मराठी व्याकरणाची पायमल्ली !

27

[मराठी भाषा गौरव दिन]

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे घोषित झाले. ‘मराठी भाषा गौरव दिन’ दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवीवर्य श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. साहित्याचे नाना पैलू व प्रकार योजून साहित्यात लक्षणीय भर टाकली. त्यांनी मराठी भाषा ही ‘ज्ञानभाषा’ होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव व्हावा व कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करावे म्हणून त्यांचा जन्मदिन हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दि.२१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला.
आपली मराठमोळी भाषा ही अधिकाधिक सौंदर्यवती व्हावी. ती भरपूर शब्दाने प्रगल्भ व श्रीमंत व्हावी.

विविध साहित्य प्रकाराने ती समृद्ध व रससंपन्न व्हावी, यासाठी साहित्यिक मंडळी प्रयत्नशील असले पाहिजे. काही महाभाग तर मराठी भाषेचे अक्षरशः धिंडवडे काढतांना आढळतात. बोलताना शब्दांचे उच्चार किंवा वापर नको तसा करून भाषेचा अगदी चोळामोळा करतात. बोलताना करतात तर करतात, परंतु लेखनातूनही हीच गिचमिड कायम निदर्शनास येत असते. मराठीत पर्यायी शब्द असतानाही हिंदी, उर्दू, इंग्रजी आदी शब्दांचा सर्रास वापर करून साजिरी गोजिरी मराठी भेसळयुक्त प्रस्तुत करतात. उच्चविद्याविभूषित असल्याने आपण फार मोठे विद्यावाचस्पती आहोत, हेच सिद्ध करण्यासाठी असे सारस्वतकार सर्व भाषांचा खमंग चिवडा तयार करून मोठ्या नाकाने मिळवतात.

त्यांना वाटत असावे की आपण मराठी भाषेला नवलाख्या साज-श्रूंगार चढला आहे. परंतु हे वर्तन भाषासमृद्धीस मारक आहे. भाषेचा ऱ्हास होण्यासही ते कारणीभूत ठरणार, हे मात्र नक्की! माझ्या लाडक्या मराठी भाषेला समृद्ध असा भाषाशास्त्र, शब्दसाठा व व्याकरण लाभलेला आहे. मात्र शास्त्रोक्त व व्याकरणदृष्ट्या शुद्ध भाषण व लेखन होत नाही. त्यामुळे श्रवण व वाचन या दोन भाषिक कौशल्यांवरही विपरित परिणाम आपसूकच होत असतो. पुढे पुढे असे होईल की मराठीतच जन्मलो, वाढलो, जगलो आणि मेलोही तरी ती समजता, बोलता, लिहिता वा वाचताच यायची नाही. मग काय सार्थक? म्हणतात ना, ‘घागर तर उषाला, पण… कोरड मात्र घशाला!’ तसला किस्सा व्हायचा.

 राजभाषा मराठी दिन हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. कारण दि.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे सन १९९७ पासून १ मे हा दिवस ‘राजभाषा मराठी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला. दि.१० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
चांगले चांगले शिकले सवरले लोक, वार्ताहर, सारस्वत – कवी व लेखक आदींना शुद्धलेखन आणि व्याकरणाचा विसर पडून त्यांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

व्यवहार मराठीत मात्र पत्रके व आदेश अन्य भाषेत काढणे, मराठी अंकांचा वापर टाळणे, जोडाक्षरे योग्य लिहिता न येणे, प्रत्यय हे शब्दास न जोडता वेगळे ठेवणे, प्रत्यय लावताना शब्दात होणारा थोडासा बदल करता न येणे, संधी संधान करता न येणे याबाबी मग कशाचे भविष्य वर्तवितात? जसे – आशीर्वाद ऐवजी आर्शिवाद, कामाच्या ऐवजी काम च्या, सुमनची ऐवजी सुमन ची, वाटलं ऐवजी वाट ल, प्रेमाचं ऐवजी प्रेमा च इत्यादी इत्यादी, अशी वेंधळी पद्धती रुढ होऊ पहात आहे. हे खरोखरच मनावर बिंबविण्याची व शब्द न शब्द बिनचूक कसा लिहिता येईल? याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आज गरज आहे. बरेच लोक मराठी भाषा गौरव दिन व राजभाषा मराठी दिन एकच समजतात.

वर्षातून दोनदा मराठीचा उदो-उदो करण्याची संधी मिळत असताना ती गमावली जात आहे. फक्त एकदाच घशाला कोरड पडेपर्यंत ओरडून उसन्याचा उमाळा दाटून घ्यायचा व वर्षभर नाक खुपसून गर्क बसायचं, असंच काहीसं वाटत असेल बिच्चाऱ्या मराठी प्रेमींना! नाही का? हा गैरसमज दूर झाला पाहिजे, हीच सार्थ अपेक्षा!
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या समस्त मराठी भावंडांना आभाळ भरभरून हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी,
(मराठी व हिंदी साहित्यिक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.मधुभाष९४२३७१४८८३.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com