रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज!!

82

छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आहेत. महाराजांची युद्धनीती, त्यांनी बांधलेले गड किल्ले, महाराजांचे धर्मसहिष्णू धोरण, शेतकऱ्याचे राजे, आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे स्त्रीविषयक असलेला त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन.आजही
एकविसाव्या शतकामध्ये स्त्रीयांवर अन्याय अत्याचार झाला की पहिली आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची! काय कारण असावे याचे? शिवाजी महाराज म्हणजे स्त्रियांचे रक्षक होते. लहानपणापासुन मातोश्री जिजाऊ मा साहेबांनी शिवाजी महाराजांना दिलेली शिकवण महत्त्वाची होती ती म्हणजे परस्त्री मातेसमान!! शत्रुपक्षाच्या स्त्रियांचाही मान राखणारा राजा विरळाच !!कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी दिलेली वागणूक म्हणजे अत्यंत प्रशंसनीय!स्त्री मग ती शत्रू पक्षाची का असेना तिचा मान सन्मान केलाच पाहिजे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा दंडक होता. मध्ययुगीन काळात स्त्री म्हणजे भोगदासी! त्या काळातील राजेशाही व सरंजामशाही या दोन्ही पद्धतीमुळे स्त्रियांचे जीवन म्हणजे गुलामगिरीच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन व्यापक होता, मानवतावादी होता. आज आपण पाहतो की जातीय द्वेषातून महिलांवर मुलींवर होत असलेले अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. पितृसत्ताक मानसिकता सर्वांच्याच मानगुटीवर बसली आहे. अशा या काळात स्त्रियांना मानवतावादी दृष्टिकोनातून पाहणारे शिवाजीराजे व त्यांची शिवशाही व्यवस्था परत एकदा यावी अशीच माता-भगीनीच्या अपेक्षा आहे.

दिवसाढवळ्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत ते आता थांबलेच पाहिजे.गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे . यासाठी शिवाजी महाराज ज्या पद्धतीने शिक्षा करत त्याच पद्धतीच्या शिक्षा या नराधमांना झाल्या पाहिजे . आपल्या राज्यातील स्त्रिया सुरक्षित रहाव्यात. आपल्या राज्यातील स्त्रीयांच्या केसालाही धक्का लागता कामा नये.असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना आदराचे स्थान होते. रांझे गावच्या पाटलाने स्त्रीविषयक गैरवर्तन केल्यामुळे त्याचे हात पाय कलम करण्यात आले. अशा शिक्षा सध्या अमलात आणाव्यात तरच नराधमांना वचक बसेल आणि स्त्रीयांवर होणारे अत्याचार कमी होतील. शिवाजी महाराज म्हणजे स्त्रीवादी विचाराचे राजे होते. अशाच स्त्रीवादी विचारांच्या राज्यकर्त्यांची आज खरी गरज आहे. आज जर मुलींना महिलांना कशाची गरज असेल तर ती सुरक्षिततेची आहे. ही सुरक्षिततेची भावना जोपर्यंत प्रबळ होणार नाही तोपर्यंत बेटी बचावो बेटी पढावो ही घोषणा निरर्थकच!

छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी विचाराचे राजे होते. अंधश्रद्धेला त्यांनी कधी थारा दिला नाही. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री त्यांनी अनेक मोहिमांची आखणी केली. 400 पेक्षा अधिक किल्ले जिंकले आणि बांधले परंतु कोणत्याही एका किल्ल्याची वास्तुशांती त्यांनी केली नाही. जुन्या प्रथा परंपरा रूढी यांचा अर्थ समजून घेतला. जे कालबाह्य झाले त्याचा त्याग केला. आपल्या लोकांना एक सवय जडली आहे. महापुरुषांचा उदो उदो तर आपण करतो परंतु त्यांचे विचार आपण डोक्यात घेत नाही. ज्यावेळी महापुरुषांचे विचार आपण कृतीत आणू तेव्हा खरी क्रांती होईल.

