लॉकडाऊन टाळायचा असेल तर प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्या – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

25
✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.21फेब्रुवारी):-जील्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन सुरु केला आहे. आता मोठा लॉकडाऊन टाळायचा असेल तर वेळीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन करतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दक्षता नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.

बेजबाबदारांवर कारवाई

जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी सध्या केवळ शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. नाईलाजाने तो वाढविण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगावी. यंत्रणेनेही कोरोना संकटकाळात दक्षतेचे पालन न करता बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर, विशेषत: गृह विलगीकरणात असूनही नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करून शिस्त निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

स्वयंशिस्त पाळा

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा अवलंब करण्यात येतो. तसा उपाय आपण यापूर्वीही केला आहे. आताही वीकेंड लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, स्वयंशिस्त पाळली तर मोठ्या कालावधीच्या लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे व वीकेंड लॉकडाऊनच्या दरम्यान घरात राहून सुरक्षितता जोपासावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

बाधितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या तपासण्या करा

यंत्रणेने बाधित क्षेत्रात तपासण्यांची संख्या वाढवावी. शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करावेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता अधिकाधिक तपासण्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक बाधितामागे संपर्कातील किमान 25 ते 30 व्यक्तींना ट्रेस करावे. उपचारासाठी आवश्यक खाटा, औषधे आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

‘होम आयसोलेशन’मधील व्यक्तींवर वॉच
गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवावा. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे अशावेळी दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणा-यांवर वेळीच दंडात्मक कारवाई करावी. लस उपलब्ध झाल्यामुळे आपण निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलो, असे वाटत असतानाच अचानक साथ वाढली आहे. ती रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री पाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जिल्ह्यात लसीकरणाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.