कुख्यात गुंड गजा मारणेची तळोजा तुरुंगातून सुटका होताच समर्थकांनी वाजत गाजत त्याचे केले स्वागत

32

कुख्यात गुंड गजा मारणेची तळोजा तुरुंगातून सुटका होताच त्याच्या समर्थकांनी वाजत गाजत त्याचे स्वागत केले. त्याच्या स्वागताला शेकडो आलिशान गाड्या हजर होत्या. तुरुंगाच्या आवारातच त्याच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तळोजा ते पुणे महामार्गावर वाजत गाजत त्याची सवारी चालली असताना टोलनाक्यावर टोल टॅक्सही भरण्यात आला नाही. जाताना रस्त्यात त्याच्या समर्थकांनी दहशत माजवली. यावेळी वाहतुकीचे आणि कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. हे सर्व कायद्याला धरुन नाही हे माहीत असतानाही त्याच वेळी त्याच्यावर आणि त्याच्या समर्थकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

तोंडावर मास्क नाही, डोक्यावर हेल्मेट नाही, गाडीची नंबर प्लेट नीट दिसत नाही असल्या गोष्टींवरून सर्वसामान्य नागरिकांना पिडणारे पोलीस अधिकारी गुन्हेगारांचे हे स्वागत डोळे मिटून पाहत होते. तुरुंगाच्या आवारात खाजगी वाहनांची बंदी असताना तळोजा कारागृहाच्या आवारात शेकडो अलिशान गाड्या आल्याच कशा? त्यावेळी तिथे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या गाड्या दिसल्या नाहीत का? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. गजा मारणेचे वाजत गाजत झालेले स्वागत सोशल मीडियावर व्हायरल झल्यावर तसेच मीडियाने यावर आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तोवर गजा मारणे फरार झाला.

गजा मारणे यासारख्या कुख्यात गुन्हेगारांचे असे उदात्तीकरण होत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. पोलिसांवर कामाचा दबाव आज हे मान्य केले तरी अशा कुख्यात गुन्हेगारांना वेळीच आवरायला हवे. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे म्हणजे कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवणे होय.आधीच तरुणांना गुन्हेगारांचे आकर्षण असते अशा प्रकारे जर गुन्हेगारांचे उदात्तीकरण होऊ लागले तर तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)