सती प्रथा शिवाजी महाराजांना मान्य नव्हती. शहाजी राजे यांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाही . धर्माचे रक्षक म्हणणाऱ्यांनी रान उठवले परंतु जिजाऊ सती गेल्या नाही. मध्ययुगात स्त्रियांना गुलाम करण्याची प्रथा होती. ती प्रथा शिवाजी महाराजांनी बंद केली. स्त्रियांच्या मानवी हक्काचे शिवाजी महाराजांनी रक्षण केले. मला तर वाटते की मध्ययुगामध्ये शिवाजी महाराज एकमेव राजे असावे ज्यांनी स्त्रीयांना आदराची वागणूक दिली. त्यांच्या मानवी हक्काची दखल घेतली. शिवाजी महाराजांनी स्त्रीयांना सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी आपल्या सैनिकांना ताकीद केल्या होत्या.त्या उल्लेखनीय आहेत. स्त्रियांना मोहिमेवर आणण्याची सक्त ताकीद होती . कारण लढाईनंतर रणभूमीवर पराभूत झाल्यास त्या स्त्रियांची मोठी वाताहत होत असे ते थांबवण्यासाठी मोहिमेवर स्त्रियांना आणू नये अशी सक्त ताकीद असे . स्त्रियांची विटंबना थांबवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी अशी ताकीद केली होती. युद्धात स्त्रियांना पकडू नये असा त्यांचा आदेश होता. आपले सैनिक या आदेशाचे काटेकोर पालन करतात का याकडे त्यांचे लक्ष असे. नियमांचे उल्लंघन करणार्‍याची काही धडगत नव्हती. स्त्रीविषयक काही गुन्हा एखाद्या सैनिकांकडून झाला तर त्यासाठी गंभीर शिक्षा होत्या उदाहरणार्थ हातपाय तोडणे, डोळे काढणे अशा शिक्षा केल्या जात होत्या . त्यामुळे कोणी नियमाचे उल्लंघन करण्याचे धाडस करत नव्हते.

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडीचोळी देऊन सन्मान करणारे शिवाजी महाराज! शत्रूची स्त्री शत्रु नसते तर एक स्त्री असते म्हणून शत्रूच्या स्त्रीलाही मान सन्मान देणारे शिवाजी राजे होते. स्त्री हिंदूची असो वा मुसलमानाची ती स्त्री आहे म्हणून तिचा सन्मान केला पाहिजे. आज ज्या पद्धतीने जातीच्या द्वेषातून धर्माच्या द्वेषातून स्त्रियांवर अत्याचार होतात. आज खरं तर शिवाजी महाराजांसारखा विचार करणारे राजकर्ते असावे. ज्यांनी स्त्रियांकडे आदराच्या भावनेने बघावे. जेणेकरून आपल्या देशातील स्त्रिया सुरक्षित होतील.

महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन जेवढा उदार होता तेवढाच धर्मविषयक दृष्टीकोनही उदार होता. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जेवढे मंदिर होते तेवढ्या मशिदी पण होत्या. स्वारीच्या वेळी जर शिवाजी महाराजांना कुराण मिळाले तर तो कुराण ग्रंथ मुस्लिम सैनिकाला देऊन त्या ग्रंथाचा सन्मान केला जात होता . आज आपण पहातो की धर्माच्या नावाने लोकांमध्ये भांडण लावली जातात. शिवाजी महाराज हिंदू होते त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा होती परंतु त्यांचे धोरण मुस्लिम धर्मविरोधी नव्हते तर धर्मसहिष्णू धोरण होते. अठरापगड जातीतील मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य हे आपले आहे अशी भावना लोकांच्या मनात निर्माण केली. म्हणून स्वराज्यासाठी स्वतःचा जीव देण्यास लोक तयार होते.

शिवाजी महाराज मुस्लिम धर्म विरोधी असते तर त्यांनी एखादी मस्जिद पाडली व त्या जागेवर मंदिर बांधले अशी एखादी तरी नोंद आपल्याला पाहायला मिळते का ?अनेक मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांसाठी इमानेइतबारे काम करत होते. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दौलत खान होते.शिवाजी महाराजांचे वकील काझी हैदर होते.तोफखाना प्रमुख इब्राहिमखान होते. या उदाहरणावरून स्पष्ट होते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू स्वरूपाचे होते. आणि यावरून हेही स्पष्ट होते की शिवाजी महाराजांसाठी मुस्लिम बांधवांनी जीवाची बाजी लावली.छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी काही वतनदार, जमीनदार, सरदार नव्हते तर त्यांचे सहकारी होते सामान्य मावळे जे की, गोरगरीब शेतकरी वर्गातील होते. शिवाजीराजा साठी आपला जीव देणारे होते. जीवाला जीव देणारे मावळे शिवाजी महाराजांचे खरे सैनिक होते. शिवाजी महाराजांचे सैनिक शेतकरी वर्गातील असल्यामुळे ते स्वाऱ्यावर जातानी शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस करत नसत.

शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. अशी सक्त ताकीद सैनिकांना होती. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी खऱ्या अर्थाने बळीराजा होता . म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले छत्रपति शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. व सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवाजी महाराजांवर त्यांनी 1000 ओळींचा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी पारदर्शक स्वरूपात मांडला.आणि म्हणूनच आम्हाला महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा जो इतिहास सांगितलेला आहे तोच खरा आणि आपला वाटतो. महात्मा फुले शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात त्याची अनेक कारण आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांना धान्याच्या स्वरूपात मदत केली जात असे.शेतसार्‍यात सवलत दिली जात होती . शिवशाहीत शेतकरी आत्महत्या करत नव्हते. आज एकविसाव्या शतकामध्ये शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. दररोज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. जगाचा पोशिंदा उपाशी आहे याची राज्यकर्त्यांना काळजी नाही.

भांडवलशाही व जागतिकीकरणामुळे शेतकर्‍यांची दुरवस्था झाली आहे. आज आपण पाहतो की बळी राजा गेल्या दोन महिन्यापासून कडकडीत थंडीत आंदोलन करत आहे तरी मायबाप सरकारने या आंदोलनाची दखल घेणे तर दूरच उलट पदोपदी बळीराजाची अवहेलनाच केली आहे. यावरून असे वाटते की,भूतकाळातील बळीराजाचे शत्रू परत एकदा जोमाने एकत्र आले की काय?

शिवशाहीत शेतकऱ्याची दशा होऊ नये. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे शेतीत पिके घ्यावीत. शेतकऱ्याकडे बैलजोडी नसेल तर शेतकऱ्यांना बैलजोडी ही पुरवली जात होती .तसेच खाण्यासाठी धान्य नसेल तर तेही पुरवले जात होते . एखाद्या शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा झाला आणि शेतकरी होतकरू असेल तर त्या शेतकऱ्याचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सवलत दिली जात असे . जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात चांगला माल होई तेव्हा हप्ते घेतले जात असत. शेतकऱ्यावर जुलूम जबरदस्ती करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. कारण शिवाजीराजांचे वतनदारावर संपूर्ण लक्ष होते. तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी शेतीची प्रतवारी ठरवली जात असे . जमिनीच्या प्रतवारी वरून साऱ्याची आकारणी करत असत. रयत म्हणजे सामान्य प्रजा. रयत सुखी तर राजा सुखी! शेतकरी सुखी तर राजा सुखी हा विचार शिवशाहीत महत्त्वाचा होता. रयतेवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद केली होती. शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शेतकऱ्याचा राजा असेही त्यांना म्हटले जात असे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीचे कार्य हाती घेतले तेव्हा शिवाजी महाराजांची शिवशाही त्यांच्या डोळ्यापुढे होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विषमताधिष्ठित समाज रचना मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. गोब्राह्मणप्रतिपालक ही शिवाजी महाराजांना दिलेली ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती . हिंदु धर्मरक्षक हिंदू धर्म संस्थापक या चौकटीत शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न काही इतिहासकारांनी केला तो बाबासाहेबआंबेडकर नाकारतात. राज्याभिषेक प्रसंगी जे काही प्रसंग घडले त्या प्रसंगातून शिवाजी महाराजांनी वर्णव्यवस्थेला जबरदस्त हादरे दिले. शिवाजी महाराज हे रयतेच्या कल्याणासाठी लढत होते. त्यांची लढाई ही मानवतेच्या उत्कर्षासाठी होती. कोणत्या एका धर्मासाठी ते लढत नव्हते तर मानवी कल्याणासाठी त्यांचा लढा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मध्ययुगातील राज्यकर्त्याच्या लढाया या शत्रूशी होत तसेच ते आपअपसात लढत त्यांच्या या लढाया राजकीय संघर्षासाठी होत्या ना की धर्मासाठी!

चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचे एक एक पैलू उलगडून आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घेऊया!!

✒️लेखिका:-श्रीमती मनीषा अंतरकर (जाधव)
7822828708
Saiantarkar@gmail.com