मी अनुभवलेला एक कर्तव्यदक्ष अधिकारी ते एक संवेदनशील माणूस

32

धरणगाव — येथील तहसिलदार नितीनकुमार देवरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी एवढंच नव्हे तर ते एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व देखील आहेत. अधिकारी पदावर कार्यरत असतांना देवरे साहेबांनी आदिवासी दुर्गम भागात केलेली कामगिरी, शेतकऱ्यांची घेतलेली दखल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत, वंचितांना न्याय मिळवून देण्याची धडपड, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, शिस्तबद्ध अधिकारी ते एक कवी मनाचा संवेदनशील माणूस इथपर्यंत मी अनुभवलेला प्रवास या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

नितीनकुमार राजाराम देवरे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी धरणगाव. मूळचे म्हसदी तालुका – जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले नितीनकुमार देवरे यांना लहानपणापासून शिकण्याची जिद्द होती. वडील राजाराम माणिक देवरे प्राथमिक शिक्षक आणि आई सिंधुबाई राजाराम देवरे माध्यमिक शिक्षिका होत्या. आई – वडील दोन्ही शिक्षक असल्यामुळे संस्कार आणि शिस्त याचा मेळ बालपणापासून साधला गेला. आजोबा धुळे येथील जयहिंदचे माजी प्राचार्य ( कै. ) आर. डी. देवरे आणि आजी ( कै. ) डॉ. उषाताई देवरे यांच्या प्रेरणेने सरांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. जयहिंद बोर्डिंग ला राहून शिक्षण घेत असतांना सातवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला. दरम्यान चुलतभाऊ अविनाश देवरे (सध्या विदेशात स्थित) यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. जयहिंद कॉलेजला बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कृषी महाविद्यालय अकोला येथे बीएसस्सी ऍग्री ला प्रवेश घेतला. बीएसस्सी च्या दुसऱ्या वर्षापासून एमपीएससीतून अधिकारी होण्याचा ध्यास घेतला.

बीएसस्सी शिक्षणक्रमात ८२.८ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठात एमएस्सी ला प्रवेश घेतला. या दरम्यान एमपीएससी चा अभ्यास व नियोजित शिक्षण दोन्ही सुरू ठेवत एमएस्सी ला सुवर्णपदक प्राप्त करून विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. २००६ मध्ये प्रथम नायब तहसिलदार ( वर्ग – २ ) म्हणून नियुक्ती, ७ नोव्हेंबर २००७ ला अमरावती विभागात नियुक्ती झाली. २०१४ मध्ये तहसिलदार पदावर पदोन्नती झाली. या सर्व गोष्टी घडत असतांना वरवर पाहता जाणवेल की एक प्रशासकीय अधिकारी यांची जडणघडण झाल्याचा हा प्रवास आहे परंतु मला विचाराल तर त्याहीपेक्षा हा एक संवेदनशील व्यक्तिमत्वाचा प्रवास आहे, असे मी मानतो. अधिकारी पदावर असतांना शासकीय नियमावली नुसार कार्य करावे लागते. या सर्व गोष्टी करत असतांना जो व्यक्ती काहीतरी वेगळं करण्याची धमक दाखवतो तो अवलिया ठरतो. धरणगावचे तहसिलदार हे एक उत्तम अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम माणूस आहेत.

आदिवासी भागात कार्य करत असतांना तेथील लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न देवरे साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे केला. आवश्यक कागदपत्रे, आदिवासी पाड्यावर जाऊन अनुदानाचे वाटप, आदिवासी विद्यार्थांची रॅली, वंचितांना शासकीय लाभ तात्काळ मिळवून दिलेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे कार्यरत असतांना ‘बळीराजा चेतना अभियान’ अंतर्गत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रबोधन केले. या विभागात हजारो शेतकऱ्यांनी ‘हरणार नाही, लढणार…’अशी शपथ घेतली. याच दरम्यान वरंदळी येथील नामदेव गजानन सहदेव यांनी आत्महत्या करू देण्याची परवानगी मागितली. नितीनकुमार देवरे यांनी संबंधित शेतकऱ्याची समज घालून त्यांना अनुदानाचा लाभ मिळवून दिला. त्यावेळी परिसरात सर्वदूर नागरिकांकडून देवरे साहेबांचे कौतुक झाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी या संवेदनशील व्यक्तिमत्वाने ‘आत्महत्या नको रे कृषीराजा आता!’ या काव्यसंग्रहाचे फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रकाशन करण्यात आले. दिग्रस तसेच अक्कलकुवा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

