गुरुदेव रविदास महाराज शिष्या : संत मीराबाई

28

(संत मीराबाई स्मृती दिन)

संतकवयित्री मीराबाई या राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व श्रीकृष्णभक्त होत्या. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्त्वाच्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत. त्यांची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत व ती भारतभर सुप्रसिद्ध आहेत. जगभर त्यांची अनेक भाषांतरेही झालेली आहेत. त्यांच्या बहुतांश रचनांमध्ये परमेश्वराप्रती त्यांची असलेली निष्काम प्रेमाभक्ती व्यक्त झालेली दिसून येते – “सांस हटैली ननंद चुगरी ! दीर देवत मोहे गारी !! मीरा कहे प्रभु गिरिधर नागर ! चरन कमल बलिहारी !!”

त्यांच्या जीवनाचा तपशील हा विविध चित्रपटांचा विषय राहिलेला आहे. त्यांच्या रचनांमधून आणि तत्कालीन समाजातून चालत आलेल्या कथांमधून हा तपशील गोळा करावा लागतो. या तपशिलातील काही बाबी ऐतिहासिक दृष्टिकोनातून वादग्रस्त ठरतात. सुमारे सन १४९८मध्ये सद्याच्या राजस्थानात नागौर जिल्ह्यातील कुडकी गावी एका रजपूत कुटुंबात संत मीराबाईंचा जन्म झाला. राव दूदाजी हे त्यांचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे सविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते. बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त पित्यांच्या छत्राखाली त्यांचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून त्यांनी आईला “माझा पती कोण होणार?” असे विचारले असता आईने तिला घरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे नेले व “हा तुझा पती” असे सांगितले होते. घरी आलेल्या एका साधूकडे असलेली श्रीकृष्णाची मूर्ती तिला भारी आवडली. ही मूर्ती त्यांनी हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली.

पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस, असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. संत मीराबाई ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती, असे म्हटले जाते. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीराबाईंना दिली आणि मग ती कायमच त्यांच्याजवळ राहिली. त्या आता ‘मूर्तिप्रेमी’ बनल्या व या मूर्तीशी त्यांनी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
भगवान श्रीकृष्णाचे भजन गाणाऱ्या मीराबाईंचे लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज यांच्याशी विवाह ठरले. श्रीकृष्णाशी आपले लग्न झाले आहे, असे मानत असल्याने त्यांना हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुल दैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ.स.१५२७ मध्ये दिल्ली पतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारले गेले. वयाच्या विशीत त्यांनी पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली व दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनोवस्था वर्णन करणारी त्यांची भजने याची साक्ष देतात. सुरुवातीला त्यांचे श्रीकृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली – “नाचत ताल आधार सुरवर ! धिम धिम बाजे मृदंग !! मीरा के प्रभु गिरिधर नागर ! चरन कमलकू दंग !!”

चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा त्यांचा दीर त्यांच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. संत मीराबाईंवर विषप्रयोग करण्याचे अनेक प्रयत्न त्याने केले असे म्हटले जाते. परंतु संत मीराबाईंनी परमेश्वरभक्ती निर्मल मनाने केली. त्यांनी आता पतिव्रता जीवन त्यागले होते.प्रसादात विष मिसळून त्यांना मारण्याचा प्रयत्‍न झाला, पण भगवंताने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात. त्यांच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले, मात्र ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. त्यांच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो – “शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय । सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय ।।” फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे, असे त्यांना सांगितले. त्यांनी टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांचा सुरम्य हार होता. याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स.१५३८च्या सुमारास राजस्थान सोडून संत मीराबाई वृंदावनास आल्या असाव्यात, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

कधी काळी त्यांनी सद्गुरू रविदास महाराज यांना आपले गुरू घोषित केले – ‘गुरू मिलिया रैदासजी’ व वृंदावन सोडले. श्रीकृष्ण प्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीकेचा आपण पुनर्जन्म आहोत, असे त्या सांगत असत. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. त्यांनी त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली, अशीही एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे, असे उत्तर संत मीराबाईंनी दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात त्या फिरत – “पायों जी मैनें राम रतन धन पायों ! वस्तु अमौलिक दियों मोरें सतिगुरू ! कर किरपा अपनायों !!” गुजरातमधील द्वारका येथे त्यांनी आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. दि.२ मार्च १५६८ रोजी भगवान द्वारकाधीशाच्या मूर्तीत संतशिरोमणी मीराबाई विलीन झाल्या, अशीही आख्यायिका आहे.
!! पुरोगामी संदेश परिवाराचा संत मीराबाईंच्या निष्काम प्रेमाभक्तीला मानाचा मुजरा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी,
(मराठी-हिंदी साहित्यिक तथा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.मधुभाष – ९४२३७१४८८३.