयार नसल्याने आंदोलन हाणून पाडण्यासाठी सरकारने रोड खोदून त्यांना अडचण निर्माण केली. रोड खोदल्याने शेतकरी आंदोलनाला काहीच फरक पडला नाही. परंतू करोडो रूपये खर्चून बांधलेले रोड सरकारने खोदून ठेवले. रोड तयार करायला लागलेला पैसा, खोदण्यासाठी लागलेला पैसा, आणि पुन्हा बांधण्यासाठी लागणारा पैसा, हा पैसा येतो तरी कुठुन? तर जे शेतकरी रस्त्यावर उतरलेच त्यांच्या च घामाच्या पैशाने रोड बांधले जातात. ज्यांच्या पैशाचा वापर करून तुम्ही विकासाचे स्वप्न बघता त्यांच्या च विरोधात कायदे करतात. म्हणजे प्रस्थापित सरकार किती विद्वान असेल! शेतकऱ्यांना अडवण्यासाठी राष्ट्रीय संपतीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली पैसा वेळ खर्च झाला तेव्हाही कोणत्याच सेलिब्रिटी वा रत्नांनी साधी टिव टाव पण केली नाही.

    राष्ट्रीय संपत्तीची हाणी सरकार कडून होत असताना आणि शेतकरी आंदोलन दाबताना कोणी कहीच बोलु नये, कोणाचीही देशभक्ती उफाळून आली नाही याचाच अर्थ येथे गुलामांची फौज आहे. राष्ट्रीय संपतीची हानी होताना मिडीयाला दिसले नाही, सेलिब्रिटी यांना दिसले नाही म्हणून ते गप्प बसले. तरीही ते देशभक्त आहेत. रस्ते खोदून झाल्यावर शेतकरी आंदोलन आटोक्यात येत नाही याची जाणीव झाल्यावर त्यांनी रस्त्यावर खिळे सळया रोवल्या शेतकऱ्यांच्या ट्रँक्टरसाठी डिजेल बंद केले तरीही शेतकरी थांबले नाहीत. प्रजासत्ताक दिनांच्या दिवशी शेतकरी आपल्या मागण्यासाठी संविधानीक पद्धतीने लाल किल्याकडे गेले तर त्यांना अतिरेकी घोषित करून मिडीयाने आपल्या गुलामीची आणि लाचारीची पावती दिली. तोपर्यंत देशातील सेलिब्रिटी आणि रत्न मुग गिळून गप्प होते. ज्यांचे रक्त आटून घाम गाळून अन्नधान्य पिकवून देशाला जगवले जाते त्यांना अतिरेकी बोलले तरी सेलिब्रिटी गाढ झोपेत होते.

    मिडीया ओरडून ओरडून सांगत होता लाल किल्लयावर अतिरेकी घुसले त्यावर प्रत्युत्तर सरकारने सुद्धा दिले नाही की जे लोक लाल किल्यावर आले होते ते अतिरेकी नसुन शेतकरी होते असे कोणीच बोलले नाही म्हणजे न्याय मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळालं शेतकऱ्यांना मध्ये ज्यांना अतिरेकी दिसले ते अन्नच खातात का हा प्रश्न समोर आला. तिन महीन्यापासुन हे सलग सुरू असताना एकाही भक्ताला करोडो शेतकऱ्यांमध्ये दु:ख, आपुलकी दिसली नाही. सेलिब्रिटी आणि रत्नांना शेतकऱ्यांच्या हिताचे दोन शब्द लिहण्याचे धाडस झाले नाही. थोडक्यात भारतातील व्यवस्था करोडो शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे होऊ न देण्यासाठी तत्पर होती. म्हणून त्यावर दुर्लक्ष केले.
    शेतकरी आंदोलनाची दखल जेव्हा विदेशात घेतली जाऊ लागली तेव्हा मात्र भारतातील बेगडी आणि कर बुडव्या लोकांना मिरच्या लागल्या. देशाचा कर बुडवणारा देशाचा भक्त होऊ शकतो? विदेशी लोकांनी जेव्हा दखल घेतली तेव्हा यांची टिवटिव सुरू झाली.

    बाहेरच्या देशातील लोकांनी आमच्या देशातील गोष्टी कडे लक्ष देऊ नये. आता यावर अजून काही प्रश्न तयार होतात. कर बुडव्या लोकांनी देशावर हक्क सांगणे कितपत योग्य आहे? करबुडव्या आणि सेलिब्रिटींचाच फक्त देश आहे का? शेतकऱ्यांचा देश नाही का? शेतकरी आंदोलन जागतिक पातळीवर जाऊ नाही म्हणून सर्व खटाटोप सुरू झाला. जसही सेलिब्रिटी नी टिवटिव केली तेव्हा पासून भक्तांची कामे वाढली. जसे की सेलिब्रिटी च्या बोलण्याचा चुकिचा अर्थ काढला. बाहेरच्या लोकांनी आमच्या देशात लक्ष देण्याची गरज नाही, आम्ही आमचे प्रश्न सोडवायला सक्षम आहोत अशा प्रकारे भक्त कामामध्ये व्यस्त झाले. शेतकरी, शेतकरी समस्या, शेतकऱ्यांना आणलेल्या अडचणी यावर न बोललेले भक्तही सेलिब्रिटी च्या टिवटिव वर चिवचिव करू लागले. यावरून आपण आजही किती गुलामी मध्ये जिवन जगत आहोत याची प्रचिती येते. आज सत्य असत्य न बघता, कोणताही सारासार विचार न करता,फक्त डोळे लाऊन भक्ती केली जाते आणि मेंदुचा वापर होत नसल्याने समोरचा सांगतो त्यावरच विश्वास ठेऊन स्वतः चे मत बनवले जाते.

    डॉक्टर, प्राध्यापक, वकिल हे सुद्धा तर्कशुद्ध सत्य शोधुन बोलत नाहीत वा लिहत नाहीत. तर व्यवस्था जशी आहे त्यांचे समर्थन करून चुकिच्या गोष्टीला सत्य समजून बसतात. इतिहास शिकवणारा भक्त म्हणतो कृषी कायदा चांगला आहे तेव्हा कळालं तो फक्त पैसा मिळतो म्हणून पुस्तकी ज्ञान शिकवतो. त्याच्या कडे इतिहासाकडून काही गोष्टी घेऊन आज आपण काही शिकावे एवढा पण तर्क करण्यासाठी मेंदू वापरत नाहीत तर काय करावे. खाजगीकरणामुळे देश गुलामीकडे वाटचाल करत आहे याची जाणीव जर लोकांना नसेल तर देश मातीत घालायला आपल्याला शत्रुची गरजच पडणार नाही. रोजगार, शिक्षण, नोकरी, पुर्ण नष्ट होऊन देश अधोगतीला जात आहे, प्रत्येक बजेट मध्ये सार्वजनिक मालमत्ता विकल्या जात आहे आणि भक्त टाळ्या वाजवून स्वागत करत आहेत. आज सार्वजनिक मालमत्ता आपली राहली नाही, नोकरी राहली नाही, शिक्षण राहिले नाही, स्वतः ची शेती आपल्या नावावर राहली नाही. तरी भक्त भक्तीत गुंग आहे. आणि वेळेनुसार त्याची भक्ती, गुलामी आणि लाचारी दाखवून चिवचिव मात्र करत असतो.
    *************************************

    ✒️लेखक:;विनोद पंजाबराव सदावर्ते
    रा. आरेगांव ता. मेहकर
    मोबा: ९१३०९७९३००
    *************************************