नर्मदा किनारी जाण्यासाठी मोठ्या बार्ज ( बोट ) व लहान बोटींची व्यवस्था करण्यात आली. काठी तालुका अक्कलकुवा येथे ४०० वर्ष जुनी परंपरा असलेली होळी गावकऱ्यांसोबत साजरी केली. या सर्व गोष्टी करत असतांना गौण खनिज व वाळूचा अवैधरित्या उपसा करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कार्यवाही करून देवरे साहेबांनी आपला दबंग अंदाज अनेक वेळा दाखवून दिलाय.ग्रामीण भागातील विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करावे यासाठी नितीनकुमार देवरे सातत्याने मार्गदर्शन करतात. ज्या – ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केले त्या – त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहेत.

नितीनकुमार देवरे यांचे ‘अंकगणित स्पर्धापरीक्षांचे’ हे पुस्तक प्रसिध्द झाले आहे, ज्यातून अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय सहजपणे समजायला मदत मिळतेय. आपण करत असलेल्या कामातून जर आपल्याला समाधान मिळत असेल तर त्याहून अधिक आनंद दुसरा कुठेच नसतो. सांस्कृतिक क्षेत्राची आवड असलेल्या नितीनकुमार देवरे यांचा आवडता अभिनेता सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आहे. उत्तम निवेदक, अभिनयाची व पाककलेची आवड, उत्कृष्ट लेखक, प्रशासनावर पकड, ऊत्तम मार्गदर्शक असलेले देवरे साहेब कोरोनाच्या कालावधीत धरणगाव येथे तहसिलदार पदावर रुजू झालेत. कोरोना काळात ज्या सर्व व्यक्तींनी कार्य केले त्यात तहसिल प्रशासनाचे कार्य देखील कौतुकास्पद होते. तहसिलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागे देवरे साहेबांची खंबीर साथ व अनमोल मार्गदर्शन होते. एके दिवशी तहसिल कार्यालयात बडगुजर नामक वृध्द दांपत्य आले होते. त्यांना रेशन मिळत नाही अशी तक्रार घेऊन ते आले होते.

देवरे साहेबांनी स्वतः दखल घेऊन त्यांना रेशन मिळवून दिले व शासकीय वाहनातून त्यांना घरापर्यंत सोडले, यातून एक संवेदनशील व्यक्ती दिसून येतो. नितीनकुमार देवरे यांच्या मनात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना येत असतात व ते त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी सुध्दा करतात. विविध सामाजिक संस्था व महाराजस्व अभियान अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, शेळी वाटप कार्यक्रम, गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व शालेय साहित्याचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदान वाटप, कुटुंब कल्याण योजनेचा लाभ, तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उत्तम वागणूक व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन यथोचित सन्मान करणं या सर्व गोष्टी देवरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आहेत. प्रांताधिकारी विनयजी गोसावी यांचे मार्गदर्शन, तहसिलदार नितीनकुमार देवरे यांची संकल्पना व तहसिल प्रशासनातील सर्वांची अनमोल साथ या माध्यमातून धरणगावात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. अधिकारी अनेक असतात परंतु आपलं वेगळेपण जपणारे क्वचितच असतात.

निवडणूकीच्या ड्यूटीला जाणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिळगुळ देणारा गोड व्यक्ती आमच्या धरणगाव तालुक्यातील तहसिलदार आहे, या गोष्टीचा मनापासून आनंद वाटतो. नितीनकुमार देवरे साहेबांनी अशाच प्रकारे आपल्या कार्याच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, आबालवृद्ध, महिला, सुशिक्षित बेरोजगार यांना न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने शोषित व वंचितांना न्याय मिळेल.

✒️लेखक:-लक्ष्मण पाटील सर
कार्याध्यक्ष – विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगाव