सत्ताधारी शिवसेना आणि शिवजयंती?

59

भारत हा विविध जातीधर्माच्या लोक समूहाचा देश आहे,प्रत्येकाची जात,धर्म,भाषा वेशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समान न्याय मिळत असतो.ज्यांना भारतीय राज्य घटना “संविधान” मान्य नाही ते वेळोवेळी मनुस्मृती नुसार आचरण करून देशाच्या सार्वभौम धर्मनिरपेक्षतेलाचा आव्हान देण्यासाठी उभे राहतात.यांचे उत्तम उदाहरण म्हणजेच तिथी नुसार शिवजयंती व सत्यनारायण महापूजा आहे.आता काल पर्यत तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी शिवसेना आता लोकशाही मार्गाने सत्ताधारी झाली आहे.त्यामुळेच त्यांच्या शिवसैनिकासाठी शिवजयंती मोठे धर्मसंकट झाले आहे.कायदा सुव्यवस्था बिघडविणे समाजात तेढ निर्माण होईल असा कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे कलम १४२ ते १५२ नुसार गुन्हा आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या घटनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत आले आहे.

ती धर्मनिरपेक्ष,निःपक्षपाती निर्भीड पणे कायद्याची अंमलबजावणी करीत नाही हे यावरून सिद्ध होत असते. शिवजयंती साजरी करणारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणत्याही आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिथी नुसार जयंती साजरी करत नाही.म्हणूनच तिथी नुसार शिवजयंती म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक हे मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी साजरी केली जाते व सत्यनारायण महापूजा घातली जाते.शिवाजी महाराजाच्या नांवाचा व्यापार करून काही संघटना राज्यात सत्ताधारी झाल्या पण त्यांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर्श कधीच घेतला नाही,केवळ नांवा पुरती प्रतिमा आणि मूर्तीचा वापर केला.शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या समर्थनात आपली शक्ती खर्च केली. त्याचं पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद बुद्धिजीवी विचारवंत्यांच्या समितीने सोडविल्या वर ही आपली भूमिका त्यांनी सोडली नाही. त्यामुळे राज्यात शिवरायांचे मावळे कमी आणि कावळे जास्त झाले.म्हणून त्यानी जयंती बाबत ही समाजात गैरसमज कसे निर्माण होतील यांची जास्त काळजी त्यांनी घेतली. आता सत्ताधारी शिवसेना आणि त्यांचे शिवसैनिक शिवजयंती कशी साजरी करणार?. वैचारिक वारसा सांगणार की मनुवादी विचार हे खूप महत्वाचे ठरणार आहे.

राज्यात शाळा,कॉलेजात विद्यार्थीदसे पासूनच त्यांना अभ्यासक्रमात एक आणि बाहेरच्या जगात एक शिवाजी महाराज शिकविला जातो,त्यामुळेच जय शिवाजी,जय भवानी ह्या घोषणा डोक्यात फिट बसल्या आहेत. त्या कशासाठी दिल्या जातात ते ठळकपणे दिसते. त्यांना कोणता शिवाजी अभिप्रेत आहे हे दरवर्षी ते कायद्याला आव्हान देऊन दाखवून देतात. परंतु आता सत्ताधारी शिवसेना आणि शिवसैनिकासमोर शिवजयंती धर्म संकट आहे.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी १८६९ साली रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठया धुमधडाक्यात सुरु झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ’ होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.म्हणून ही तिथी नुसार शिवजयंती सन्मान आहे की अपमान?. हे काही मराठ्यांना ओबीसीनां आज ही कळत नाही. ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधना पासुन अजूनही सुरक्षित अंतरावर मानसिक गुलाम म्हणून उभे आहेत.

इतिहास सांगतो शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्यालाा पेशवाईचे समर्थन होते.म्हणुन ब्राह्मणांचे जेष्ठपुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात शिवजयंती बाबत संभ्रम निर्माण केला.आणि करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण होते.पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद’ कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल. ख-या शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त मावळे निर्माण होतील, हे रोखण्यासाठी ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1) वा.सी.बेंद्रे, 2) न.र.फाटक 3) ग.ह.खरे, 4) द.वा. पोतदार, 5) डॉ.आप्पासाहेब पवार, 6) ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली.वादग्रस्त बाबीं साठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग बापट आयोग.सराफ आयोग किती तरी आयोग आहेत.त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली.
इतिहास तज्ञा बुद्धिजीवी विचारवंताला या कामाला २ वर्ष लागतात, तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लावले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता कि नाही?.यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.१९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या.या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका होती. जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी 1) पुरंदरे, 2) बेडेकर, 3) मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली.शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध झाले.

1) जयंत साळगांवकर, 2) पुरंदरे, 3) बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह धरून आपला ब्राम्हणी कावा दाखविला,त्यामुळे बाळ कडू आणि बाळकडू पिलेले कावळे जोमाने कामाला लागले,शासन प्रशासनाने दिलेले निर्णय आम्ही मानत नाही हे दाखवून दिले,खरे तर लोकशाहीच्या चौकटीत यांच्या वर राष्टपुरुषाचा अवमान केला म्हणुन देशदोहाचा गुन्हा दाखल होऊ शकला असता,पण राज्यकर्ते मनुवादी हिंदुत्व मानणारे असल्यामुळे कोणीच कोणावर कारवाई केली नाही,

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला आहे. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले. अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय? तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना होती. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा ब्राम्हणी कावा आहे.

इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात. ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. मग तिथी प्रमाणे वाद कायम का राहतो ?. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.शिवाजीराजे जर,राष्ट्रपुरुष, युगपुरुष आहेत.तर तिथीत अडकविण्या इतके राजे लहान का करता?. यावर शिवसेनेने कधी ठाम वैचारिक भूमिका घेतली नाही.

शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकर यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.कारण तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. सत्यनारायण महापूजा म्हणजेच भटजीची रोजगार हमी आली व ती चालावी या करीतच हा वाद आहे, तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.त्यामुळे कावळे आणि मावळे संघर्ष अटळ आहे.सूर्याजी पिसाळ आणि लांजाचा पाटील प्रत्येक गावांत पक्षात भेटेल. तो शिवसेना भाजपाचाच असेलचं असे नाही.

शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर, बुद्ध, महात्मा फुले, शाहूू महाराज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का? कारण त्यांचा समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करत नाहीत.मग शिवरायांचे मावळे कोण?.शिवचरित्रावर विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते.यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा होता व आज ही आहे. सत्ताधारी शिवसेना आणि शिवजयंती हा आता नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

म्हणूनच बाळकडू पिलेले जेजे कावळे आहेत ते शिवजयंती निमित्ताने सत्यनारायण महापूजा ठेवतात.ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सन्मान करण्यासाठी नव्हे तर मनुस्मृती नुसार शूद्र राजाने शौर्य दाखवुन स्वराज निर्माण करून बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून दिला यांचा बदला म्हणून अवतारी पुरुष बनविले. छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा आशीर्वाद होता त्यामुळेच त्यांनी लढाया जिंकल्या असा भ्रम निर्माण केल्या जातो.त्याकरिता सत्यनारायण महापूजा घातली जाते. पण हे करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कोणत्या गड किल्ल्यावर सत्यनारायण महापूजा घातल्याचा इतिहास आहे काय?. मग तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी ही मंडळी महाराजांचा सन्मान करीत नसुन घोर अपमान करीत असते.

हा इतिहास माहिती असणारे एक मराठा लाख मराठा म्हणणारे मोठ्या संख्येने जागे होत आहेत. तर काही पक्षांच्या वैचारिक भूमिकेमुळे झोपेत असल्याचे ढोंग करीत आहेत. जय शिवाजी जय भवानी घोषणा देत मुंबईतील शिवसेना खेड्या पाड्यात पोचली आणि आता सत्ताधारी झाली. त्यामुळेच तिची खरी ओळख आता महाराष्ट्र राज्यालाच नव्हे तर संपूर्ण भारतात होईल. सत्ताधारी शिवसेना शिवजयंती कशी साजरी करणार?. आर एस एस प्रणित भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे दैवतीकरण ब्राह्मणीकरण केले होते हे मान्य आहे. की झालेली चूक दुरुस्ती करणार?.भारतीय संविधान की मनुस्मृती कोणाची अंमलबजावणी केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९ फेब्रुवारी जयंती निमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम आणि सर्व जागरूक वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई, 9920403859, अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन