नाशिक ला मार्चमध्ये विद्रोही साहित्य संमेलन उदघाटनाला ग्रेटा थनबर्ग यांना आमंत्रित करण्याचा निर्णय

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.21फेब्रुवारी):-नाशिक शहरात पुढील महिन्यात दोन साहित्य संमेलने होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एक दिवस आधीच संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन २५ आणि २६ मार्च रोजी होणार आहे . संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे यांची निवड करण्यात आली असून उद्घाटनास मानवतावादी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा . प्रतिमा परदेशी , यशवंत मकरंद यांनी दिली . किशोर ढमाले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आमचा बहिष्कार असून महात्मा फुले यांना अपेक्षित असलेले आणि फुलेंनी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रावर आधारित विद्रोही साहित्य संमेलन २५ मार्चला प्रारंभ होऊन बाबुराव बागुल यांच्या स्मृतिदिनी म्हणजे २६ मार्चला समारोप होईल , असे सांगितले.

मुख्य निमंत्रक म्हणून प्रा . इंदिरा आठवले , मुख्य संयोजक राजू देसले , कार्यवाह गुलामशेख , प्रा डॉ . अशोक दुलदुले , कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक , सहनिमंत्रक नितीन रोटे आदींची निवड करण्यात आली आहे . दरम्यान , भारतीय संविधानाच्या मूल्यांना नख लावण्याचे लोकशाहीचे बिरूद मिरवणाऱ्या केंद्र सरकारकडून होत असून या वृत्तीचा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलन नाशिकला होत असल्याचे प्रा . प्रतिमा परदेशी यांनी सांगितले . संमेलनासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने संमेलन उधळण्याचा डाव मनूवाद्यांकडून रचला जात आहे . त्यामुळे या साऱ्या डावांवर कडी करत हे संमेलन यशस्वी करावे , असे आवाहन प्रा परदेशी यांनी केले जेलरोडला झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत प्रा परदेशी यांनी मार्गदर्शन केले . गट – तट मान – अपमानामुळे चळवळीचे मोठे नुकसान होते.

या सर्वांना तिलांजली देऊन एकजुटीने संमेलन यशस्वी करावे , साहित्यिकांबरोबरच , कलाकार , शाहीर आदी सर्वांना संमेलनाचे निमंत्रण द्यावे , निधीची कमतरता भासू नये यासाठी लोकवर्गणीतून संमेलन यशस्वी करू मिलते रहेंगे , मिलके रहेंगे हा आपला नवा नारा आहे , असे त्यांनी नमूद केले . यशवंत मकरंद ( परभणी ) , डॉ सुरेश शेळके ( हिंगोली ) , सुभाष काकुस्ते ( धुळे ) , ए . जे . गावित ( नंदुरबार ) , जितेंद्र महाजन प्रशांत सोनुने बुलढाणा ) , किशोर ढमाले , अर्जुन बागूल , यशवंत बागूल ( मनमाड ) , दत्ता वायचळे ( सिन्नर ) , नाशिकचे विनायक पठारे , रंगनाथ डेंगळे , संजय उन्हवणे , सतीश केदारे आदी उपस्थित होते . गणेश उन्हवणे यांनी प्रास्तविक केले . मिलिंद देहाडे यांनी बाबासाहेबांना आत्मसात करण्याची वेळ आली असून सामान्यांचा आवाज बुलंद करणारे , बाबासाहेबांच्या कर्मभूमीतील हे संमेलन दर्जेदारपणे घेऊन यशस्वी करण्याचे आवाहन केले . यशवंत मकरंद यांनी या विद्रोहाची दखल इतिहास नक्कीच घेईल , असा विश्वास व्यक्त केला . विनायक पठारे , संजय उन्हवणे आदींनीही मनोगत व्यक्त केले .